Maharudra Manganale: लिंबाचं एक झाडसुध्दा माणसाचं जगणं समृध्द करतं...

उन्हाळा सोडला तर लिंबू सहज उपलब्ध होतं. त्याची किंमतही किरकोळ असते. तरीही दररोजच्या जेवणात क्वचित लिंबू असायचं.
Lemon
LemonAgrowon

- महारूद्र मंगनाळे

Lemon Story : लिंबू आवडत नाही किंवा मी लिंबू कधीच खात नाही, असं म्हणणारा माणूस अद्याप मला भेटलेला नाही. बालपणापासूनच्या माझ्या लिंबाबाबतच्या आठवणी आहेत.

पाचवी-सहावीला असताना बरेच महिने आम्ल पित्ताचं औषध म्हणून लिंबू खाल्लं. शेणगवरीच्या आरावर लिंबू ठेऊन त्यावर हळद अन् मीठ टाकायचं. ते फसफसून आलं की, गरम असतानाच खायचं.

चव छान लागायची. या औषधानं पित्त संपलं नाही. पित्तावर किती औषधं, गोळ्या खाल्ल्या, त्याची मोजदाद नाही. रुद्राहटला राहायला आलो आणि अनेक वर्षांचा हा त्रास विनाऔषधाचा गेला.

उन्हाळा सोडला तर लिंबू सहज उपलब्ध होतं. त्याची किंमतही किरकोळ असते. तरीही दररोजच्या जेवणात क्वचित लिंबू असायचं.

फ्रीज आल्यानंतर ही परिस्थिती थोडीशी बदलली. तरीही क्वचित कोणाच्या घरात बारमाही लिंबू उपलब्ध असेल.

आमच्याकडंही तीच परिस्थिती. बाजारात गेलं तरच लिंबू येणार. अनेक वर्षे बाजार कुठे आहे हेच मला माहित नव्हते. सवितालाही बाजाराची आवड नाही.

लोकमनचा मुख्य संपादक म्हणून काम करताना पत्रकारितेशिवाय दुसरा कुठलाच विषय डोक्यात नसायचा. मुगाचं वरण, चपाती किंवा भात हा आवडता मेन्यू होता. टोमॅटोही भरपूर असतं.

त्यामुळं लिंबाची आठवण फार होत नसावी. तरीही पोटाचा त्रास झाला की, लिंबू सोडा आठवायचाच.

Lemon
Maharudra Manganale: ...म्हणून खुल्या शेळीपालनाला माझा विरोध

आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी रात्री मित्रांसोबत बाहेर जेवायला जायचो. तिथं कांदा, लिंबूची भरलेली प्लेट असायची.

त्याचा पुरेपुर वापर व्हायचा. लिंबाचं आहारातील महत्त्व माहित असल्याने, ते दररोजच्या आहारात राहावं, असं वाटायचं पण ते शक्य व्हायचं नाही.

२०१२ मध्ये रुद्राहटसमोर विविध फळांच्या बागेचं नियोजन केलं तेव्हा लिंबाची तीन झाडं लावली. काही वर्षांनी आणखी एकाची भर पडलीय.

यापैकी एक झाड पटकन वाढलं. चौथ्या वर्षांपासून त्याला लिंबं आली. याचं वैशिष्ट्य म्हणजे याला बारा महिने फळ असतं. याची उंची कमी पण खूप पसरलंय.

दुसरं झाड गेल्या वर्षी अचानक वाढलं. काही लिंबं लागली. या वर्षात हे झाड चौफेर वाढलयं. भरपूर लिंबू आणि मोहोर चालू आहे. याची लिंबंही मोठी आहेत. एका वेळेस एक लिंबू संपणं अवघड.

तिसरं झाडही पाच वर्षे खुरटंच होतं. तीन वर्षांपूर्वी आमच्या लाडक्या टायसन या कुत्र्याला या झाडाच्या बुडाला चिरशांती दिली होती. गेल्या चार-पाच महिन्यांत हे झाड जमिनीलगत गोलाकार पसरलंय.

त्याला हिरवीगार लुसलुशीत पानं आहेत. तेज असं की, पाहिल्यानंतर कच्ची पानं खाण्याचा मोह व्हावा. गंमत म्हणजे, पहिल्यांदा या झाडाला दोनच लिंबं लागली होती.

माझ्यासाठी अधून मधून उपलब्ध होणारं, मुद्दाम बाजारात जाऊन आणावं लागणारं लिंबू, रुद्राहटला राहायला असल्यापासून सहज उपलब्ध आहे.

कधी सकाळीच पाण्यात पिळून पितो. जेवणात असतंच. उन्हात फिरून आलो, काम करून थकवा आला की, सहज लिंबू पाणी घेतोच. सायंकाळच्या काळ्या चहात लिंबू असतोच. बागेत फिरताना पिवळी पडलेली ताजी लिंबं पाहूनच फ्रेश मुड बनतो.

आता आमच्यासाठी २४ तास ताजा लिंबू उपलब्ध आहे. जमेल तसा मित्र, नातेवाईकांकडेही तो पोचता होतो. एक लिंबाचं झाडसुद्धा माणसाचं जगणं समृद्ध करतं. याचा अनुभव घेतोय. आमच्याकडं तर लिंबाची चार झाडं आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com