शिक्षण पूर्वीचे आणि आताचे!

गरीब मुले जेमतेम दोन किंवा तीन ड्रेस बरोबर आणत. बहुसंख्य विद्यार्थी १९५० पर्यंत धोतर घातलेले, त्यानंतर पायजमा घातलेले व १९८० च्या नंतर पँट-शर्ट घालणारे असत.
शिक्षण पूर्वीचे आणि आताचे!
Education Agrowon

शेखर गायकवाड

शंभर वर्षांपूर्वी महाविद्यालयात शिकायला जाणारा आणि २०२२ चा विद्यार्थी यांमध्ये फार फरक आहे. त्या वेळी एक किंवा दोन विद्यार्थी तालुका, जिल्हा पातळीवर किंवा मुंबई, पुणे, अलाहाबाद या ठिकाणी शिकायला जात असत. बहुतेक वेळा शिकायला जाताना फी भरायची तरतूद, जाण्या-येण्याचा खर्च आणि थोडा जेवणाचा खर्च अशी तयारी करून विद्यार्थी महाविद्यालयात जात. गरीब मुले जेमतेम दोन किंवा तीन ड्रेस बरोबर आणत. बहुसंख्य विद्यार्थी १९५० पर्यंत धोतर घातलेले, त्यानंतर पायजमा घातलेले व १९८० च्या नंतर पँट-शर्ट घालणारे असत.

अतिशय जुन्या व ऐतिहासिक महाविद्यालयांमध्ये वसतिगृहाची सोय असायची. कोणाच्या ओळखीने किंवा नातेवाइकांकडे काही दिवस राहण्याची सोय याची खात्री करून विद्यार्थी शिकायला जात. महाविद्यालयाची फी भरायला पैसे साठवल्यावर त्यातले काही पैसे एसटीसाठी प्रवासाला खर्च होतील म्हणून १९५६ मध्ये चांदवड ते नाशिक असा ५० कि.मी.चा प्रवास पायी चालत नाशिकच्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचे एक उदाहरण मला माहिती आहे.

वसतिगृहाची फी भरण्याची ऐपत असणारे पालक तुलनेने आर्थिकदृष्ट्या बरे असत. वसतिगृहातील खोल्यांमध्ये सुद्धा एक टेबल, एक लाकडी खुर्ची, एक दिवा व पुस्तके ठेवण्यासाठी भिंतीत बसवलेले एक कपाट, कॉट एवढी सामग्री असे. वसतिगृहापासून काही अंतर चालत जाऊन बादली, तांब्या, साबण घेऊन अंघोळ करण्याची व्यवस्था फर्ग्युसन महाविद्यालयात १९९० पर्यंत होती. वाडी-वस्ती वरून जाणाऱ्या मुलांच्या बाबतीत जणू तो काही परदेशी शिकायला चालला आहे आणि तो आता कित्येक वर्षे भेटणार नाही अशी भावना आई-वडिलांच्या मनात असे. १९७०-८० पर्यंत मुलांच्या प्रवेशासाठी पालक अगोदर हेलपाटे मारत असत.

दहावीला चांगले गुण असून सुद्धा आर्थिक परिस्थितीमुळे आई-वडिलांनी दहावी झाल्यावर शेतातील कामे करण्यासाठी, गुरे सांभाळण्यासाठी, लहान भावंडे सांभाळण्यासाठी विद्यार्थ्याला घरी ठेवल्यावर शिक्षक पहिल्यांदा अस्वस्थ होत असत. त्या मुलाच्या भवितव्याचे नुकसान करू नका व त्यांना पुढे शिकवण्याची गळ पालकांना घालीत. कित्येक शिक्षक स्वतःच्या पगारातून काही फी देण्याची तयारी दाखवत असत. प्रत्यक्षात महाविद्यालयात प्रवेश घेताना सुद्धा शेतातून गावापर्यंत पायी प्रवास, नंतर एसटी, रेल्वे प्रवास, अंधाऱ्या रात्री किंवा पावसामध्ये महाविद्यालयापर्यंत केलेली पायपीट हे महाविद्यालयात शिकणाऱ्या पहिल्या पिढीच्या वाट्याला आले.

जुनी अकरावी पास झाल्यावर पहिल्यांदा महाविद्यालयात जाताना पँट-शर्ट घालण्याची वेळ यायची. तो पर्यंत अनेक मुले हाफ विजारी किंवा पायजमा शर्ट घालत असत. परगावी शिकणाऱ्या मुलींची संख्या फार कमी होती. काही शिक्षक सुद्धा हुशार विद्यार्थ्यांना वाड्यात राहायला जागा देत असत. जमीन कसणाऱ्या कुळांची मुले सर्रास अकरावीच्या परीक्षेला मालकांच्या घरी उतरत. राहण्याचे ठिकाण आणि महाविद्यालय लांब असेल तर १०-१५ रुपयांत त्या वेळी मिळणारी सायकल विद्यार्थी वापरत. जवळच्या गावांमधून एसटीने डबे येत असत. त्या काळी दररोज मुलांना वेगवेगळ्या भाज्या देण्याची कल्पकता व उपलब्धता सुद्धा नसायची. चटणी व बटाट्याची भाजी बहुसंख्य मुलांच्या डब्यामधे यायची.

नव्वदच्या दशकापर्यंत शिकायला येणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांची परिस्थिती सारखी व बेताची असे. आताच्या सारखी एवढी विषमता त्याकाळी नव्हती. वसतिगृहाचे रेक्टर अतिशय कडक असत. वसतिगृहात राहणारी मुले सर्वांना वैयक्तिकरीत्या ओळखत असत. हळूहळू एकाच भागातील विद्यार्थी अधिक जवळीक झाल्यामुळे ग्रुपने ओळखले जात. त्यांचे सुट्टीमध्ये एकमेकांच्या घरी जाणे असायचे. कोणत्या विषयाचे शिक्षण घ्यायचे हे सुद्धा शिक्षकांमुळे, शिकलेल्या नातेवाइकांमुळे व मोठ्या लोकांच्या मार्गदर्शनामुळे ठरत असे.

संपूर्ण राज्यात नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, सोलापूर या काही निवडक ठिकाणी प्रसिद्ध महाविद्यालये असल्यामुळे पाच-सहा जिल्ह्यांतून विद्यार्थी तेथे प्रवेश घेत. फर्ग्युसन, डेक्कन, किंवा टाटा इन्स्टिट्यूटसारख्या ऐतिहासिक महाविद्यालयात नेपाळ, भूतान, केनिया, इजिप्त, थायलंड अशा देशातून आणि भारतातील अन्य राज्यातील विद्यार्थी येत. वसतिगृहामध्ये कॉमन रूममध्ये, वर्तमान पत्रे, कॅरम आणि टेबल टेनिस सारखे जुजबी साहित्य असायचे. निवडक वृत्तपत्रे आणि आकाशवाणी हे माहितीचे मुख्य स्रोत होते. वसतिगृहातून गावी असलेल्या आई-वडिलांना पोस्टकार्ड पाठवले जाई. फी भरण्यासाठी सुद्धा मनिऑर्डरने पैसे मागवावे लागत असत. वसतिगृहातील मुलांकडून निकडीच्या वेळी दोन रुपये, पाच रुपये उसने घेऊन त्याची नोंद छोट्या डायरीमध्ये होत असे.

महाविद्यालयीन जीवन खडतर असले तरी एकमेकांच्या मदतीने विद्यार्थी शिकत असत. पूर्वी जुनी दहावी आणि पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना आपोआप नोकऱ्या मिळत असत. संधी मिळेल तेव्हा विद्यार्थी पैसे वाचवून सिनेमा पाहण्याचा आनंद लुटत असत. वसतिगृहात कोणाचेही पालक भेटायला आले की त्यांनी आणलेला खाऊ अर्ध्या तासात ग्रुपमधले विद्यार्थी फस्त करीत. सहजीवनाची खरी सुरुवात वसतिगृहात महाविद्यालयीन काळात होत असे आणि महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी एकमेकांचे आयुष्यभर जिगरी मित्र बनत. शेवटच्या वर्षी मात्र आपल्या भवितव्याच्या बाबतीत चिंतीत असत. पोटासाठी कोणत्याही ठिकाणी नोकरी मिळाली तरी त्यांची जाण्याची तयारी असे.

आतासारखे महाविद्यालयात प्रवेश घेताना स्वागत, कॅम्पसची ओळख, अद्ययावत वसतिगृह, स्वीमिंग पुल, कॅफेटेरिया, कंझ्युमर शॉपी, वाय-फाय, ट्रॉलिबॅग, मोबाईल, स्कूटर, मोटारसायकल, स्पोर्ट्स शूज, जर्सी, इत्यादी अनेक गोष्टींचा काही दशकांपूर्वी गंधही नव्हता यावर आता कोण विश्‍वास ठेवणार?

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com