Court Story : पूर्वी काय गुळासारखी माणसं व्हती ती !

ठरलेली तारीख़ संपवुन आज तरी काम होईल? अशी सकाळी असलेली आशा संध्याकाळ पर्यंत सपशेल मावळायची त्यात परतीची एसटी पकडायची धाकधुक म्हाता-या कोता-यांच्या चेहर्यावर मला स्पष्ट दिसायची. असे बरेच जण कोर्टाच्या चकरा मारताना मी दररोज पाहायचो.
Court Story
Court StoryAgrowon

दादाच्या कोर्टासमोरच्या एकमेव टायपिंगच्या दुकानात इयत्ता आठवी ते पदविके पर्यंत दररोज जमेलतस आणि सुट्टीचं फुल्ल टाईम माझं टाइपिंगच झेरॉक्सच कामकाज. टायपिंग करत असताना माझी अल्पवयीन बोटे इकडे तयार होणा-या विविध दिवाणी तसच फ़ौजदारी दावे, प्रतिज्ञापत्रे, करारनामे, वकिलपत्रे, सर्च रिपोर्ट्स तसच विविध अर्ज पैसेही मिळवायला नकळत शिकली.

Court Story
Indian Agriculture : आपल्याला तारणारी शेती पद्धती

दररोज डोळ्यांसमोर दिसणारे न्यायालयीन कामकाज, बाररूम, वक़ील, वकीलांची नवखी वकील पोरं, वेळोवेळी बदली होणा-या न्यायाधिशांची पोरं ह्यांच्याशी मैत्री व्हायची तोच ती कुठ तरी गायब व्हायचीत , न्यायालय आवार, जिल्ह्यातून येणारे वकील, तालुक्याच्या अगदी दुर्गम भागातून काही किलोमीटर पायपीट करून सकाळची पहिली एसटी पकडून किंवा वडापनं येणारे विविध भागातील वेगवेगळ्या थरातील पक्षकार, अशिल आणि सोबतीला असणारी बाया माणसं. त्यात कधी त्यांचे साक्षीदार, साथिदार आणि गटातट तसच झुंडशाही दर्शविणारी म्होरक्या मंडळी.

Court Story
Indian Agriculture : सामान्य शेतकऱ्यांनी गुंफली यशमाला

ठरलेली तारीख़ संपवुन आज तरी काम होईल? अशी सकाळी असलेली आशा संध्याकाळ पर्यंत सपशेल मावळायची त्यात परतीची एसटी पकडायची धाकधुक म्हाता-या कोता-यांच्या चेहर्यावर मला स्पष्ट दिसायची. असे बरेच जण कोर्टाच्या चकरा मारताना मी दररोज पाहायचो. पुढच्या तारखेला काम होईल या आशेने घर गाठून परत दोन तीन महिन्यांनी तेच चेहरे हमखास दिसायचे. कधी आशा कधी निराशा. वकीलांसमोरची कैफ़ियत आणि रडगाणी मला माणसाच्या हव्यास, क्रोध, प्रतिष्ठा, मोह, मस्तरांची क़ायम दर्शन द्यायचीत.

दोनफुटाच्या जागा बोळासाठी फुटणारी डोचकी, बांध सरकला म्हणून होणारी तुंबळ हाणामारी. कोयतं आणि कु-हाडी. मग होणारी फ़ौजदारी आणि कैक दिवाणी. ह्यासगळ्यात मला खर तर मीच न्यायाधिशच असल्यासारखं वाटायचं कारण दोन्ही पक्षकारांचे दावे, प्रतिदावे आमच्याच दुकानातुन टाईप होवुन पुढे जायचे. चुक कुणाची आहे हे माहिती असलं तरीही कोर्टात जाणारी केस आणि विरोधी पक्षाची केस लढवायला घेणारे वकील बघितलं की मला पहिले सगळ जुगाड़ु वाटायचं. पण नंतर कळायचं ह्यात वकीलांचा दोष नसतो, पक्षकार कधी वादी, तर कधी प्रतिवादी हट्टून बसलेला असतो. ते न्यायादानावर विश्वास ठेवुन कोर्टाची पायरी चढतो.

ह्यासगळ्यावर तर आमचं दुकान आणि वकीलांच चालायच. अर्थात कष्ट करूनच. प्रतिदाव्यात तर धादांत, खोटा आणि लबाडीचा हे तीन शब्द तर मी किबोर्डवरच्या स्पेशल कळीने पेस्ट करायचो. खर तर ह्यातल्या ब-याच केसीस काही वर्षांनी लोकन्यायालयात तडजोड करूनच मिटायच्या. हळूवार न्यायप्रक्रीया. तारीख पे तारीख निराशा, त्यात जाणारा वेळ, प्रतिक्षा, वाया जाणारा पैसा ह्याचा बोध पक्षकारांना वेळाने का असेना तो होवुन येणारा थोडाफार समजुतदारपणा दिसुन यायचा.

कैक पक्षकारांकडे तर एखादं टायपिंग, अर्ज, कोर्ट फ़ी स्ट्यांप लावुन झाल्यावर झालेल्या बिलाचे द्यायला पैसेही नसायचे. माझा दादा मग 'राहूंदे मामा पुढच्या टायमाला द्या' असं म्हणायचा. बरेच गब्बर वादी, प्रतिवादी मंडळी पैसे असुन लिहुन ठेवा नंतर देतो म्हणायचे. असे बरेच घामाचे पैसे नकळत बुडायचे. कोर्टाने खुप वर्षानंतर निकाल दिलाच तर मग पुढे अप्पर कोर्टात अपिल व्हायचं. कोर्टाच्या आदेशाच्या झेरोक्स प्रती एखादा पक्षकार काढायला यायचा तोवर दोन तीन दिवसांत त्याच ऑर्डरी सोबतचा अपील अर्ज पुन्हा टाईप करायला लागायचा.

आमच्या घरात भाड्याने राहायला असणा-या एका प्रतिभावंत इंग्रजी शिक्षकांना आपल्या तत्वांसाठी खाजगी शिक्षण संकुलाच्या निलंबन कारवाईस समोरे जाव लागलं. त्यांनी बिनावकील पहिले तालुक़ा कोर्टात संस्थेविरूध्द केस लढवली. नंतर अपिलावर अपिल असे तालुका, हायकोर्टत लढताना आपलं संबंध आयुष्य खर्ची पाडलं. मृत्युपश्चात दोन वर्षांनी त्यांच्या मुलांनी सर्वोच्च न्यायालयाकडून तडजोड करून न्याय मिळवला.

आजच गावाहून परतत होतो. राहुल ह्या मित्राचा कोर्ट केस कचेरी आणि सबंध अनुभवा बद्दल ऐकून मी उडालोच. त्याच्या शेजारच्या प्लॉट मध्ये बांधकाम चालू असताना शेजारी काकांनी आपले मजले चढवताना मस्त पैकी पाणी, मोटार व जमेल ती मदत वापरली. दोन एक वर्षांनी त्यांच्याच बाजूची १ मजली इमारत मित्राने विकत घेतली. त्यावर नियमाने बांधकाम करताना काय कुणास ठावूक बाजूच्या काकांनी काहीही कारण नसताना आपलं खरं रूप दाखवायला सुरवात केली. बांधकाम करताना हातोडा वापरताना त्याचा दांडा देखील आपल्या प्लॉट मध्ये येता कामा नये असा सज्जड दम आणि आलाच तर हाणामारीचा इशारा दिला. पुढे काय तर तुंबळ हाणामारी दाद, फिर्याद, कोर्ट कचेरी वगैरे.. न्यायदान केंव्हा कधी हे येणारा काळच सांगेल.

आज्जी तिच्या टायमाच्या माणसांच्या गोष्टी मला क़ायम सांगायची "पूर्वी काय गुळासारखी माणसं व्हती ती" असं ती कायमच म्हणत असते. वाद विवाद तंटे ताबड़तोब मिटवणारी जुनी पंच पध्दती मला आजही सरस वाटते. चांगली माणसं कमी होत गेली. वाईट माणसं वाढू लागली. हेवे दावे, राग, द्वेष, मोह जे काहीच टिकत नसते अशात आपल्या सभोवतालची गुळासारखी घट्ट घराणी हल्ली कशी काय साखरे सारखी स्फटिकमय होत गेली? हा प्रश्न मला सतत सतावतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com