Silk Farming : रेशीम शेती ठरते फायद्याची?

गावातील यशस्वी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांकडून माहिती घेत रेशीम व्यवसाय करण्याचे ठरविले.
Silk Farming
Silk FarmingAgrowon

शेतकरी : महेंद्र तुकाराम जोंधळे

गाव : शेंद्रा, ता.जि. परभणी

एकूण क्षेत्र : ५ एकर

तुती लागवड : १ एकर

परभणी जिल्ह्यातील शेंद्रा (ता.परभणी) येथील महेंद्र तुकाराम जोंधळे हे तरुण शेतकरी. जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात त्यांची मध्यम ते भारी प्रकारची ५ एकर जमीन आहे. जमीनधारणा क्षेत्र कमी असल्यामुळे पारंपारिक पीक पद्धतीतून शाश्वत उत्पन्न मिळत नव्हते.

गावातील यशस्वी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांकडून माहिती घेत रेशीम व्यवसाय करण्याचे ठरविले. एका कार्यक्रमामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे यांची मुलाखत पाहिली.

त्यानंतर डॉ. लटपटे यांची भेट घेऊन रेशीम शेतीबाबत सविस्तर माहिती घेतली. रेशीम संशोधन योजनेतर्फे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आयोजित प्रशिक्षण देखील पूर्ण केले.

Silk Farming
Silk Industry : आधुनिक तंत्र वापरून रेशीम उद्योगातून समृद्ध व्हा

व्यवस्थापनातील बाबी

- सध्या त्यांच्याकडे एक एकर क्षेत्रावर तुतीच्या व्ही-१ वाणाची लागवड आहे. लागवड ५ बाय ३ बाय २ फूट अंतरावर आहे.

- त्या शेजारील जागेमध्ये २५ फूट रुंद, ६० फूट लांब आणि १६ फूट उंचीचे रेशीम कीटक संगोपनगृह उभारले आहे. त्यात लोखंडी पट्ट्याच्या साह्याने रॅक तयार केले आहेत.

- रॅकमध्ये नॉयलॉन जाळ्यांऐवजी घरातील जुन्या साड्यांचा वापर केला आहे. त्यामुळे खर्च कमी झाला.

- बरबडी (ता.पूर्णा) येथील बाल्यरेशीम कीटक उत्पादक शेतकरी श्रीधर सोलव यांच्याकडून चॉकीची खरेदी केली जाते. पहिल्या वर्षी थोडे कमी उत्पादन मिळाले. त्यानंतरच्या वर्षभरातील अनुभवातून रेशीम कीटक संगोपनातील अनेक बारकावे माहिती झाले.

त्यामुळे त्यापुढील काळात कोष उत्पादनात सुधारणा होत गेली. मागील पाच वर्षांतील अनुभव आणि योग्य व्यवस्थापनाद्वारे ते दर्जेदार रेशीम कोष उत्पादन घेत आहेत.

बॅच नियोजन

कोष काढणी झाल्यानंतर संगोपनगृहाची साफ सफाई, निर्जंतुकीकरण या बाबींवर विशेष भर दिला जातो. दर्जेदार रेशीम कोष उत्पादनासाठी तुतीची चांगल्या प्रतीची पाने उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी बॅच नियोजनानुसार बागेतील कामांवर भर दिला जातो.

बागेची छाटणी करून नांगरणी, वखरणीची कामे केली जातात. त्यानंतर रासायनिक खतांच्या मात्रा देऊन पाणी दिले जाते. छाटणी केल्यानंतर दीड महिन्यात तुती पाने तयार होतात.

त्यानंतर बाल्यकीटक आणून पुढील रेशीम कोष उत्पादनाची बॅच सुरु केली जाते. बाल्य रेशीम किटकांची विशेष काळजी घेतली जाते.

कोष उत्पादनात वाढ

- सुरुवातीची काही वर्षे रेशीम कीटकांच्या बायव्होल्टाईन जातीच्या १०० अंडीपुंजाच्या प्रत्येक बॅचपासून ८० ते ९० किलो कोष उत्पादन मिळत होते.

त्याची बेंगलोर जवळील रामनगरम मार्केटमध्ये कोष विक्री होत असे. प्रत्येक बॅचपासून महिन्याकाठी खात्रीशीर उत्पन्न मिळू लागल्याने आत्मविश्वास वाढला.

- एका वर्षात साधारणपणे १५० अंडीपुजांच्या बॅचपासून सरासरी १२५ ते १५० किलो उत्पादन मिळत आहे. सध्या कोष विक्री पूर्णा येथील मार्केटमध्ये करत आहे.

मागील कामकाज

- जानेवारी महिन्यात १५० अंडीपुंजाच्या बॅच घेतली. त्यापासून ११५ किलो कोष उत्पादन मिळाले. पूर्णा मार्केटमध्ये प्रति किलो ७१० रुपये दर मिळाले.

- संपूर्ण कोष काढणी पूर्ण झाल्यानंतर शेडचे निर्जंतुकीकरण केले.

- नवीन बॅच नियोजनानुसार तुती बागेतील कामांवर भर दिला. मशागतीची कामे, छाटणी, खताची मात्रा, सिंचन यावर भर दिला.

- तापमानात वाढ होत असल्याने संगोपनगृहातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी छतावर मिनी स्प्रिंकलर लावले आहेत.

- मागील महिन्यात शेवटी (ता.२९ मार्च) धनगरगाडी (जि. नांदेड) येथील चॉकी सेंटरवरून २०० बाल्य कीटक मागविले आहेत. गुरुवारी (ता.३०) दुसरा मोल्ट आणि रविवारी (ता.२) तिसरा मोल्ट बसला आहे. कीटकांना एका दिवसात दोन वेळा फिडींग केले.

Silk Farming
Silk Cocoon Production : सांगलीत रेशीम कोष उत्पादनात होतेय वाढ

पुढील नियोजन

- शुक्रवारी (ता.७) चौथा मोल्ट बसेल. त्यावेळी चुन्याची डस्टिंग केली जाईल. त्यानंतर पुढील ४८ तासांनी मोल्ट उठतेवेळी विजेता पावडरची टाकली जाईल. त्यानंतर ३० मिनिटांनी पुन्हा फिडींग केले जाईल.

- साधारण १४ फिडींग कराव्या लागतील. साधारण रविवार (ता.१६) पर्यंत कोष निर्मितीस सुरुवात होईल. त्यावेळी एक फिडिंग करून रॅकमध्ये चंद्रिका टाकल्या जातील. त्यानंतर चार दिवसांत कोष तयार होतील.

महेंद्र जोंधळे : ७९७२६८१४३८ - (शब्दांकन : माणिक रासवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com