
डॉ. आनंद नाडकर्णी
Indian Agriculture : ‘शेतकऱ्यांचे भावनिक स्वास्थ्य’ हा विषय ऐरणीवर येण्यासाठी, आत्महत्यांचे प्रमाण, ही मनोविकारांच्या कक्षेतली समस्या देशापुढे यावी लागली. या आत्महत्यांना प्रतिबंध कसा करावा यावर मंथन झाले आणि सुरू सुद्धा आहे. परंतु विकारावर मात करण्याचा विकासाचा मार्ग कोणता, ह्यायावर काही भरीव कृती झालेली नव्हती.
या पार्श्वभूमीवर सहा वर्षांपूर्वी, ‘वेध’ या आमच्या आय.पी.एच. (इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ) संस्थेच्या वार्षिक उपक्रमामध्ये नाशिक शहरातील व्यवसाय प्रबोधन परिषदेमध्ये, विलास शिंदे या उद्योजकाची मुलाखत घेण्याचा प्रसंग आला.
त्यातून ‘सह्याद्री फार्म्स’ या कंपनीचे काम कसे चालते, याची माहिती मिळाली आणि विलासबरोबरच्या परिचयाचे रूपांतर दोस्तीमध्ये होण्यासाठी फार वेळ लागला नाही.
तुमच्या संस्थेच्या सहकार्याने शेतकऱ्यांची मानसिकता घडविणारा काहीतरी ठोस उपक्रम राबवूया, ही कल्पना विलासकडूच आली. ‘नक्की करूया’, असे आश्वासन देऊन ही कल्पना माझ्या मनाने लांबणीवर टाकली.
तीन- साडेतीन वर्षांपूर्वी ऐन कोरोनाकाळामध्ये आमच्या संस्थेने ठाणे आणि पुणे या शहरांनंतर नाशिकमध्ये उपक्रम सुरू केले. त्या केद्रांतील माझ्या सहकारी डॉ. ऋचा सुळे-खोत आणि आदिती भार्गवे यांच्यासोबत विलासची भेटीची वेळ ठरवून आम्ही ‘सह्याद्री फार्म’च्या परिसरात पहिले पाऊल ठेवले.
डिस्नेलॅन्डमध्ये प्रथम येणाऱ्या छोट्या मुलांसारखी अवस्था झाली माझी. आपण भारतात आहोत, की युरोपात ते कळेना. शेतकऱ्यांच्या सहकारी कंपनीने मला दिपवले, ते त्यातील साध्या, रेखीव, सहज शिस्तीमुळे. विलासच्या ऑफिसात बसलो आणि पुढचा सव्वा तास आमच्यासाठी, आमचे दृष्टिकोन साफ करणारा होता.
मेडिकल कॉलेजच्या दिवसांमध्ये आवडत्या प्रोफेसरांचे एक लेक्चर, संपूर्ण विषयाचे सुलभ आकलन करून देणारे असायचे. नेमके हेच काम विलासने केले. शेतकरी आणि वारकरी, उद्योजक आणि कार्यकर्ता, संघटक आणि संशोधक अशा अनेक पैलूंचे अकृत्रिम सादरीकरण होते ते.
जिज्ञासू विद्यार्थ्याप्रमाणे मी नोट्स काढल्या. त्या गप्पांच्या शेवटी असे ठरले, की शेतकऱ्यामधल्या उद्योजकाचाही विकास होईल असा ठोस प्रशिक्षण क्रार्यक्रम तयार करायचा आणि तो सुद्धा दृकश्राव्य स्वरूपात. कसा असेल हा कार्यक्रम? आता बुद्धीला दिशा आणि भावनांना आशा मिळाली होती.
तेव्हा कोविडकाळ पूर्णपणे निवळला नव्हता. आमच्या संस्थेच्या ठाणे, पुणे, नाशिकच्या नेमक्या सहकाऱ्यांबरोबर एक ऑनलाइन बैठक घेतली. शिल्पा जोशी आणि डॉ. सुवर्णा बोबडे ह्या मानसशास्त्रज्ञांनी संशोधनाची जबाबदारी घेतली.
पुस्तके, शोधनिबंध यांची यादी झाली. या दोघी जणी नाशिकला आल्या. वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलल्या. शेतकऱ्यांचे एकत्र येणे आणि त्या सहकार्यातून शेतीच्या ‘उद्योगाला’ आधुनिक आणि वैज्ञानिक बनवायचे, तर विचार प्रागतिक आणि वास्तववादी हवेत.
मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांना तोंड देण्यासाठी भावनिक कणखरपणा हवा. अहंगंड आणि न्यूनगंडाच्या सापळ्यातून बाहेर आणणारी सुदृढ आत्मप्रतिमा हवी.
हे सारे विषय सोप्या भाषेत शिकवायचे कसे? जर हा कार्यक्रम संवादाच्या शैलीमध्ये झाला आणि त्यातला सूत्रसंचालक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असेल, तर आमच्यासारख्या शहरी माणसांचे तज्ज्ञ दृष्टिकोन समतोल तर बनतीलच; पण ‘जमिनीवर’ही राहतील. असा एक शेतकरी, जो संवेदनशीलसुद्धा आहे.
इथे मदतीला आली संस्थेच्या दृकश्राव्य विभागाची टीम. ‘आवाहन आय.पी.एच.’ हे आमचे मनआरोग्याला वाहिलेले यू-ट्यूब चॅनेल. सचिन गावकर आणि शैलेश मेदगे यांनी एका कलाकाराशी संपर्क साधला. त्यांच्यासोबत बैठक झाली. त्यांची मानधनाची मागणी थोडीशी आग्रही होती.
या प्रकल्पाला आर्थिक हातभार मिळणार होता ‘सह्याद्री फार्म्स’च्या व्यवस्थेतून. सगळ्या गोष्टी कमीत कमी खर्चात बसवायच्या होत्या. दुसरे नाव आले, राजकुमार तांगडे या लेखक, कलाकार शेतकऱ्याचे. तो मराठवाड्यामधल्या त्याच्या गावात असताना आमची ऑनलाइन बैठक झाली.
वेगळाच अनुभव आला. पैशाचा विषयच पार मागे पडला. अशा रीतीने राजकुमारच्य रूपाने शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी काहीतरी ‘भारी’ करायचे, या विचारांचा अजून एक भिडू जोडला गेला.
बघता बघता पहिले सहा भाग संहितेसहित तयार झाले. त्या दरम्यान या प्रकल्पाचे नाव सुचले, ‘कर्ता शेतकरी’ आणि त्याच दिवशी माझ्याकडून शीर्षकगीतसुद्धा लिहिले गेले. ते ही अगदी जेमतेम अर्ध्या तासात! आता या गाण्याला चाल कोण लावणार? आमच्या संस्थेचा अजून एक उपक्रम आहे, ‘यूथ-क्लब’. कुमारवयातील मुलामुलींसाठीचा हा व्यक्तिमत्त्वविकास प्रकल्प आहे.
वेदांग आणि प्रियांशू, हे या ग्रुपमधले उत्साही आणि प्रतिभावान वादक. प्रियांशूचा सिंथेसायझर आणि वेदांगची तालवाद्ये, या स्वरमेळाने आमचे अनेक कार्यक्रम सजले आहेत. त्या दोघांची, ही पहिलीच स्वतंत्र संगीतरचना.
एका संध्याकाळी आम्ही तिघे जण बसलो आणि चाल बांधायला घेतली. काही तासांमध्ये एक आराखडा तयार झाला आणि आठवडाभरातच त्यांनी चालीची बांधणी केली. संस्थेच्या माध्यम-विभागाच्या स्टुडिओमध्ये आम्ही एक प्रायोगिक रेकॉर्डिंग केले.
‘‘ह्या गाण्याला नंदेशदादा उमपसारखा आवाज हवा”, मुले म्हणाली. म्हटले, विचारून तर पाहू. योगायोग असा, की नंदेशने त्या कालावधीत, ‘सह्याद्री फार्म्स’च्या परिसरात गाण्याचा कार्यक्रम केला होता. त्याने कोणतेही आढेवेढे न घेता गाणे गायचे कबूल तर केलेच, शिवाय छोट्या संगीतकारांचा मान राखत अतिशय तन्मयतेने ते गायलेदेखील. वाद्यमेळाचे तुकडे, कोरसची साथ, हे सारे जुळून आले आणि आमचे ‘टायटल साँग’ चक्क रेकॉर्ड झाले.
नको गुलामी, नको चाकरी
विज्ञानातून पिके भाकरी
नशीब स्वतःचे घडवत नेई,
कर्ता शेतकरी!
सह्याद्री फार्म्स व आय.पी.एच. यांचा संयुक्त उपक्रम ‘कर्ता शेतकरी’
शेतकऱ्याची स्थिती चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे. हा चक्रव्यूह भेदायचा कसा, शेतीतल्या प्रश्नांचा गुंता सोडावयचा कसा हा आत्मविश्वास खरे तर तयार होणे महत्त्वाचे आहे. शेतीतील प्रश्न संपणार नाहीत; मात्र या सगळ्या प्रश्नांकडे कसे पाहावे, हे मनाच्या जडणघडणीवर अवलंबून आहे.
त्यादृष्टीने तसे मन घडविणे, मन सक्षम करणे यावर कोणी बोलत नाही, काही करीत नाही. अशा आशयाची प्राथमिक चर्चा डॉ. आनंद नाडकर्णी सरांशी झाली होती.
या चर्चेतूनच सकरात्मक मानसिकता तयार करणे, शास्रशुद्ध विचार करणे, उद्योजकीय मानसिकता रुजविणे व त्यासाठी शास्रशुद्ध प्रशिक्षण कार्यक्रमाची गरज अधोरेखित झाली. सह्याद्री फार्म्स व आय.पी.एच. यांनी संयुक्तपणे असा कार्यक्रम राबवण्याचे ठरले.
ग्रामीण भागातही आता समाज माध्यमांचा प्रभावी वापर होतो हे गोष्ट लक्षात घेऊन आम्ही व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून हा विषय शेतकऱ्यांपर्यत पोहोचविण्याचे ठरविले आणि जन्म झाला ‘कर्ता शेतकरी’ या संकल्पनेचा. आपण आपल्या मनाकडे, विचारांकडे शास्रीय दृष्टीने पाहत नाही.
त्याच-त्याच नकारत्मक विचारांना कवटाळून बसतो, त्यांना टाळून यशाला गवसणी घालणाऱ्या विचारांकडे कशी झेप घ्यायची, उद्योजक प्रतिकूल परिस्थितीत कसा विचार करून मार्ग काढतो व त्याकरिता आपल्या विचाराची, वर्तनाची मशागत कशी करतो हे सांगणारी ४२ भागांची ही व्हिडिओ मालिका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली.
आय.पी.एच. व सह्याद्री फार्म्सच्या यू-ट्यूब चॅनेलवर हे व्हिडिओ उपलब्ध आहेत. याच संकल्पनेवर आधारित साप्ताहिक लेखमाला ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून आकाराला येत आहे.
विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि.
(लेखक प्रथितयश मानसोपचार तज्ज्ञ आणि ‘आय.पी.एच.’चे संस्थापक आहेत.)
संपर्क: kartashetakari@gmail.com
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.