
Nanded News : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात (Watershed Area) पाणी वापराच्या नियमबाह्य परवानग्या दिल्यामुळे तूट (Water Shortage) निर्माण होऊन यवतमाळ, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात अपेक्षित सिंचन (Irrigation) होत नसल्याचा मुद्दा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मंगळवारी (ता. २८) लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत उपस्थित केला.
त्यावर या प्रकल्पात ७८१ दलघमी तूट असल्याचे मान्य करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिगडी उच्च पातळी बंधारा, खरबी बंधारा व गोजेगाव चिंचोली उपसा सिंचन योजनेतून ही तूट भरून काढण्याचे आश्वासन दिले.
मंगळवारी दुपारी लक्षवेधी प्रस्तावावर झालेल्या चर्चेत अशोक चव्हाण म्हणाले, की उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील पाणी तुटीमुळे यवतमाळ जिल्ह्यात ११ हजार २६५ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यात १२ हजार ३७२ हेक्टर तर नांदेड जिल्ह्यात ५२ हजार ५७ हेक्टर असे एकूण ७५ हजार ६९४ हेक्टर सिंचन क्षेत्र बाधित होणार आहे.
या तीन जिल्ह्यात सिंचन क्षेत्र घटल्याने सिंचनाचा अनुशेष अधिक वाढण्याची शक्यतादेखील त्यांनी व्यक्त केली.
१९६८ च्या मूळ आराखड्याप्रमाणे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची निर्धारित सिंचन क्षमता १ लाख २५ हजार १२६ हेक्टर होती; मात्र १९८२ ला प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंचनाखाली येणारे क्षेत्र १ लाख ७ हजार ९० हेक्टरपर्यंत मर्यादित करण्यात आले.
प्रत्यक्षात आजमितीस या प्रकल्पात उपलब्ध होणाऱ्या पाणी साठ्यातून केवळ ३१ हजार ३९६ हेक्टर एवढेच सिंचन केले जाऊ शकते, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले.
‘वाल्मी’च्या २००८ च्या अहवालानुसार यापुढे ईसापूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात भविष्यकालीन योजनांसाठी पाणी आरक्षित करता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता; मात्र तरीही पाणी वापरासाठी परवानगी का दिली जाते, असा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केला.
त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही तूट भरून काढण्यासोबतच यापुढे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी वापराची अधिक परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
तीन जिल्ह्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी यवतमाळ व नांदेडच्या सीमेवरील दिगडी उच्च पातळी बंधारा (५८२ दलघमी), हिंगोलीतील खरबी बंधारा (१०२ दलघमी) आणि नांदेडमधील गोजेगाव चिंचोली (९७ दलघमी) या योजनांतून पाणी उपलब्ध करण्याच्या उपाययोजनेला मान्यता दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.