
पुणे ः शेती परवडत नाही म्हणून निराशेच्या गर्तेकडे न जाता हमाली (Porterage) काम करीत आधुनिक शेतीचे (Modern Agriculture) धडे गिरवण्याचे थक्क करणारे काम तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी एक तरुण शेतकरी करीत आहे. महिंद्र गायकवाड (Mahindra Gaikwad) या शेतकऱ्याने डोंगरावरील एका झऱ्यातून स्वतः जलवाहिनी टाकून विनावीज गुरुत्व पद्धतीने तुषार सिंचनाद्वारे (Sprinkler Irrigation) शेतीसाठी पाणी आणले आहे.
तोरणा किल्ल्याच्या घेऱ्यात असलेल्या वेल्हे गावातील पश्चिम बाजूला तोरणाच्या डोंगराची एक धार उतरते. या धारेला दस्तान असे नाव आहे. या डोंगरावर एक शिवकालीन जिवंत झरा आहे. झऱ्याच्या खालच्या दिशेला महिंद्र जगन्नाथ गायकवाड व त्याचे चुलते विश्वनाथ बाबुजी गायकवाड यांची शेती आहे. पाणी नसल्यामुळे डोंगरावरील दोन्ही गायकवाड परिवार शहरात येऊन कुटुंबासाठी आर्थिक जुळवाजुळव करीत असतात. मात्र, झऱ्यातील पाण्याचा काय वापर करता येईल, याचा विचार दोघांनी सुरुच ठेवला होता.
“झऱ्याखाली चार वर्षांपूर्वी चुलत्यांनी कष्टपूर्वक एक तळे खोदून घेतले. १५ फूट रुंद व १५ फूट लांबीच्या या तळ्याला ८ फुटाची खोली ठेवली होती. त्यात पाणी साचू लागले. मात्र, त्याचा शेतीला उपयोग करता येत नव्हता. वीज, पंप, महागडी जलवाहिनी असे सारे त्यासाठी हवे होते. त्यामुळे काही वर्षे तळे असेच पडून होते. मात्र, गेल्या वर्षी मी अवघ्या २० हजार रुपये खर्चात एक प्रकल्प राबविण्याचा निर्धार केला,” असे महिंद्रने सांगितले.
महिंद्रने तळ्यापासून शेती व घरापर्यंत विजेविना पाणी नेण्याचे ठरविले. त्यानुसार, कमी खर्चात रबरी पाइप आणून तळ्यातील पाणी दीडशे फुटावरील २००० लिटरच्या एका प्लॅस्टिकच्या टाकीत आणले. तेथून पुन्हा ५० फुटावर एक ५०० लिटरच्या टाकीत पाणी नेले. या टाकीपासून शेतघराला थेट गुरुत्व पद्धतीने पाणी नेले.
अशा प्रकारे डोंगरात शेतघर असूनही विजेविना घरातील नळाला २४ तास पिण्याचे पाणी मिळू लागले. घराला पाणी पुरवठा करणाऱ्या छोट्या टाकीचा कॉक बंद केल्यानंतर मोठ्या टाकीतून थेट तुषार संचाद्वारे शेतात पाणी नेण्याची युक्ती महिंद्रने यशस्वी केली. त्यासाठी पाच फूट फाउंडेशन स्वतः महिंद्रने तयार केले. यासाठी तो स्वतः गवंडी बनला. त्यानंतर त्याने प्लंबरची भूमिका बजावत जलवाहिनीचे सर्व जाळे त्याने स्वतः तयार केले.
“तुषार संचात गुरुत्व पद्धतीने पाणी आले. पण, फवारा फक्त पाच फुटाचा मिळत होता. त्यामुळे पिकाला पाणी पोचत नव्हते. त्यामुळे मी शेतातील घोडीवर तुषार संच बसवला. त्यामुळे पाण्याचा फवारा आता पाच ऐवजी दहा फुटापर्यंत मिळू लागला. आम्ही पहिले पीक ज्वारीचे घेतले आहे. मात्र, डोंगरात रानडुकरे मोठ्या प्रमाणात असल्याने इतक्या कष्टाने साकारलेल्या शेतीची हानी झाली आहे. तरीही मी माझे प्रयोग चालू ठेवणार आहे,” असे महिंद्रने सांगितले.
आई सांभाळते शेती आणि मुलगा बनला हमाल
डोंगरात शेती करण्यासाठी वाव नसल्याने महिंद्र गेल्या काही वर्षांपासून पुण्याच्या मार्केट यार्डात हमाली काम करतो. एक दिवस सुट्टी मिळताच पुन्हा डोंगरात येऊन शेतीचे नियोजन करतो. मात्र, एरवी त्याची ६० वर्षाची आई फुलाबाई गायकवाड ही एकटीच डोंगरावर शेती सांभाळते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.