
Kolhapur Election News : कोल्हापूर येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून (Shri Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory Election) कोल्हापुरात महादेवराव महाडीक गट व सतेज पाटील गटामध्ये सर्वसामान्य सभासदांना अस्वस्थ करणारी धुमश्चक्री सुरू आहे.
कारखान्याच्या कारभारापेक्षा या दोघांचे वैरत्वच ठळकपणे दिसून येत आहे. एकमेकाला खुन्नस देण्याचे प्रकार गेल्या पंधरा दिवसांपासून अव्याहतपणे सुरू आहेत.
कारखान्याच्या कारभार प्रश्नी चर्चा होण्यापेक्षा या दोन गटांतील राजकीय वैरत्वच दिसून येत असल्याने सर्वसामान्य सभासद कमालीचा नाराज झाला आहे. शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी तर कोल्हापुरातील प्रसिद्ध बिंदू चौकातच हे दोन्ही गट आमने सामने आले आणि एकमेकांच्या राजकीय उखाळ्या पाखाळ्या काढणे सुरू झाले.
‘निमित्त राजाराम चे खेळ वैरत्वाचा’ अशीच परिस्थिती सध्या कारखान्याच्या निवडणुकीवरून झाली आहे. महादेवराव महाडीक व आमदार सतेज पाटील यांच्या गटामध्ये प्रचंड ईर्षा आहे. ही ईर्षा प्रत्येक निवडणुकीत उफाळून येत असते.
जिल्हा दूध संघ (गोकुळ) महाडीक गटाकडून ताब्यात घेतल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी महाडीक यांची कोणतीच सत्ता कोल्हापुरात ठेवायची नाही असा चंग बांधून वर्चस्व दाखविण्यास सुरुवात केली. सध्या राजाराम कारखान्यावर महाडीक गटाची सत्ता आहे. हा कारखाना त्यांच्याकडून घेण्यासाठी सतेज पाटील गट जंग-जंग पछाडत आहे.
कारखान्याच्या प्रश्नापेक्षा पारंपरिक वैरत्वच आता ठळकपणे दिसून येत आहे. मुद्यावर आणि शेतीसमोर असलेल्या आव्हानांवर टीकाटिप्पणी होण्याऐवजी ही लढाई आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचली आहे.
विशेष करून अमल महाडीक आणि सतेज पाटील यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. सभा सोशल मीडियातून एकमेकांना खुन्नस देऊन वातावरण तापवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत.
खासदार धनंजय महाडीक यांनीही सतेज पाटील यांच्यावर जहरी टीका केल्याने प्रचार संपेपर्यंत आणखी यामध्ये भर पडत जाणार आहे. या सर्व गदारोळामध्ये कारखान्याच्या कारभाराविषयीची चर्चा मागे पडत आहे. ही बाब सभासदांना अस्वस्थ करत असल्याचे चित्र आहे.
या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २३ एप्रिलला सात तालुक्यांतील ५८ केंद्रांवर मतदान होणार आहे. २१ संचालक निवडून देण्यासाठी १३,४०९ ऊस उत्पादक सभासद व १२९ ब वर्ग सभासद असे एकूण १३,५३८ सभासद मतदानाचा हक्क बजावतील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.