
डॉ. सोमिनाथ घोळवे
Indian Agriculture : १ मे ते ६ मेच्या दरम्यान गावाकडे गेलो होतो. स्वतःचे गाव आणि इतर काही गावांना भेटी दिल्यानंतर असे वाटू लागले आहे, की उन्हाळा हंगाम नकोच. कारण का? तर गारपीठ, तापमान वाढ किंवा पाणी टंचाईमुळे उन्हाळा नको असे म्हणत नाही.
तर रब्बी हंगामात पिके काढून झाल्यावर पुढील हंगामाच्या तयारीसाठी शेती नांगरणी करण्यात येते, त्यावेळी नजर चुकीने किंवा जाणीवपूर्वक शेतीचा बांध काढण्यात येतो.
तसेच शेतीत जाणारा रस्ता ठेवला जात नाही. दुसरे, जमिनीचे तुकडीकरण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने मोठा बांध टाकणे शेतकऱ्यांना नको वाटते. त्यामुळे थोडा-थोडा बांध कोरला जातो.
त्यामुळे प्रत्येक गावांमध्ये शेतीच्या बांधावरून भावकी,भाऊ-भाऊ किंवा बांधाशेजारी यांच्यातील चालू असलेल्या भांडण, तंटा, पोलीस केस, कोर्ट कचेरी चालू असल्याचे पाहण्यास मिळते. यामध्ये नुकसान कोणाचे? तर दोन्ही बाजूचे.
फायदा मात्र प्रशासन, पोलीस, वकील, गावातील लावालावी (एकाचे दोन मसाला सांगणारे) लोक-कार्यकर्ते, भावकीतील पुढे-पुढे करणारे, दुरून मजा बघणारे, गावातील स्वार्थ साधणारे काही पंच इत्यादीचा. शेत रस्ता आणि बांधाचे भांडण गाव पातळीवर सुटले तर ठीक नाहीतर खूपच खर्चिक होऊन जात आहे.
वर्षभर जीवाचे रान करून, घाम गाळून, पोटाला चिमटा घेऊन जमा केलेली पुंजी-बचत जमिनीच्या बांधाच्या वादात-तंट्यात वर उल्लेख केलेल्या वर्गाच्या हवाली केला जातोय. लेकरांच्या-मुलाबाळांच्या तोंडातील घास काढून आयत खाऊना देऊन टाकला जातोय.
या मध्ये माझंन तुझं घाल तिसऱ्याला अशी अवस्था. कारण दोन्ही बाजू भावकीत भक्कम असतात. तरीही ज्यांच्याकडे जास्त मनुष्यबळ तो शिरजोड असल्याचे वाटत राहते. कारण मनगटाच्या बळावर भारी होण्याचा, दडपण्याचा प्रयत्न चालू असतो. यातून नको त्या बाबीवर आर्थिक आणि वेळ खर्च करण्यात येतोय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.