दर्जेदार, जातिवंत बियाण्याला अनन्यसाधारण महत्त्व

शेती नियोजनामध्ये जमीन, हवामान, बियाणे, पेरणी, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, पीक संरक्षण, पीक काढणी, मळणी, साठवण व विक्री हे महत्त्वाचे घटक आहेत. यापैकी सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे बियाणे. कारण बियाणे शुद्ध व दर्जेदार असल्याशिवाय इतर बाबींवर केलेल्या खर्चाचा पुरेसा मोबदला मिळत नाही. सध्या बियाण्यांमध्ये मोठे संशोधन होत आहे. आपल्या राज्यात आणि देशात सरकारी तसेच खासगी स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या पिकांचे बियाणे संवर्धन, संरक्षण, संशोधन करत आहेत. या क्षेत्रामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे.
दर्जेदार, जातिवंत बियाण्याला अनन्यसाधारण महत्त्व
Seed Agrowon

दरवर्षी शेतकऱ्यांच्या कमी प्रतीच्या बियाण्याबाबत (Seed Shortage) हजारो तक्रारी असतात. शेतकऱ्यांना चांगले बियाणे (Quality Seed) न मिळाल्यामुळे त्यांनी केलेल्या कष्टाचा, खर्च केलेल्या पैशांचा पुरेपूर मोबदला मिळत नाही. आणि पर्यायाने त्यांचा शेती व्यवस्थापन (Agriculture Management) व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. प्राचीन काळात भारतीय शेतकरी बियाण्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण (Self Sufficient In Seed) होता. निसर्ग हा स्वतःच वनस्पतीच्या नवनवीन जाती आपल्या नैसर्गिक पद्धतीने निर्माण करीत होता. यात नैसर्गिक सरळ जातीमधील कस, चव, औषधी गुण इत्यादी कायम होती.

आपल्या देशात हजारो पुरातन बियाण्यांची लागवड केली जात होती. त्यापैकी काही जातींचे उत्पादन आजच्या संकरित जातीपेक्षा जास्त होते. दरवर्षी जाती शुद्ध स्वरूपात निवड पद्धतीने शेतकरी राखत होते. ते कौशल्य पिढ्यान् पिढ्या अवगत झालेले होते. नैसर्गिक जातींमधील कस हा दर्जेदार होता. तज्ज्ञांनी संकरीकरणातून विविध जाती विकसित केल्या. हे होत असताना पुरातन देशी जातींच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाले. संकरित जातींना अतिरिक्त अन्नघटक पुरवल्याशिवाय त्या भरघोस उत्पादन देऊ शकत नाहीत. त्यामुळे रासायनिक खते, सूक्ष्म द्रव्ये देण्याची शिफारस करण्यात आली. संकरित जाती या कीड, रोगाच्या प्रादुर्भावाला संवेदनशील असतात. त्यामुळे रासायनिक कीडनाशकांच्या फवारणी शिफारस करण्यात आली. यातून शेतीमाल उत्पादनाचा खर्च वाढत गेला.

पारंपरिक जातींचे संवर्धन महत्त्वाचे ः

पिकांचे पारंपारिक बियाणे जास्त उत्पादन देत नाही, त्यांची गुणवत्ता निकृष्ट असते, त्याकरिता संकरित बियाणे, अधिक उत्पादन देणारे बियाणे, रोग प्रतिकारक्षम बियाणे या उद्देशाने बाजार व्यवस्थेमध्ये बियाणे विक्रीसाठी आली. यातून शेतकरी बाजार व्यवस्थेवर अवलंबून राहू लागला. या प्रक्रियेमधून मात्र शेतकऱ्यांची स्वयंपूर्णता नष्ट झाली, शेतकरी पूर्णपणे परावलंबी झाला. पूर्वी शेतकरी बियाण्याचे महत्त्व आपली जमीन, पाण्याची उपलब्धता, स्थानिक हवामान, विविध जातींमधील कस, पौष्टिकता, चव, औषधी गुण, सुगंधीपणा इत्यादी दर्जेदार व शाश्‍वत गुणधर्म अभ्यासून लागवड करत होता. यामध्ये मिश्र पद्धती, आंतरपीक पद्धती, पिकाची फेरपालट व इतर गरजांचा आधार घेऊन बियाण्यांची निवड करीत होता. तसेच बियाणे प्रक्रिया, उगवणक्षमता, तपासणी, बियाणे प्रक्रिया, कीड व्यवस्थापन आणि बियाणे साठवणूक आदी बाबी काळजीपूर्वक करून बियाणे संवर्धन व संरक्षण सोबत कृषी जैवविविधता टिकवून ठेवण्यात शेतकऱ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

पारंपरिक जातीमध्ये येथील स्थानिक वातावरण टिकाव धरण्याची तसेच रोग आणि किडींबाबत प्रतिकार करण्याची करण्याची नैसर्गिक क्षमता होती. काही जातींमध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म अस्तित्वात होते. त्यामुळे आजारी व्यक्तींना आहारात यांच्या आवर्जून समावेश केला जायचा. काही जाती सुगंधी तर काही दुष्काळाचा सामना करणाऱ्या होत्या. काही जास्त दिवसाच्या तर काही कमी दिवसांत येणाऱ्या होत्या. काही बारीक तर काही ठोकळ. अशा विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण होत्या. या पारंपरिक जाती उंच वाढणाऱ्या असल्यामुळे जनावरांना भरपूर चारा मिळायचा आणि शेतकऱ्यांना पशुधन सांभाळण्यासाठी पूरक ठरायच्या.

बियाणे संवर्धनातील योगदान ः

१) डॉ. रिच्छांरिया यांनी पूर्व भारतात विशिष्ट भात जातींच्या संवर्धनाचे मोठे काम केले आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्तराखंडमधील ‘बीज बचाव आंदोलन’ आणि तेलंगणामध्ये डेक्कन विकास सोसायटीद्वारे दक्षिण भारतात भरड धान्य विकासाचे उल्लेखनीय काम झाले आहे. तसेच कर्नाटक, तमिळनाडूमध्ये ‘ग्रीन फाउंडेशन'द्वारे पारंपारिक जातीचे संवर्धन तसेच पश्‍चिम बंगाल आणि ओडिशामध्ये डॉ. देबाल देव यांनी वृही बीज बँक मोठ्या स्तरावर उभी केली आहे.

२) कर्नाटकमध्ये ‘सहज समृद्ध' नावाची पारंपरिक बियाण्याची कंपनी उभी झाली आहे. त्याची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते.

३) आंध्रप्रदेशमध्ये शासन व स्थानिक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून स्थानिक बियाण्याची शेतकरी उत्पादन कंपनी प्रभावीपणे काम करत आहे.

४) महाराष्ट्रामध्ये २०१४ ते २०१९ पर्यंत महाराष्ट्र जीन बँक प्रकल्पांतर्गत ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ (भंडारा), बायफ (पुणे), शेती परिवार कल्याण संस्था (आटपाडी), लोकपंचायत (नगर), संस्कृती संवर्धन मंडळ (नांदेड) आणि आयआयआरडी (औरंगाबाद) या संस्थांनी स्थानिक पारंपरिक बियाणेसंवर्धन, पुनरुज्जीवन, त्यांचा टिकाऊ वापर, लोकांच्या ज्ञानाचे जतन, मूल्यवर्धन व विक्रीच्या कार्यप्रक्रियेची दिशा निश्‍चित केली आहे. त्या ज्ञानाचा वापर करून स्थानिक पातळीवर बियाणेनिर्मिती होऊ शकते.

समुदायाच्या पुढाकाराने बियाणे संरक्षण पद्धती ः

१) गावाची निवड करणेः शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करून पायाभूत माहिती मिळविणे. त्यात शेत पद्धती बियाणे विविधता या संबंधी गाव बैठका घेणे.

२) समूहाद्वारे बियाणे सर्वेक्षण आणि नमुने गोळा करणे. बियाणे प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन.

३) वेगवेगळ्या स्त्रोतांद्वारे माहिती, आकडेवारी संग्रहण करणे.

४) बियाणे प्रचारकाद्वारे नमुने संग्रहण.

५) गाव पातळीवर बियाणे बँक उभारणी.

६) शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्याक्षिके घेऊन बियाणे शुद्धीकरण.

७) सहभागी पद्धतीने बियाण्याची निवड.

८) समुदाय स्तरावर बीज बँकेची स्थापन.

९) समुदाय स्तरावर बियाणे उत्पादन घेणे.

१०) बियाणे विनिमय व विक्री व्यवस्था उभी करणे.

आपण आपले बियाणे निर्मिती करूयात...

१) आपण शक्य असल्यास पारंपरिक बियाण्यांचा शोध घ्यावा. उपलब्ध झाले नसल्यास सरळ जाती किंवा सुधारित जातींची निवड करावी. बियाण्याचा आकार, रंग निरीक्षण, परीक्षण करून घ्यावे. सदर बियाण्याला उन्हात तीन ते चार तास ठेवावे. त्यामुळे ओलावा कमी होईल, बियाण्याची आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

२) बियाणे उगवणशक्ती तपासणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता वर्तमानपत्रावर सारख्या अंतरावर ओळीत शंभर बियाणे ठेवावे. त्यानंतर बियाण्यावर दुसरा पेपर अंथरावा आणि थोडे पाणी शिंपडावे. शेवटी वर्तमानपत्र गोल गुंडाळून दोन्ही टोकाला रबर लावावे. त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून पाणी किंवा दमटपणा टिकवण्यासाठी पाणी शिंपडावे. चार दिवसांनी पेपर उघडावा. एकूण दाण्यांमधून किती दाणे अंकुरित झाले ते तपासावे. उदाहरण १०० दाण्यांमधून ८० दाणे अंकुरित झाले, बाकी २० टक्के उगवले नाही. म्हणजेच ८० टक्के उगवण क्षमता आहे, असे समजावे. सोयाबीन, कांदा अभियानासाठी उगवणक्षमता कमीत कमी ७० टक्के तर ज्वारी, गहू या बियाण्याची कमीत कमी उगवणक्षमता ८५ टक्के असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी उगवणक्षमता असल्यास बियाणे वापरू नये.

३) एकदल वर्गीय पिकांकरिता आपल्या बियाण्याला तीन टक्के मिठाच्या द्रावणात बुडवावे. द्रावणाच्या तळाला बसलेले बियाणे दोनदा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत वाढवावे. हे बियाणे बीज प्रक्रिया करण्यासाठी वापरावे.

४) बीजोत्पादनाचे क्षेत्र शक्यतो त्या पिकाच्या इतर जातींपासून प्रमाणीकरण यंत्रणेच्या नियमाप्रमाणे वेगळे ठेवावे. विलगीकरण अंतर हे प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे असते. पिकाच्या परागीभवनाच्या पद्धतीप्रमाणे कमी-जास्त होते.

५) बियाणे प्लॉटचे निरीक्षण आणि नोंदी ः

- पिकाच्या पूर्ण अवस्थेमध्ये आपले निरीक्षण असणे आवश्यक आहे. यामध्ये काटकपणा, स्थानिक वातावरणात चांगली वाढ, रोग आणि किडींना कमी बळी पडणारी, पानाचा आकार, खोडाचा आकार, उंची, फुटव्यांचे प्रमाण, फुलोऱ्याची सारखी अवस्था, दाण्याचा आकार व संख्या, या सर्व बाबींचे निरीक्षण करून त्या झाडांना टिपून ठेवावे.

- बीजोत्पादनामध्ये वेळोवेळी भेसळीची झाडे काढणे फारच महत्त्वाचे असते. वेगळ्या जाती तसेच त्याच जातीची, परंतु रोगट पूर्णपणे न वाढलेली किंवा जास्त उंच, बुटकी झाडे फुलोऱ्यात येण्यापूर्वी त्वरित पूर्णपणे उपटून टाकावीत. अशा प्रकारच्या भेसळीपासून मुक्त होईपर्यंत दररोज हे काम चालू ठेवावे.

- ज्या पिकाचे परागीभवन होते, अशा पिकातील भेसळीची झाडे फुलोऱ्यात येण्यापूर्वी काढावीत. झाडे फुलोऱ्यात येण्यापूर्वी ओळखता येत नाहीत, अशी झाडे फुलोऱ्यात आल्यानंतर सहज ओळखता येतात. तसेच वेगवेगळ्या गुणधर्माची झाडे स्वपरागीभवन होणाऱ्या पिकांमध्ये पक्व होण्याच्या अवस्थेत काढता येतात.

- बियाणे जेव्हा पक्व होईल तेव्हा ते काढावे. बीजोत्पादन पिकाची काढणी पक्वतेची तडजोड करू नये.

- बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण साधारणपणे १२ ते १५ टक्क्यांदरम्यान असल्यास ते काढण्यास तयार होते. बियाण्याची शुद्धता ही काढणीनंतर होणाऱ्या हाताळणीवर अवलंबून असते.

- काढणी आणि मळणी करतेवेळेस इतर बियाण्यांची भेसळ त्यात होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी बियाणे क्षेत्रातील पीक वेगळे ठेवावे. मळणी शक्यतो सपाट जागेवर ताडपत्रीवर किंवा फरशीवर करावी. काढणी आणि मळणी दरम्यान ओलाव्याचे प्रमाण जास्त झाल्यास ते उन्हात वाळवणे आवश्‍यक आहे. त्यामुळे बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण कमी होऊन साठवणुकीत बियाण्याची उगवणक्षमता आणि जोम टिकून राहतो.

- बियाण्यातील पाणी प्रमाण पातळीपर्यंत कमी झाल्यास साठवणुकीत किटकांचा प्रादुर्भाव कमी होतो. थोडे दिवस साठवण करण्यासाठी स्वच्छ केलेल्या पोत्यात किंवा नवीन पोत्यात बियाणे ठेवावे. त्यावर बियाण्याची संपूर्ण माहिती लिहिलेली असावी. पोती जमिनीपासून काही अंतर ठेवून उंचावर तयार केलेल्या लाकडी रॅकवर ठेवावीत. एकावर एक ठेवलेल्या पोत्यांची संख्या चार ते पाचपेक्षा जास्त असू नये. तसेच बियाणे स्वच्छ व थंड कोरडे हवामान असलेल्या भांडारात साठवावीत.

बियाण्याच्या अनुषंगाने धोरणे आखण्याची गरज ः

- सार्वजनिक क्षेत्रामध्ये पारंपरिक बियाणेनिर्मितीची गरज आहे. त्याकरिता स्थानिक परिसरात रूढ झालेले पारंपरिक बियाणे “ग्राम बीजोत्पादन” कार्यक्रमात सहभागी करण्यात यावे.

- बियाणे धोरणात लहान/कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी पारंपरिक बियाण्याकरिता विमा संरक्षण योजना आखण्याची गरज आहे.

- लहान शेतकऱ्यांकरिता बियाणे संरक्षणाची हमी देणारी नीती व धोरणे आखावे.

- वातावरण बदलाला पूरक कृषी व्यवस्था निर्माण करणे.

- लोकसहभागाने “सीड सिलेक्शन झोन” निर्मिती करणे.

- समुदाय केंद्रित “बियाणे बँक” प्रोत्साहन योजना राबवावी.

-----------------------------------------------------------

संपर्क ः अविल बोरकर, ९०११९४२८२२ (लेखक भंडारा येथील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com