पाकिस्तानमध्ये महागाईत आता वीज दरवाढीचा ‘शॉक’

भारताचा शेजारी देश श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तानची अर्थव्यवस्थादेखील आर्थिक संकटात सापडली आहे.
पाकिस्तानमध्ये महागाईत आता वीज दरवाढीचा ‘शॉक’
ElectricityAgrowon

इस्लामाबाद : भारताचा शेजारी देश श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तानची अर्थव्यवस्थादेखील (Pakistan Economy) आर्थिक संकटात सापडली आहे. पाकिस्तानमध्ये सत्तांतर झाल्यानंतर शाहबाज शरीफ (Shahbaj Sharif) यांच्यासमोर अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये महागाईचा (Inflation) कहर सुरूच असून, पेट्रोल दरवाढीनंतर आता वीज दरवाढीचा ‘शॉक’ नागरिकांना बसला आहे. पाकिस्तानमधील राष्ट्रीय विद्युत नियंत्रक प्राधिकरणाने मंगळवारी (ता. ३१) वीज दरांमध्ये ३.९९ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानात सध्या भारनियमन सुरू असून, ७ हजार मेगावॉट विजेची कमतरता जाणवत आहे.

राष्ट्रीय विद्युत नियंत्रक प्राधिकरणाकडून पाकिस्तानात जून २०२२ पासून नव्या दरांसह वीज बिलांचे वाटप केले जाणार आहे. जिओ न्यूजनुसार एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या बिलामधून इंधन समायोजन रक्कम वसूल केली जाणार आहे. वीजदरात ३.९९ रुपयांची वाढ केल्याने पाकिस्तानी जनतेवर ५८.५ अब्ज रुपयांचा बोजा पडणार आहे. वीज बिलांमध्ये १७ टक्के जीएसटीदेखील भरावी लागणार आहे. पाकिस्तान सरकारकडे वीजदरात ४.५ रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता; मात्र ३.९९ रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

पाकिस्तानातील अनेक वीज संयंत्र इंधन तेल, गॅस आणि कोळसा नसल्याने बंद करण्यात आले आहेत. विजेच्या कमतरतेमुळे देशातील अनेक भागांमध्ये १० ते १२ तास भारनियमन करण्यात येत आहे. पाकिस्तानला वीजपुरवठा करणाऱ्या चीनच्या कंपन्यांनीदेखील वीजबिलाची थकबाकी न दिल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला होता.

दरम्यान, पाकिस्तानने आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी चीन, सौदी अरेबियाकडे प्रयत्न करून पाहिले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ भारतासोबत पुन्हा एकदा व्यापार सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न करत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार २०१९ मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर थांबला आहे. पाकिस्तानदेखील श्रीलंकेप्रमाणे कर्जात अडकलेला आहे. पाकिस्तान सौदी अरेबियाकडून कर्ज घेण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी सौदी अरेबियाचा नुकताच दौरा केला होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com