
महारुद्र मंगनाळे
लम्पी रोगामुळे (Lumpy) अनेक दिवस जनावरांचे बाजार बंद होते. तीन आठवड्यापासून पुन्हा बाजार (Animal market) सुरू झाला. मला एक म्हैस आणि खोंड विकायचं होतं. त्यातही ही देखणी म्हैस शक्य तेवढ्या लवकर विकायची होती. ही म्हैस मारकी आहे.
पाच महिन्यांपूर्वी म्हशी चारत असताना, ही म्हैस (buffalo) मला मारायला पळत आली होती. तेव्हाच मी विकायचं ठरवलं होतं. पण तेव्हा ती चार महिन्यांची गाभण होती.
तीस हजारांपर्यंत विकली असती.आणखी चार -पाच महिने तिला सांभाळू असं गडी बोलला. त्यामुळं ती राहिली. तिनं मला बघितलं की, बांधलेल्या ठिकाणी ती मारण्याचा पवित्रा घ्यायची.
मी सावध राहायचो. इतरांनाही ती जवळ येऊ देत नव्हती. वामन आणि नरेशच तिला चारापाणी करायचे. तिला दहावा महिना लागल्याने विकणे गरजेचे होते.
दोघे-तिघेजण येऊनही गेले पण आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं, नवीन माणसांना ती मारते. तिला बाजारला नेणं हाच पर्याय होता.आज जांबच्या बाजारला जायचं ठरलं होतं.
काल सायंकाळी जांबच्या बाजारात म्हशींचा व्यापार करणारे कापसे शेतात शेडवर आले. त्यांना म्हैस पसंद पडली. ती मारकी आहे,याचा अनुभवही त्यांनी घेतला. तिला बाजारातही विकणं मला अवघड वाटत होतं.
आमच्या अपेक्षित किमतीपेक्षा आठ हजार कमी किमतीला मी ती म्हैस त्यांना विकली. आज सकाळी ही म्हैस त्यांच्या गावी सोडली व खोंड घेऊन जांबला गेलो.
लहानपणी हे लाल कंधारी खोंड खूप देखणं वाटायचं.अनेक महिने आम्ही त्याला चरायला मोकळं सोडू शकलो नाही. त्याची वाढलेली नख काढायला चार महिने माणूस भेटला नाही. त्यामुळं त्याचे मागचे पाय थोडे वाकडे बनले. त्याचं डोकंही थोडं मोठ आहे.
पण शरीराने मजबूत. भर उन्हात चार तास बाजारात फिरलो. खोंडाजवळ वामन होता. दुपारपर्यंत फक्त एक गिऱ्हाईक सतत चौकशी करून जात होतं.
मी त्याच्याशी बोललो तेव्हा तो खाटीक असल्याचं लक्षात आलं. मी त्याला सांगितलं, हे खोंड २५ हजाराच्या खाली देणार नाही. तो गेला.
दिड-दोन वर्षे सांभाळलेलं खोंड थेट कटाईसाठी विकायची हिंमत झाली नाही. शेवटी हे खोंड म्हैस घेतलेल्या कापसे या व्यापाऱ्यालाच दिलं.
बाजारात म्हशींच्या किमती चढ्या होत्या. मात्र बैल खरेदीसाठी परप्रांतीय गिऱ्हाईक नव्हतं. खूप शेतकऱ्यांशी बोललो. का बैल विकताय? बैलाची शेती करणार नाहीत का?...
प्रत्येकाचं उत्तर एकच..जनावर संभाळणं लई आवघड झालयं सायेब...मी चार वर्षांपूर्वी हळूहळू जनावरांचे बाजार संपतील,असं ॲग्रोवनच्या लेखात लिहीलं होतं. त्याचा प्रत्यय येतोय.
बाजारात येऊन, बांधलेल्या खोंडासमोर तासभर बसलो. उन्हानं पाठ शेकून निघाली होती. हंडरगुळीचे दलाल मित्र अशोक पाटील यांच्यासोबत सगळा बैल बाजार पालथा घातला.
गेली बारा वर्षे सतत बाजार फिरतोय. म्हशींची खरेदी-विक्री करतोय. या निमित्ताने शेतकऱ्यांशी बोलतोय... दरवर्षी असं वाटतं की,गेलेलं वर्ष बरं होतं...
आज मी थोडा भावनिक बनलो होतो. बाजारशी जोडलं गेलेलं हे जिव्हाळ्याचं नातं मी संपवतोय. पशूपालन काही काळासाठी तरी थांबवतोय. फेब्रुवारी मध्यापर्यंत माझ्याकडं फक्त दुध देणारी एक म्हैस असेल. जनावरांसाठी तयार केलेले चार पत्र्याचे शेड रिकामे राहतील...
सद्य:स्थितीत पशूपालन शक्य नाही, हे मला कळून चुकलयं. अशोक पाटील माळकरी, धार्मिक आहेत. शेतकऱ्यांकडून गाई-बैल विकत घेऊन खाटकाला विकणाऱ्या विविध दलालांचं कसं वाटोळं झालं, याचे किस्से ते नेहमी सांगत असतात.
आजही काही किस्से त्यांनी सांगितले.ते ऐकून मी त्यांना म्हटलं, तुमच्या बोलण्यावर मी अविश्वास दाखवत नाही. तुम्ही म्हणता ते खरंही असेल...
पण मला याचं उत्तर काही सापडत नाही..खाटकांना गाई-बैल विकणाऱ्यांचं वाटोळं होत असेल तर,या गाय-बैलांचं मांस परदेशी पाठवून करोडो रूपये कमावणाऱ्या उच्चवर्णीय व्यापाऱ्यांचं का वाटोळं होत नाही. त्यांची तर दिवसेंदिवस आर्थिक प्रगतीच होताना दिसतेय....
ते काही मी सांगू शकत नाही बघा सर...एवढं बोलून ते शांत राहिले. त्यांना शिरूर बसस्थानकावर सोडून रुद्रा हटला आलो तेव्हा मन निराशेनं काळवंडून गेलं होतं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.