शिक्षण, आरोग्य, रस्ते विकासावर भर

उपमुख्यमंत्री अजित पवार ः जिल्हा नियोजन समितीची बैठक
शिक्षण, आरोग्य, रस्ते विकासावर भर
Ajit Pawar NewsAgrowon

पुणे ः जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासकामात शिक्षण, आरोग्य आणि रस्ते आदी विकास कामांवर (Development Work) अधिक भर देण्यात येणार आहे. तसेच, ३३ कोटी ५७ लाख रुपयांचा अष्टविनायक विकास आराखडा (Ashtvinayak Development Plan) आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर आणि वढू येथील स्मारक आणि समाधीस्थळाच्या विकासासाठी २६९ कोटी ३४ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे रविवारी (ता. ५) जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्या वेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ‘‘सामाजिक उत्तरदायित्व निधी, जिल्हा परिषद आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २६ कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व तालुक्यांत आवश्यक तेथे अंगणवाडी बांधकामे करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा देण्यात येत आहेत. रस्ते विकासालाही गती देण्यात येणार आहे.’’

‘‘अष्टविनायक विकासासाठी अंदाजपत्रकात २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पुरवणी मागण्यातही अधिक निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच, छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काम सुंदर आणि भव्य कसे होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. स्मारक आणि समाधीस्थळाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता वाहनतळाचे योग्य नियोजन करावे, लोकप्रतिनिधींनी याबाबत सूचना केल्यास त्यांचाही अंतर्भाव करण्यात येईल,’’ असे श्री.पवार या वेळी बोलताना म्हणाले. या वेळी बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com