World Environment Day
World Environment Day Agrowon

प्लॅस्टिकपासून मुक्ततेसाठी पर्यावरणपूरक पर्याय

प्लॅस्टिकचा कचरा ही पर्यावरणासाठी मोठी समस्या बनत असून, त्यापासून मानवासह सर्वंच सजीवांच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे. २०२२ पर्यंत भारत एकदा वापरल्या जाणारे प्लॅस्टिक संपूर्णपणे हटविण्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र हे ध्येय गाठणे सोपे नाही. कारण जागतिक पातळीवर भारतातील प्लॅस्टिक उद्योग तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्लॅस्टिकपासून मुक्तता कशा प्रकारे शक्य होईल, याचा आढावा आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने घेण्याचा हा प्रयत्न.

समीर झाडे, डॉ. श्रीकांत ब्राह्मणकर

प्लॅस्टिकचे टिकाऊपण हा एकेकाळचा गुणधर्मच त्याला समस्येमध्ये रूपांतरित करत आहे. प्लॅस्टिकचे विघटन होण्यासाठी दीर्घकाळ लागतो. उदा. प्लॅस्टिक बाटली विघटनासठी सुमारे ४५० वर्षे लागतात. प्लॅस्टिकचे विघटन होताना तयार होणारे सूक्ष्म प्लॅस्टिकमुळे जमीन, पाणी आणि हवा यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. प्लॅस्टिक जळल्यामुळे तयार होणाऱ्या विषारी वायूची समस्या आणखी वेगळी आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासामध्ये सूक्ष्म प्लॅस्टिक कण हे मानवी रक्तामध्येही आढळले आहेत. हा धोका सतत वाढत चालला असून, जगभर प्लॅस्टिकला नैसर्गिक व लवकर विघटन होणाऱ्या पर्यायांचा शोध घेतला जात आहे. यापूर्वीच्या एका लेखातून आपण बुरशीपासून लेदर, फोम, कपडे, मांस, फर्निचर, विटा, पॅकेजिंग साहित्य यांच्या निर्मितीची माहिती घेतली. या भागामध्ये अन्य पर्यायांची माहिती घेऊ.

शेती, औद्योगिक टाकाऊ घटकापासून प्लॅस्टिक ः

रिया मजुमदार सिंघल यांनी २०१० मध्ये स्थापन केलेली ‘इकोवेयर’ ही कंपनी पॅकेजिंग क्षेत्रात काम करते. ही कंपनी शेतकरी आणि कृषी निगडित कारखान्याकडून पीक अवशेष गोळा करते. साखर कारखाना, तांदूळ मिल, दाल मिल अशा कारखान्याकडून उपलब्ध टाकाऊ घटक बारीक केले जातात. नंतर एका मशिनद्वारे साच्यामध्ये भरला जातो. तिथे तो गरम करून सुकवून विविध वस्तू बनवल्या जातात. या वस्तू संपूर्णपणे विघटनशील असून, अमेरिकन कृषी विभागाद्वारे प्रमाणित केलेल्या आहेत.

सागरी शेवाळापासून प्लॅस्टिक :

सागरी लाल शेवाळापासून नोरी मुल्योनी या इंडोनेशियन अन्नशास्त्रज्ञाने पर्यायी प्लॅस्टिक विकसित केले आहे. अन्नाच्या पॅकेजिंगसाठी त्याचा वापर केला जातो. हे प्लॅस्टिक खाता येते. पाण्यात सहजपणे विघटित होते. तसेच खत म्हणून उपयोगी ठरते.

केळीच्या तंतूपासून कागदी पिशवी :

युगांडामध्ये केळीच्या खोड, सालीपासून तंतू काढून, कागदी पिशवी तयार केली जाते. त्यासाठी प्रथम केळीच्या झाडाच्या साली काढल्या जातात. लहान लहान तुकड्यामध्ये कापून पाण्यात टाकून उकळले जाते. त्याला ५ मिनिटे व्यवस्थित मिसळून, त्याचा लगदा केला जातो. हा लगदा एका चाळणीवर टाकतात. त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाकतात. हा लगदा पातळ थरामध्ये पसरून वाळवला जातो. ६ तासांमध्ये त्याचा कडक कागद तयार होतो. या कागदापासून पिशवी, निमंत्रण पत्रिका वगैरे तयार करतात.

२०१५ मध्ये भारतीय कंपनी ‘साथी’द्वारे केळीच्या झाडापासून सॅनिटरी पॅड तयार केले. तसेच केळीच्या खोडापासून तंतू/धागे बनवून, त्याचा पिशवी तयार करण्यासाठी केला जातो.

उसाचे पाचट आणि चिपाडे :

उसाचे पाचट व चिपाडे जाळून त्यापासून ऊर्जानिर्मिती केली जात असली तरी त्यातून प्रदूषण होते. यश पक्का हे साखर कारखानदार आहेत. उसापासून साखरनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये शिल्लक राहणारी चिपाडे व अन्य अवशेषापासून वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात. चिपाडे व पाचट बारीक करून, स्वच्छ धुतात. त्यात अल्कधर्मी रसायने मिसळून चिकटपणा नाहीसा केला जातो. हे मिश्रण विविध साच्यांमध्ये टाकून त्यापासून ताट, वाटी, चमचे, ग्लास, पॅकेजिंग साहित्य तयार केले जातात. या वस्तू ९० ते १८० दिवसांमध्ये विघटित होतात.

मक्यापासून प्लॅस्टिक :

२००८ पासून अलिरेजा खालाजीपोर हे शास्त्रज्ञ विघटनशील प्लॅस्टिक निर्मितीवर संशोधन करत आहे. त्यांनी मक्यापासून प्लॅस्टिक बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. मका दाणे यंत्राने दळून बारीक केले जातात. त्यात वनस्पती प्रथिने मिसळून दाबले जाते. त्यापासून पातळ पत्रा किंवा चादर तयार होते. या जैव प्लॅस्टिकचा उपयोग इमारतीचे बांधकाम, फर्निचर, खुर्ची, टेबले, पॅकेजिंग साहित्य व स्वयंपाकघरातील वस्तू बनविण्यासाठी होतो.

नारळापासून प्लॅस्टिक :-

इंडोनेशियातील संशोधक मिरया करिना सांकायोरीनी यांनी नारळ पाण्यापासून जैवप्लॅस्टिक निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. नारळ पाणी ॲसिटोबॅक्टर झालीनम या जिवाणूंच्या साह्याने किण्वन (फर्मेंटेशन) केले जाते. नारळ पाण्यातील सेल्युलोजची घट्ट साय तयार होईपर्यंत ही प्रक्रिया केली जाते. या आवरणातील पाणी व्हॅक्यूम यंत्राच्या साह्याने सुकवले जाते. किंवा उष्णता आणि दाबाखाली ठेवल्यामुळे त्यातील सगळे पाणी निघून जाते. नारळ पाण्याच्या या घन थरापासून प्लॅस्टिकसदृश पदार्थ मिळतो.

कोंबडीचे पंख :-

मांसासाठी कोंबड्या कापल्या जाताना, त्यांच्या पंखांच्या विल्हेवाटीची समस्या तयार होत आहे. युरोपातील प्लॅस्टिक इनोव्हेशन कॉम्पिटन्स सेंटर) यांनी अशा कोंबडीच्या पंखापासून प्लॅस्टिकची निर्मिती केली आहे. या प्रक्रियेत पंखांची बारीक भुकटी करून त्यात जैवरसायन मिसळले जाते. त्यापासून दाणे तयार केले जातात. त्यापासून विघटनशील प्लॅस्टिक तयार करता येते.

तागापासून प्लॅस्टिक :

बांगलादेशमधील मुबारक अहमद खान यांनी तागापासून प्लॅस्टिक पिशवीला पर्यायी पिशवी तयार केली आहे. ही पिशवी पाण्यामध्ये टाकल्यानंतर दोन मिनिटांत विघटित होते. तर जमिनीमध्ये टाकल्यास ६ महिन्यांमध्ये विघटित होते.

त्यासाठी कच्च्या ताग ब्लीच करून पांढरेशुभ्र केले जाते. त्यातील सेल्युलोज (काष्ठ तंतू) वेगळा केला जातो. हा सेल्युलोज पाण्यामध्ये विघटनशील बनवला जातो. त्यामध्ये काही रसायने मिसळून यंत्राद्वारे व्यवस्थितपणे मिसळून घेतात. त्यापासून पिशव्या तयार केल्या जातात.

साबुदाण्यापासून प्लॅस्टिक :

इंडोनेशियामधील ग्रीनहोप या कंपनीने साबुदाण्यापासून प्लॅस्टिक निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. साबुदाण्यातील पिष्टमय पदार्थावर काही प्रक्रिया करून प्लॅस्टिक तयार करतात. हे प्लॅस्टिक पूर्णपणे जैवविघटित आहे.

२०१६ मध्ये बंगळूर येथील भारतीय कंपनी एनवीग्रीन यांनीही साबुदाण्यापासून प्लॅस्टिक तयार केले. साबुदाण्यामध्ये वनस्पती तेल व वनस्पतीचे अर्क यांच्या मिश्रणापासून छोटे छोटे दाणे अथवा गोळ्या तयार केल्या जातात. या दाण्यापासून प्लॅस्टिक तयार करतात.

अन्य काही पर्याय...

-कोलंबियामध्ये अननसापासून फोम तयार केले आहे.

-मेक्सिकोमध्ये ॲव्हाकॅडोपासून जैव प्लॅस्टिक तयार केले आहे.

-डेन्मार्कमध्ये बटाट्यापासून प्लॅस्टिकसदृश वस्तू तयार केल्या जातात.

-आशिया पल्प आणि पेपर ही इंडोनेशियातील कंपनी प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कागदी वस्तू तयार करत आहे.

प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना ः

१) प्लॅस्टिकपासून रस्तेनिर्मिती :

तमिळनाडू येथील रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या राजगोपालन यांनी हे तंत्रज्ञान प्रथम शोधले असून, त्याचे पेटंटही विद्यापीठाच्या नावाने नोंदवले आहे. या तंत्रामध्ये प्लॅस्टिकचे यंत्राद्वारे बारीक तुकडे केले जातात. नंतर डायजेस्टरमध्ये टाकून, त्यात डांबर, बारीक गिट्टी आणि सेंद्रिय उत्प्रेरक (ऑरगॉंनिक कॅटालिस्ट) टाकले जाते. त्याचे मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर त्यापासून रस्ते तयार केले जातात. हे रस्ते अतिशय मजबूत, पाणी प्रतिरोधक असून, १० वर्षे देखभालविरहित टिकतात.

२) प्लॅस्टिकपासून इंधन :

२०१६ मध्ये मेघा ताडपत्रीकर आणि गिरीश फडताडे यांनी रुद्र एन्व्हायर्न्मेंटल सोल्यूशन्स या कंपनीमध्ये प्लॅस्टिकपासून इंधनतेल तयार करण्याचा प्रयोग यशस्वी केला. त्यात यंत्राच्या साह्याने प्लॅस्टिकचे बारीक तुकडे केले जाते. ते भट्टीमध्ये उत्प्रेरकासह टाकले जाते. त्यापासून मिळणाऱ्या तेलाची स्वच्छता केली जाते. या तेलाच्या निर्मितीसाठी २४ रुपये प्रति लिटर खर्च येतो.

३) प्लॅस्टिक खाणारे कीटक :-

प्लॅस्टिक खाणाऱ्या कीटक ‘मिलवर्म’ असे म्हणतात. या कीटकांच्या पचनसंस्थेतील जिवाणू आणि विकरे प्लॅस्टिकचे विघटन करायला मदत करतात. हे कीटक फेडरिका बेर्तेचिनी या महिलेला मधमाश्यांच्या पोळ्याजवळ मिळाले होते. त्यांनी ते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गोळा करून ठेवले असता त्यांनी एक आठवड्यात ते प्लॅस्टिकच खाऊन टाकल्याचे दिसून आले. अधिक प्रयोगानंतर या कीटकांची पैदास सुरू केली. आता प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ लागला आहे.

समीर झाडे, ८८५५८२३५४६ (आचार्य पदवी विद्यार्थी, वनस्पती रोगशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com