
शेखर गायकवाड
पूर्वीच्या पिढ्यांचे शिक्षण (Education) या विषयाचा आढावा घ्यावयाचे ठरविले तर सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर येते ती मास्तरांनी दिलेली शिक्षा. अंदाजे १९८० पर्यंत पूर्वीच्या सर्व पिढ्यांनी शाळेमध्ये गुरुजींचा कधी ना कधी प्रसाद घेतला आहे. आजही कित्येक लोकांना शाळेत काय शिकवले ते आठवत नाही पण शाळेत खाल्लेला मार मात्र आठवतो. जगाच्या शिक्षण पद्धतीमध्ये (Education System) इंग्लंडचा प्रभाव पहिल्यापासून राहिला आहे. ‘इन लोको पॅरेंटीस’ नावाच्या कॉमन लॉ कायद्यानुसार इंग्लिश बोलणाऱ्या सगळ्या जगामध्ये आई-वडिलांना असणारे सर्व अधिकार शिक्षकांना आहेत असे मानले गेले. असेच तत्त्व चिनी भाषा बोलणाऱ्या देशांमध्ये पण होते.
अनेक शिक्षकांची शिक्षा देण्याची पद्धत पण वेगवेगळी असायची. एखादे शिक्षक (Teacher) जेवढ्या चुका तेवढ्या वेळा तळहातावर छडीने मारायचे. वर्गात मारामारी करणाऱ्या दोन्ही मुलांना कधी कधी एकमेकांच्या गालात मारायची संधी मिळायची. शाळेत पी.टी.च्या शिक्षकाला विद्यार्थी सर्वांत जास्त घाबरायचे. मोठ्या छडीने किंवा काठीने पाठीवर किंवा पिंढरीवर मारायचा छंद अनेक शिक्षकांना असायचा. बाकड्यावर डोके वाकवून एक चापट पाठीवर व एक डोक्यावर तबल्यासारखे रपारपा मारणारे पण मास्तर होते.
शिक्षिका सुद्धा यामध्ये मागे नसायच्या. मस्ती करणाऱ्या मुलांना डस्टर (Duster) फेकून मारणे किंवा लक्ष नसणाऱ्या मुलाला खडू फेकून मारणे हे आमच्या वर्गातील एका शिक्षिकेला फार आवडत असे. जास्त मार दिला तर त्याच रात्री गुरुजींची छडी गायब करण्याचे कसब काही मुलांकडे होते. टेबलवर हात ठेवायला लावून डस्टरने हाताच्या पंजावर मारले जायचे. हुशारी करून हात काढून घेतला तर डबल मार बसायचा. कंबरेला किंवा पोटाजवळ दोन्ही बोटे दुमडून चिमटा घेताना काही मास्तरांना फार आनंद होत असे.
बहुसंख्य मुले वर्गात झालेली शिक्षा घरी सांगत नसत. स्वत:च्याच तोंडाने शिक्षा झाली सांगायला त्यांना कसे तरी वाटत असे. नंतरच्या काळात मार खाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोडगेपणा निर्माण होऊ लागला. प्रत्येक वर्गात दोन-तीन विद्यार्थी असे असत ज्यांच्या बाबतीत एक वेळेस शिक्षकांचे हात दुखतील, परंतु मुलांवर काही परिणाम होत नव्हता. काही मुले मास्तरच्या सायकलची हवा घालवून शिक्षेचा बदला घेत असत. मराठीतील अनेक साहित्यिकांनी मार खाल्ल्याची आठवण लिहिली आहे. प्रसिद्ध लेखक व इतिहासकार सेतू माधवराव पगडी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेला हा परिच्छेद पाहा.
‘‘असा हा मास्तर, आम्ही कोडंगल सोडून गेल्यावर त्याचा आणि आमचा संबंध सुटला, तो पुढे कुठे कुठे भटकला कोण जाणे ! इ.स. १९२४ मध्ये वडील परांड्यास (उस्मानाबाद जिल्हा) होते. माझा धाकटा भाऊ गुरुमध्व याला वडिलांनी माझ्या आईचे मावसभाऊ धारूरचे देशपांडे यांच्याकडे शिक्षणासाठी म्हणून काही दिवस ठेवले.
धारूरला देशपांड्यांकडे हाच विनायकराव मास्तर खासगी शिक्षक म्हणून लागला होता. माझ्या बंधूना त्यानेच शिक्षण दिले. पण त्यापायी त्यांचे विलक्षण हाल केले. बाराखड्या काढायला शिकविताना तो बंधूंना विस्तवाचा चटका देई, तर कधी शेंडी उपटी, तर कधी विहिरीच्या तोंडाशी नेऊन त्यांना आत ढकलू पाही.
माझा भाऊ घरी आला तेव्हा अगदी मरू पडलेला दिसला. तो साध्या साध्या गोष्टीने भेदरल्यासारखा होई. मी त्याला बाराखड्या काढण्यास सांगितले की तो म्हणे, विस्तवाचा ‘ग’ काढू , का विहिरीत ढकलण्याचा ‘म’ काढू, का खोड्यात अडकल्याचा ‘क’ काढू? मला त्याचे बोलणे समजेना, मग त्याने मला सांगितले, ‘ग’ शिकविताना विनायकराव मास्तरने येथे डागण्या दिल्या, ‘म’ शिकविताना मला विहिरीत ढकलण्यासाठी तो मला घेऊन गेला, ‘क’ शिकविताना त्याने मला खोड्यात अडकवून ठेवले, तेव्हा मला त्याच्या बोलण्याचा उलगडा झाला.
‘‘विनायकराव हा पन्नास -पंचावन्न वर्षांचा होता. त्याचा चेहरा उग्र होता. त्याने झुबकेदार मिश्या आणि कल्ले राखले होते. त्याच्या इतका मारहाण करणारा शिक्षक मी आयुष्यात पाहिला नाही. लहानसहान गोष्टींवरून तो आम्हा मुलांना बेदम झोडपून काढी. त्याने आमचे इंग्रजी चांगले करून दिले. पण गणिताकडे अगदी दुर्लक्ष केले. विनायकरावाच्या मारहाणीची आम्ही विलक्षण धास्ती घेतली होती. रात्री झोपेतसुद्धा आम्ही दचकून जागे होत असू. बरे, या सर्व गोष्टी वडिलांपाशी सांगण्याची सोय नव्हती. जितका मार जास्त बसेल तितकी विद्या चांगली येईल अशी त्यांची समजूत होती! पण आई मात्र या दु:खाने कळवळून जाई.’’
इजिप्त, चीन, ग्रीस, रोम येथे शैक्षणिक शिस्तीसाठी व न्यायासाठी मुलांना शिक्षा देणे विधिसंमत होते. १८६० मध्ये इंग्लंडमध्ये शिक्षकांनी मारल्यामुळे रेनिगाल्ड नावाचा मुलगा मरण पावला. १९८९ मध्ये बालकांच्या हक्कांचे रक्षण करणारा आंतरराष्ट्रीय करार झाला. २०२१ अखेर जगातील ६३ देशांनी लहान मुलांना शिक्षा देण्यास बंदी घातली आहे.
भारतात शाळा प्रशासन (School Administration) व शिक्षकांनी (Teachers) विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यास बंदी आहे. शालेय जीवनात भूमिती, त्रिमिती, हायपरबोला, पॅराबोला, रेषीय समीकरणे, घातांक, वर्गमूळ हे कशासाठी शिकलो हे कधीही कळाले नाही. बदलत्या ग्रामीण महाराष्ट्राचा आढावा घेताना शाळा, शिक्षक व मास्तरांचा खाल्लेला मार याची एकाच वेळी आठवण झाल्याशिवाय मात्र राहत नाही. कदाचित पुढे समाजात वावरताना हा मारच उपयोगी आला असे वाटून गेल्याशिवाय राहत नाही.
ई-मेल- shekharsatbara@gmail.com
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.