Epidemic Diseases : साथीचे रोग प्लेग ते कोरोना

डिसेंबर १८९६ मध्ये पुण्यात प्लेगची साथ सुरु झाली आणि अनेक कुटुंबांची वाताहत झाली. १८९६ ते १९१२ पर्यंत प्लेगचे हे तांडव सुरु होते. या तेरा वर्षात भारतात एक कोटी २० लाख लोकांचा तर फक्त पुण्यात एकूण ५६ हजार एवढ्या लोकांचा मृत्यू झाला.
Epidemic Diseases
Epidemic DiseasesAgrowon

शेखर गायकवाड

ई-मेल - shekharsatbara@gmail.com

डिसेंबर १८९६ मध्ये पुण्यात प्लेगची साथ (Plague Epidemic) सुरु झाली आणि अनेक कुटुंबांची वाताहत झाली. १८९६ ते १९१२ पर्यंत प्लेगचे हे तांडव सुरु होते. या तेरा वर्षात भारतात एक कोटी २० लाख लोकांचा तर फक्त पुण्यात एकूण ५६ हजार एवढ्या लोकांचा मृत्यू (Death Due To Plague) झाला. १९०१ मध्ये राज्यातील आरोग्य खात्यात सुधारणा होऊन म्युनिसिपल ॲक्टनुसार (Municipal Act) नगरपालिकांना स्वतंत्र आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. त्या काळात जन्म-मृत्यूच्या नोंदी अचूकपणे केल्या जात नसत. अंत्यसंस्कारासाठी मृत्यूची नोंद बंधनकारक केल्यामुळे मृत्यूची नोंद ही जन्मापेक्षा अचूक असे. त्याकाळी अंदाजे ३० टक्के लोक जन्माची नोंद करायचे नाहीत.

Epidemic Diseases
Lumpy Skin : देशभरात ‘लम्पी’मुळे सुमारे ५७ हजार गायींचा मृत्यू

१८९२ मध्ये पहिल्यांदा नगरपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या झाडूवाल्या बायकांना कोणाच्या तरी जन्माची बातमी कळवल्याबदल अर्धा आणा बक्षीस देण्याची पद्धत सुरु झाली. त्या काळात लहान मूल जन्माला आल्यानंतर दाराला कडुलिंबाची माळ किंवा आंब्याचे डाहाळे बांधले जायचे. मूल जन्मल्यानंतर पाच दिवसांनी सटवीची पुजा करायला कुटुंबीय बाहेर पडत असत. त्यामुळे पहिली बातमी झाडूवाल्या बायकांना समजत असे.

Epidemic Diseases
Lumpy Vaccination : सोलापुरात १३ गावांत लसीकरणाला वेग

प्लेगच्या काळात एकमेकांना संसर्ग होऊ नये म्हणून गावातील गर्दीचे घर सोडून लोक रानातल्या वस्तीला राहायला जायचे. कित्येक लोकांना जवळच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावरून परत येतानाच काखेमध्ये गोळा यायचा. सप्टेंबर १९०० च्या केसरीमध्ये त्या वेळेच्या परिस्थितीचे खालीलप्रमाणे चित्रण करण्यात आले आहे. "बाहेर जावे तर खाण्यास मिळण्याची पंचाईत व घरात राहावे तर ते प्लेगने दूषित. तात्पर्य इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती होती. तेव्हा भुके मरण्यापेक्षा ईश्वरावर भरवसा ठेवून आपल्या कुटुंबातच काय होईल ते होईल अशा समजुतीने ते घर सोडण्यास नाखूष असतात.

प्लेगची साथ पसरू नये म्हणून दूषित घरे जंतुनाशक द्रव्याने धुणे व प्लेगच्या रोग्यांना शहराबाहेर हाकलने ही कामे इंग्रज सैनिकांकडून सुरू झाली. हे ब्रिटिश सैनिक सामान्य लोकांशी अरेरावी आणि धसमुसकीने वागत. प्लेगचा गोळा म्हणजे मरीआईचा कोप आहे अशी अडाणी लोकांची समजूत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मरीआईच्या नावाचं कोंबडी, बकरी देण्यास मग्न होती. जसजसा शिक्षणाचा प्रसार वाढला तस तशी लस टोचवून घेण्याची संख्या वाढू लागली. १९११-१२ मध्ये प्लेगच्या मृत्यूंची संख्या कमी होऊ लागली. १९३२ मध्ये पुन्हा पुण्यामध्ये या साथीने डोके वर काढले.

Epidemic Diseases
Lumpy Vaccine : ‘लम्पी’ लसीसाठी पैसे घेणारी पशुधन पर्यवेक्षक निलंबित

१९३३ मध्ये एके दिवशी डॉ. नायडू इस्पितळात प्रेते ठेवायला जागा राहिली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. घुशी आणि उंदीर यांची संख्या वाढल्यामुळे मूषक संवाहर खात्याची स्थापना झाली. २००० पेक्षा जास्त उंदरांचे पिंजरे शहरात लावण्यात आले व उंदीर पकडून आणणाऱ्यास एक आना बक्षीस देण्यास सुरवात झाली. उंदरांच्या बिळात विषारी वायू सोडून सायनोगॉसिंग प्रयोग देखील करण्यात आला. १९५० पासून भारत भर डी.डी.टी. मारण्याची पद्धत सुरु झाली.

देवीची साथ ही गायीमध्ये देखील येते व धार काढणाऱ्या गवळ्याच्या शरीरात देखील जाते. मात्र, त्यामुळे गवळी लोकांना देवी येत नाही हे निदर्शनास आले. या गोष्टीवर अधिक संशोधन करून १७९६ मध्ये एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने देवीची लस शोधून काढली. भारतात इंग्लंडमधून ही देवीची लस मागविण्यात आली. सुरुवातीला लोकांच्या पूर्वगृहीत दृष्टीकोनामुळे लोक लस घेत नसत. इंग्रज अधिकाऱ्यांच्या व पेशव्यांच्या सहकाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबातील काही लोकांना लस टोचल्यानंतर लोकांचा विश्वास बसू लागला. त्यानंतर 'देवीच्या दोन फुल्या कमी आहेत, आम्हास चार फुल्या करा' अशी मागणी आली. १८८२ ते १९५७ पर्यंत दरवर्षी ३० ते १०० पर्यंत दरमहा मृत्यु पुण्यात देवीमुळे झाले.

जगभरात स्पॅनिश फ्ल्यू प्रमाणेच १९१८ मध्ये भारतात फ्ल्यू किंवा इंन्फ्ल्युएंझाची साथ आली. या साथीत सुमारे १७ ते १८ दशलक्ष लोक भारतात मृत्युमुखी पडले. त्यामुळे १९११ ते १९२१ या दशकातच फक्त भारताची लोकसंख्या जनगणनेत कमी झाली! पुन्हा १९५७ ला फ्ल्यू, १९७४ ला कांजिण्याची साथ, १९७७ ला रशियन फ्ल्यू, मधेमधे पोलिओ, सार्स हिपॅटीटीस, यलो फिवर, पटकी, स्वाईन फ्ल्यू, एचआयव्ही, इबोला, डेंग्यु, घटसर्प, हिवताप, मलेरिया, निपाह व्हायरस अशा अनेक साथी आल्या. १८९९-१९२३ अखेर कॉलरा, १८९९-१९१३ प्लेग, १९१८-१९२० फ्ल्यू व मुंबई फिवर, १९५७-१९५८ इन्फ्लुएंझा, १९७४ मध्ये कांजिण्याची साथ, १९९८ मध्ये प्लेग, २००६ मध्ये एच५एन१, २००९ मध्ये स्वाईन फ्ल्यू, मार्च २०२० पासून कोरोना, २०२२ मध्ये ओमिक्रॉन, आता मंकी पॉक्स, टोमॅटो पॉक्स अशा अनेक साथीच्या रोगाचा फैलाव झाला.

मार्च २०२० पासून भारतात वेगाने पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे, लॉकडाउन, व्यवसाय बंद, संचारबंदी, रोजगारावर परिणाम, जनजीवन विस्कळीत, हवाईवाहतूक बंदी, वर्क फ्रॉम होम, असा सर्वव्यापी परिणाम जाणवला, संपूर्ण भारतात कोरोनामुळे सप्टेंबरपर्यंत ५.२८ लाख मृत्यू तर महाराष्ट्रात १.४८ लाख मृत्यू झाले. जगण्याच्या पद्धतीचाच पुनविचार गंभीरपणे करायला लावणारे हे संकट मानवी बदलांना शिस्तबद्धतेचे कवच निर्माण करेल का हे पहायचे!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com