शेतकरी नियोजन पीक: हळद

दिवसेंदिवस मजुरी खर्चातील वाढ आणि मजुरांची अनुपलब्धता आदी कारणांमुळे अतुल यांनी शेतीकामांसाठी यांत्रिकीकरणावर (Farm Mechanization) भर दिला आहे. त्यातूनच स्वतःची अवजार बॅंक तयार केली.
Turmeric
TurmericAgrowon

साखरा (ता. सेनगाव) येथे अतुल राऊत यांची मध्यम प्रकारची ३० एकर शेतजमीन आहे. अतुल मागील पंधरा वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने विविध पिकांची लागवड करतात. शेतामध्ये प्रामुख्याने हळद (Turmeric), सोयाबीन (Soybean), तूर या पिकांची लागवड होते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी भुईमूग पिकाची लागवडही ते करतात.

तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ अनिल ओळंबे यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पारंपरिक शेतीत बदल सुधारित पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली.दरवर्षी साधारण ४ ते ६ एकर क्षेत्रावर हळदीच्या सेलम वाणाची लागवड केली जाते. दरवर्षी एकरी सरासरी ३० क्विंटल हळदीचे उत्पादन मिळाले. साधारण ३ वर्षांनी माती परीक्षण केले जाते. आणि त्यानुसार रासायनिक खतांचे नियोजन केले जाते. असेही अतुल सांगतात.

यांत्रिकीकरणावर भरः

दिवसेंदिवस मजुरी खर्चातील वाढ आणि मजुरांची अनुपलब्धता आदी कारणांमुळे अतुल यांनी शेतीकामांसाठी यांत्रिकीकरणावर (Farm Mechanization) भर दिला आहे. त्यातूनच स्वतःची अवजार बॅंक तयार केली. त्यात ४५ एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर तसेच नांगर, वखर, रोटाव्हेटर, प्रचलित पेरणी यंत्र, बीबीएफ पेरणी यंत्र, हळदीसाठी बेड मेकर, प्लान्टर, ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र, हळद काढणी यंत्र, पॉलिशिंग ड्रम, ट्रॉली, टॅंकर इत्यादी अवजारे आहेत.

गावपरिसरातील शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर शेतीकामांसाठी अवजारे दिली जातात. हळद पिकांमध्ये यांत्रिकीकरणास मोठा वाव आहे. हळद लागवडपूर्व मशागत, बेणे लागवड, आंतरमशागत, माती लावणे, हळद काढणी, पॉलिशिंग इत्यादी कामे ट्रॅक्टरचलित अवजारे आणि यंत्राद्वारे केली जातात. एक एकर हळद लागवडीसाठी (Turmeric Cultivation) २० मजुरांना १ दिवस लागतो. हेच काम ट्रॅक्टरचलित प्लान्टरने करण्यामुळे मजुरी खर्चात आणि वेळेत मोठी बचत होते. दोन मजुरांच्या मदतीने तीन एकरांवरील हळद लागवड एका दिवसात पूर्ण होते.

लागवड नियोजनः

- जमीन तयार झाल्यानंतर दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हळद लागवड केली जाते. परंतु यंदा अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे हळद लागवडीस उशीर झाला. या वर्षी पिकांची फेरपालट करण्यासाठी हळद लागवडीसाठी नवीन क्षेत्राची निवड केली आहे. त्यानुसार अडीच एकरांवर १५ जून आणि २० जून अशी दोन टप्प्यांत हळद लागवड केली.

- मे महिन्यात जमिनीची खोल नांगरट करून रोटाव्हेटर, वखर मारून जमिनीची मशागत केली.

- त्यानंतर ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे गादीवाफे तयार करून घेतले. या यंत्राद्वारे दोन वाफ्यांत साधारण ४ फूट अंतर राखले जाते.

- त्यानंतर एकरी २ ट्रॉली शेणखत आणि ३ किलो ट्रॉयकोडर्मा मातीत मिसळून घेतले.

- लागवडीसाठी घरचे बेणे वापरले जाते. त्यानुसार कंद कूजचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडीपूर्वी बेण्यास रासायनिक बेणेप्रक्रिया केली.

- माती परीक्षण अहवालानुसार सिंगल सुपर फॉस्फेट २०० किलो, निंबोळी पेंड आणि पोटॅश प्रत्येकी ५० किलो प्रति एकर याप्रमाणे बेसल डोस दिला.

- ट्रॅक्टरचलित हळद बेणे प्लान्टरद्वारे दोन ओळींत १२ इंच आणि दोन बेण्यात ५-७ इंच अंतरावर हळद बेण्याची लागवड केली. लागवडीसाठी एकरी ९ क्विंटल बेणे लागले.

- लागवडीनंतर पाऊस पडण्यापूर्वी पीक उगवणीपूर्व रासायनिक तणनाशकांची फवारणी केली आहे. त्यामुळे सध्यातरी शेतात तणांचा प्रादुर्भाव दिसत नाही.

पुढील १५ दिवसांचे नियोजनः

- सध्या लागवड करून साधारण २५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून, चांगल्याप्रकारे उगवण झाली आहे.

- ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे झाडांना मातीची भर दिली जाईल. तसेच आंतरमशागतीची कामे करून माती मोकळी केली जाईल.

- त्यानंतर पुन्हा बेड मेकर यंत्राद्वारे मातीची भर लावली जाईल. आलटून-पालटून आंतरमशागतीची कामे केल्यामुळे प्रभावी तणनियंत्रण होते.

- संपूर्ण क्षेत्रावरील पिकाची उगवण झाल्यानंतर ठिबकच्या नळ्या अंथरूण घेतल्या जातील. पावसाचे प्रमाण आणि जमिनीतील वाफसा पाहून सिंचन केले जाईल.

- शेतात पावसाचे अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घेतली जाईल.

- अतुल राऊत, ८८८८९०२१९०

(शब्दांकन ः माणिक रासवे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com