
Ratanagiri Forest Fire : भाजावळ करताना काजू बागेला (Cashew Orchard) लागलेला वणवा विझविण्याचा प्रयत्नात वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू (Farmer Death) झाल्याची घटना रत्नागिरी शहराजवळील हातखंबा-तारवेवाडी येथे मंगळवारी (ता. २१) दुपारी १२.३०च्या सुमारास घडली.
या घटनेमुळे हातखंबा गावावर शोककळा पसरली. जोरदार वाऱ्यामुळे आगीचे रूपांतर वणव्यात झाले आणि ही दुर्घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोविंद विश्राम घवाळी (वय ६५, रा. हातखंबा, रत्नागिरी) असे वणव्यात होरपळून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हातखंबा-तारवेवाडी येथे काजूच्या बागेजवळ गोविंद घवाळी हे शेतात भाजावळ करण्यासाठी सकाळी एकटेच गेले होते.
भाजावळ करत असताना तेथील काजूच्या बागेत अचानक वणवा लागला. वणवा काजूच्या बागेत पसरू नये यासाठी घवाळी यांनी धाव घेतली. जोरदार वाऱ्यामुळे आग पसरत होती. वाऱ्याच्या वेगामुळे सुकलेल्या गवताने पेट घेतला. कडकडीत उन्हामुळे वातावरणात उष्मा होता.
या परिस्थितीत आग विझविण्यासाठी गोविंद घवाळी गेले. आगीत होरपळ्यानंतर घवाळी यांनी स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या चपला मृतदेहापासून दूरवर होत्या.
सकाळी शेतात गेलेले गोविंद घवाळी हे बराच काळ परत आले नसल्याने शोधाशोध सुरू असतानाच वणव्याची माहिती मिळाल्याने ग्रामस्थांसह सरपंच जितेंद्र तारवे, ग्रामविकास अधिकारी दीपक पाल्ये, तलाठी सुविधा वाडकर, पोलिस पाटील शर्वरी सनगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली.
ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक, हेड कॉन्स्टेबल जोशी, महामुनी,उपनिरीक्षक दिनकर सूर्य यांनी घटनास्थळी पंचनामा करून घवाळी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला. ग्रामीण पोलिस अमंलदार तपास करत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.