
Beed News : राज्य सरकारने गुरुवारी (ता. ९)सादर केलेल्या अर्थसंकल्पात (Budget2023) शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी जाहीर केला. मात्र, हा प्रकार शेंगदाणा ठेवून देव्हारा मारण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.
भाव नसल्याने सोयाबीन, कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. तर, कांदा उत्पादक शेतकरीही भाव नसल्याने होरपळून निघाला आहे.
येवढे कमी की काय, साडेचार महिन्यांपूर्वी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पीक नुकसान झालेले जिल्ह्यातील तब्बल साडे आठ लाख शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत असून लम्पी स्कीनमुळे मृत्यू झालेल्या १०९३ जनावरांच्या मालकांना देखील अद्याप मदत मिळाली नाही.
राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणाऱ्या बीड जिल्ह्यात सरासररी दर दिड ते पावणे दोन दिवसांनी एक शेतकरी विविध संकटांमुळे आत्महत्या करत आहे. दोनच दिवसांपूर्वी तरुण कांदा उत्पादक शेतकऱ्यानेही भाव नसल्याने मृत्यूला कवटाळले.
जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे तब्बल दोन लाख ९७ हजार १२३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. याचा फटका जिल्ह्यातील तीन लाख ८७ हजार १३६ शेतकऱ्यांना बसला. तर, तर, सततच्या पावसामुळेही दोन लाख ८७ हजार हेक्टरांवरील पिकांना फटका बसून तब्बल चार लाख ६३ हजार ६०६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या भरपाईपोटी सरकारने ४१० कोटी रुपयांचा निधी तेव्हाच जाहीर केला. मात्र, ऑनलाईनच्या घोळात अद्याप शेतकऱ्यांना मदतीची रक्कम भेटली नाही.
तर, सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या चार लाख ६३ हजार शेतकऱ्यांना ४०० कोटी रुपये मदत देण्याच्या प्रस्तावाबाबत तर शासनाने अद्याप चकार शब्दही काढला नाही.
गुरुवारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केलेल्या असल्या तरी बीड जिल्ह्यात साडे आठ लाख शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहे. कपाशीचे दर घसरल्याने चार लाख क्विंटलहून अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे.
शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला किडे लागत आहेत. कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्याला नुसते पाणीच नाही धायमोकलून रडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणली आहे.
लम्पीमुळे १८४१ मृत; मदत फक्त ७४८ जनावरांसाठी
सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्यात गोवंशीय जनावरांमध्ये लंपी या त्वचा आजाराची लागण झाली. २८२ गावांतील २८ हजार ६४ जनावरांना हा आजार झाला. लंपीमुळे बीड जिल्ह्यात आतापर्यंत १८४१ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
सध्याही ८३६ जनावरे या आजाराने ग्रस्त असून ८९ जनावरे गंभीर आहेत. आतापर्यंत केवळ ७४८ जनावरांच्या मालकांनाच अनुदानाची रक्कम मिळाली आहे. अद्यापही १०९३ जनावरांचे मालक मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.