
Solapur APMC News : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर, बार्शी आणि करमाळा या तीन बाजार समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.
त्यामुळे या आधी जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या निवडणुकीची धामधूम नुकतीच संपली. त्यानंतर आता सोलापूरसह या तीन बाजार समित्यांसाठीही निवडणूक रणधुमाळी रंगण्याची चिन्हे आहेत.
सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत जुलै २०२३ मध्ये पूर्ण होत आहे. तर करमाळा बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत ऑक्टोबर २०२३ मध्ये पूर्ण होत आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत प्राधिकरणाने पत्र १० मे रोजीच जिल्हा उपनिबंधकांना पाठवले आहे. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी मतदारांची यादी अपडेट करण्यासाठी बाजार समित्यांचे सचिव आणि संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना यासंबंधी पत्र काढले आहे.
या पत्रानुसार सोलापूर, बार्शी आणि करमाळा या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत सदस्यांची यादी तर विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकांची यादी संबंधित सहायक निबंधकांकडून घेण्यात येईल. त्यानंतर मतदार यादी तयार होईल.
या मतदार यादीवर दावे व हरकतींसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. यावरील सुनावणीनंतर मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल आणि मग शेवटी निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम घोषित होईल.
मुदतवाढीच्या प्रस्तावांचे काय
एकीकडे राज्य निवडणूक प्राधिकरणाने या बाजार समित्याच्या निवडणुकांसंबंधी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे सोलापूर आणि बार्शी या बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला पणन कायद्यातील तरतुदीनुसार सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव पणन संचालकांकडे सादर झाला आहे.
सोलापूर बाजार समितीच्या सभापतिपदी सत्ताधारी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि बार्शी बाजार समितीवर भाजप समर्थक आमदार राजेंद्र राऊत यांचे चिरंजीव रणवीर राऊत हे सभापती आहेत. त्यामुळे आता या प्रस्तावांचे काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.