
Solapur Sugar Factory News : यंदाच्या २०२२-२३ च्या हंगामात विनापरवाना ऊस गाळप केल्याप्रकरणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोलापूर जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांना ४२ कोटी ४१ लाखाचा दंड केला आहे.
सोलापूरसह राज्यातील अन्य १४ कारखान्यांनाही अशाच प्रकारे दंड केल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण,ऊस गाळप आणि ऊस पुरवठा नियमन) आदेश १९८४ व त्यामध्ये झालेल्या सुधारणांनुसार हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांनी गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे.
साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या २८ जुलै २०२२ च्या परिपत्रकानुसार या कारखान्यांनी गाळप परवाना प्राप्त करून घेऊनच गाळप हंगाम सुरू करणे आवश्यक होते. पण तरीही गाळप परवाना न घेता २०२२-२३ चा हंगाम संबंधित कारखान्यांनी सुरू केल्याचे सुनावणीअंती स्पष्ट झाले आहे.
गाळप परवान्यातील अटींचा भंग करून विनापरवाना गाळप या कारखान्यांनी केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या कारखान्यांना प्रचलित कायदेशीर तरतुदींनुसार दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम संबंधित सर्व कारखान्यांना आदेश प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत शासकीय कोषागारात भरण्याचे साखर आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
सरकारच्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार एफआरपीची रक्कम व अन्य शासन निधीची कपात दिल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्यांना २०२२-२३ मधील ऊस गाळप परवाना द्यायचा नाही, असा धोरणात्मक निर्णय झाला होता.
तरीही काही कारखान्यांनी या निर्णयास वाटाण्याच्या अक्षता लावून शासनाची विविध देय रक्कम आणि थकीत एफआरपी देणे बाकी असतानाही परस्पर विनापरवाना ऊस गाळप सुरू केले होते.
‘भीमा’,‘जकराया’ला सर्वाधिक दंड
जिल्ह्यातील दंडात्मक कारवाई झालेले कारखान्यांमध्ये मोहोळच्या आष्टी शुगरला एक कोटी १२ लाख ६७ हजार ५०० रुपये, तिर्हेच्या सिद्धनाथ शुगरला सहा कोटी ५१ लाख ८७ हजार ५०० रुपये, चांदापुरीच्या ओंकार शुगरला ४१ लाख १४ हजार ५०० रुपये, करमाळ्याच्या मकाईला सात कोटी ९६ लाख ६७ हजार ५०० रुपये, अक्कलकोटच्या मातोश्री लक्ष्मी शुगरला एक कोटी १६ लाख ५२ हजार ५०० रुपये, सदाशिवनगरच्या श्री शंकर सहकारी साखर कारखान्याला एक कोटी ६१ लाख ४६ हजार ५०० रुपये आणि टाकळीसिकंदरच्या भीमा सहकारी कारखान्याला १३ कोटी ३ लाख ५५ हजार रुपये तर वटवटेच्या जकाराया शुगरला १० कोटी ५७ लाख २० हजार रुपये दंड करण्यात आला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.