Farm Mechanization : प्रतिकूलतेत पीक वाचले, तंत्रवापरातून उत्पादन वाढले

पिंपरी देशमुख (जि. परभणी) येथील पदव्युत्तर पदवीधारक शेतकरी सचिन देशमुख यांनी प्रशिक्षण व अभ्यासातून तंत्रज्ञान व यांत्रिकी आधारित शेती यशस्वी केली आहे.
Farm Mechanization
Farm Mechanization Agrowon

माणिक रासवे

पिंपरी देशमुख (जि. परभणी) येथील पदव्युत्तर पदवीधारक शेतकरी सचिन देशमुख (Sachin Deshmukh) यांनी प्रशिक्षण व अभ्यासातून तंत्रज्ञान व यांत्रिकी आधारित शेती (Technology and mechanical based agriculture ) यशस्वी केली आहे.

त्यातून अतिपाऊस तसेच खंड काळात पिकांचे चांगल्या प्रकारे संरक्षण व वाढ व बियाणे बचतीसह एकरी तीन ते चार क्विंटल वाढ करणेही शक्य झाले आहे.

परभणी जिल्ह्यात ‘बीबीएफ’ तंत्राद्वारे सोयाबीन व त्यानंतर हरभरा या पीक पद्धतीचे तंत्रज्ञान आत्मसात करून शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत.

जिल्ह्यातील पिंपरी देशमुख येथे शेती असलेले युवा शेतकरी सचिन देशमुख त्यापैकीच एक आहेत. निवृत्त कृषी अधिकारी प्रतापराव देशमुख यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते.

सचिन यांनी गणित विषयातून ‘एमएस्सी’ आणि ‘बी.एड.’
असे उच्चशिक्षण घेतले आहे.

काही काळ शिक्षण संस्थेत त्यांनी नोकरी केली. सन २०११ पासून ते परभणी शहरात पाचवी ते १० वीपर्यंतचे शिकवणी वर्ग घेतात. दररोज सकाळी एक वाजेपर्यंत शेतीची कामे आटोपून ते उर्वरित वेळ शिकवणीला देतात.

Farm Mechanization
Farm Mechanization : छोट्या शेतकऱ्यांसाठी मानवचलित यंत्रांची निर्मिती

पीक पद्धती

-परभणीपासून १८ किलोमीटरवरील पिंपरी देशमुख शिवारात मध्यम ते भारी प्रकारची २२ एकर शेती.


-सन २००० मध्ये विहिरी खोदकाम झाले. त्यानंतर संपूर्ण क्षेत्रावर सोयाबीन व रब्बीत गहू.


-गेल्या वर्षीपर्यंत २२ एकर सोयाबीन व त्यानंतर हरभरा घेत. यंदा दोन एकर केळी, तीन एकर ऊस अशी पिके. त्यामुळे १७ एकर सोयाबीन, हरभरा १३ एकर आणि चार एकर गहू.

शेतीतील प्रयोग

नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याकडे सचिन यांचा कल आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणातून सचिन यांनी शेतीत सुधारणा केल्या आहेत.

आधी छोट्या क्षेत्रावर ते प्रयोग करतात. त्या अनुभवातून मोठ्या क्षेत्राकडे वळतात. सन २०१८ नंतर सुधारित बैलचलित पेरणी यंत्राचा वापर सुरू केला. त्यातून वेळेची बचत होऊ लागली. मजुरांच्या समस्येतून काही प्रमाणात सुटका झाली.

२०१९ मध्ये बैलचलित यंत्राव्दाद्वारे दोन ओळींत १८ इंच अंतर ठेवून सोयाबीन घेतले. प्रत्येक पाच ओळींनंतर सरी ओढली. त्यामुळे जमिनीत पाणी मुरविता आले.

अतिरिक्त पाण्याचा निचरा झाला. या पद्धतीने एकरी २५ ते २८ किलो बियाणे लागले. एकरी ९ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले.

सन २०२० मध्ये ट्रॅक्टरचलित सुधारित बीबीएफ पेरणीयंत्राद्वारे २२ एकरांवर सोयाबीनची पेरणी केली.

Farm Mechanization
Farm Mechanization : वावडेत यांत्रिकीकरणातून मजूरटंचाईवर मात

सोयाबीन तंत्रज्ञानातील ठळक बाबी

-पावसानंतर जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध झाल्यानंतर पेरणी.
-दोन ओळींतील अंतर १८ इंच.

चार ओळींनंतर सरी. या पद्धतीत एकरी १८ ते २० किलोपर्यंत बियाणे लागते. पूर्वी एकरी ३० किलो बियाणे लागायचे. एकरी ८ क्विंटल उत्पादन मिळायचे.


आता एकरी चार क्विंटलची वाढ होऊन १२ क्विंटल उत्पादन मिळते.


-सन २०२१ मध्ये अतिवृष्टीत अतिरिक्त पाणी सऱ्यांमधून वाहून गेले. मागील वर्षी जुलैमधील सततचा पाऊस, ऑगस्टमध्ये ‘ड्रायस्पेल’ (पावसाचा दीर्घ खंड) होता.

परंतु बीबीएफ तंत्राचे सोयाबीन दोन वेळा प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहिले. एकरी १२ क्विंटल उत्पादन मिळाले.

हरभरा उत्पादन तंत्र

-कृषी विद्यापीठांच्या फुले विक्रम, जॉकी ९२१८ आदी वाणांची लागवड. -पूर्वी दोन ओळींत १२ इंच अंतर ठेवून पेरणी. एकरी ३२ ते ३५ किलो बियाणे लागायचे.

उत्पादकता एकरी ६ ते ७ क्विंटल होती. -आता दोन ओळींत १८ इंच व दोन झाडांत सहा सेंमी अंतराने ट्रॅक्टरचलित सुधारित बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी. एकरी २४ किलो बियाणे व उत्पादन एकरी १० क्विंटल मिळते. -सोयाबीन काढणीनंतर रोटाव्हेटरद्वारे मशागत.

- एकरी १०- २६- २६ खत ५० किलो व गंधक १० किलो- बेसल डोस. -कृषी विद्यापीठाचे द्रवरूप बायोमिक्स, ट्रायकोडर्मा, रायझोफॉसची बीजप्रक्रिया. -मर रोगास प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी एकरी दोन किलो ट्रायकोडर्मा मातीत मिसळून शिंपून देतात.

-पेरणीनंतर त्वरित पहिले पाणी. तुषार संच एका जागी (शॉवर रेन) दोन तास ठेवतात. त्यामुळे शंभर टक्के उगवण होते. -दुसरे पाणी ३५ दिवसांनी पाच तास. तिसरे पाणी ६५ ते ७० दिवसांनी घाटे भरण्याच्या अवस्थेत पाच तास.

या पद्धतीत हरभऱ्यास घाटे लागलेल्या फांद्यांची संख्या जास्त असते. -कीड नियंत्रणासाठी तीन फवारण्या. पहिली १८ चे २२ दिवसांनी. बुरशीनाशक अधिक कीटकनाशक आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची. दुसरी फुलोरा अवस्थेत. तिसरी घाटे लागल्याच्या अवस्थेत.

Farm Mechanization
Farm Mechanization : मशागतीसाठी आधुनिक यंत्रे, अवजारे

‘बीबीएफ’ तंत्राचे झालेले फायदे

दोन ओळी व रोपांतील अंतर कमी-अधिक करता येते. -अति पावसाच्या स्थितीत अतिरिक्त पाणी सऱ्यांमधून वाहून जाते. जमीन लवकर वाफसा स्थितीत येते.

मुळांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. -धूप थांबते. मातीचा वरचा थर कायम राहिल्याने जमिनीची सुपीकता टिकून राहते.

-कमी पावसाच्या स्थितीत सऱ्यांमध्ये पाणी मुरते. परिणामी, जमिनीत ओलावा टिकून राहतो. -पावसाच्या खंड काळात (ड्राय स्पेल) पीक तग धरून राहते.

-संरक्षित सिंचनासाठी सऱ्यांचा उपयोग होतो. सऱ्यांमध्ये तुषार संचाचे पाइप ठेवून पिकास पाणी देता येते. त्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान होत नाही. -

पीक लहान असताना सऱ्यांमधून ट्रॅक्टरचलित पंपाद्वारे फवारणी व कोळपणी शक्य होते. -एकरी बियाणे दर कमी होतो. उत्पादकता वाढते.

यांत्रिकीकरण

सुरुवातीची काही वर्षे सचिन बैलजोडीद्वारे, त्यानंतर भाडेतत्त्वावरील ट्रॅक्टरद्वारे शेतीकामे करून घेत. सन ०२१ मध्ये ५० एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर घेतला.

बीबीएफ, पेरणी यंत्र, नांगर, तिर्ही, रोटाव्हेटर, पाच फणी यंत्र, मोगडा आदी अवजारांसह त्यांनी स्वतःची मिनी अवजारे बँक तयार केली आहे.

गावातील अनेक शेतकऱ्यांनी सचिन यांनी आत्मसात केलेल्या तंत्राचा अंगीकार केला आहे. यंदा गावात १२५ एकरांवर सोयाबीन व १०० एकरांवर हरभऱ्याची बीबीएफ तंत्राने पेरणी झाली आहे.

सचिन देशमुख, ९५०३१६३१२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com