
नागपूर जिल्ह्यात महालगाव (ता. भिवापूर) येथील चिचूलकर कुटुंबाची एकूण साडेतेरा एकर जमीन आहे. सुनील यांच्याकडे शेतीची मुख्य जबाबदारी आहे. त्यांच्या नावावर त्यातील साडेसात एकर शेती आहे. त्यांचे वडील महसूल निरीक्षक होते. भाऊ शरदचंद्र शासकीय नोकरीत होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. सुनील यांनी पशुसंवर्धन पदविका (डिप्लोमा)पर्यंत शिक्षण घेतले. पशुसंवर्धन (Animal Husbandry) खात्यात त्यांना नोकरीची संधी मिळाली.
मात्र नियुक्ती कोकणात झाल्याने आणि घरच्या शेतीचे व्यवस्थापन करण्यास अन्य कोणी नसल्याने त्यांनी नोकरी न करता शेतीच सांभाळण्याचा निर्णय घेतला. गेल्या १८ वर्षांपासून शेतीचे व्यवस्थापन ते सांभाळत आहेत. शेतीची आवड असल्याने ते सातत्याने प्रयोगशील शेतकऱ्यांच्या संपर्कात राहतात. दुचाकीने एखाद्या गावी जात असताना एखादा प्रयोग किंवा चांगले व्यवस्थापन असलेली शेती पाहण्यात आली, तर तेथे भेट देऊन त्याबाबतची माहिती घेण्यावर त्यांचा भर असतो. त्यातील बाबींचा अवलंबही ते आपल्या शेतीत करतात.
पट्टा पद्धतीने सोयाबीन, हरभरा
पट्टा पद्धतीने सोयाबीन व हरभरा लागवडीवर सुनील यांचा भर असतो. आठ तास (ओळी) पेरणीनंतर एक तास सोडली जातो. ही मोकळी जागा सुमारे ३४ इंचाची असते. त्यानंतर पुन्हा पुढील तास येतात. या पद्धतीमुळे सोयाबीन दाट वाढत असताना फवारणी चांगल्या प्रकारे करता येते. पिकाला सूर्यप्रकाश चांगला मिळतो. हवा खेळती राहते. सोयाबीनचे एकरी १२ क्विंटलपर्यंत त्यांना उत्पादन मिळते.
यावर्षी पाऊसमान जास्त झाल्यामुळे हे उत्पादन नऊ क्विंटलपर्यंत मिळाले. हरभरा लागवड देखील याच पद्धतीने केली जाते. त्यामुळे डवऱ्याच्या साह्याने तणनियंत्रण करणे देखील शक्य होते. मजुरांच्या माध्यमातून तण नियंत्रणावर होणाऱ्या खर्चात यामुळे बचत होते असा सुनील यांचा अनुभव आहे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याचे नियोजन होते. जमीन हलकी असेल तर तीन पाणी तर भारी जमीन असल्यास एक- दोन पाणी पुरेसे ठरते. एकूण व्यवस्थापनातून एकरी ११ ते १२ क्विंटलपर्यंत हरभऱ्याचेही उत्पादन मिळते.
रब्बी पिकांबाबत सांगायचे तर गव्हाचे एकरी २७ ते २८ क्विंटल उत्पादन घेण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. कृषी विभागाकडून जिल्हास्तरावर आपल्या गहू उत्पादनाची दखल घेतली असल्याचे ते सांगतात. बैलचलीत लाकडी तिफनच्या साह्याने ते गहू लावतात. पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा मिळेल या पद्धतीने त्यांची लावण असते.
ओंबी निसवल्यानंतर चार-आठ दिवसांनी बोरॉनची फवारणी ते घेतात. या काळात हलकी जमीन असेल तर पाण्याची गरज राहते. गव्हासाठी एकरी २५ हजार रुपयांपर्यंत उत्पादन खर्च येतो. क्विंटलला सध्या २७०० रुपये दर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कपाशीची लागवड दरवर्षी सुमारे तीन एकरांत असते. एकरी उत्पादन १० क्विंटलपर्यंत ते घेतात. विक्री हिंगणघाट (वर्धा) बाजार समितीत होते.
दरवर्षी अर्धा ते एक एकर क्षेत्रात मिरचीही लागवड असते. साडेतेरा एकर शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी दोन विहिरी आहेत. तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी दिले जाते. गावात उरकुरपार तलाव आहे. त्यातून पाणी विहिरीत सोडून त्याचा वापर करण्यात येतो. दोन वर्षांपासून देखभाल दुरुस्तीअभावी कालव्यांमधून पाणी मिळणे बंद
झाले आहे.
सुनील चिचूलकर, ९४२२१२५९७५
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.