शेतकऱ्यांचं जगणं झालंय महागडं...

घरगुती किराण्यापासून तर पेट्रोल-डिझेलपर्यंत सर्वच दैनंदिन वापरातील वस्तुंचे दर गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांचे जगणे मेटाकुटीला आले आहे.
शेतकऱ्यांचं जगणं झालंय महागडं...
InflationAgrowon

अकोलाः आता पाऊस येताच खरीप हंगामाला सुरुवात होईल. हंगामासाठी शेतकऱ्यांचीही तयारी सुरु आहे. पण कधी नव्हे ती आर्थिक चणचण शेतकरी अनुभवतोय. त्याला महागाईच्या सर्वाधिक झळा बसत आहेत. घरगुती किराण्यापासून तर पेट्रोल-डिझेलपर्यंत सर्वच दैनंदिन वापरातील वस्तुंचे दर गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांचे जगणे मेटाकुटीला आले आहे. महागाईचा हा भडका शेतकऱ्यांच्या खिशाला दररोज कात्री लावत आहे.

मागील दोन-तीन वर्षांत शाळांचे प्रवेश शुल्क अव्वाच्या सव्वा झाले. कधी ८ ते १० हजार रुपये शुल्क घेणाऱ्या शाळांमध्ये आता १५ ते १८ हजार रुपये मागितले जात आहेत. मागील दोन वर्षे कोरोनामुळे शुल्कात सवलत दिली होती. आता सर्वकाही सुरळीत झाल्याचे सांगत संस्थाचालक या शुल्कवाढीचे समर्थन करीत आहेत. पेट्रोल-डिझेल महागल्याने प्रवास खर्च ४० टक्क्यांपर्यंत वाढला. शेतीच्‍या कामासाठी ट्रॅक्टर सांगितले तर एकराला आता हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे द्यावे लागतात. मशागतीच्या प्रकारानुसार ही रक्कम वाढत जाते.

बदलता निसर्ग आणि अनिश्‍चित बाजारपेठ या परिस्थितीत शेतकऱ्याची आर्थिक ताळमेळ जुळवताना दमछाक होत आहे. किराणा मालाच्या दरात दुप्पट-तिप्पटीने वाढ झाली आहे. खाद्य तेलाचे भाव ७५ रुपयांवरून १७५ रुपयांवर पोचलेत. असे प्रत्येक जिन्नसमध्ये दिसून येते. प्रवास खर्च महागला. वीज बिलामध्ये दुप्पट वाढ झाली. शेतीमध्ये यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झाले. त्यासाठी वापरले जाणारे डिझेल दीडपटीने वाढले. शेती मशागतीवर दुप्पट खर्च करावा लागत आहे. अशा विविध बाबींचे ओझे शेतकऱ्यांना ओढणे अशक्यप्राय बनत चालले आहे.

Inflation
सर्वात मोठ्या वायदेबंदीचे नऊ महिने

राष्ट्रीय किसान संघटनेचे नेतृत्‍व करणारे तसेच खुदनापूर (जि. बुलडाणा) येथील शेतकरी निंबाजी लखाडे म्हणाले, ‘‘मागील दोन-तीन वर्षांत किराणा मालाचा दर सरासरी ३५ टक्के महाग झाला. मुलांची खासगी शाळेची पहिली ते चौथीची पुस्तके आज पाच हजारांवर पोचली. मागील वर्षी डिझेल दरवाढ खर्चात ४० टक्के वाढ झाली. कपड्यांचा खर्च २५ ते ५० टक्के वधारला. भाजीपाला १५ ते २० टक्के महाग झाला. मोबाईल बिलात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. इतर खर्चही १० ते २५ टक्क्यांनी वाढले. बी- बियाणे व खते, कीडनाशके तर सातत्याने महाग होत आहेत.

बिबी दारफळ (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथील शेतकरी नागेश ननवरे म्हणाले, ‘‘कोरोनापासून महागाई सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेली आहे. शेतमालाचे भाव मात्र तसे वाढले नाहीत. आज कांद्याला कुणी विचारत नाही. शाळेचे शुल्क, वस्तू महागल्या. तीन वर्षांपूर्वी मुलाची स्कूलबॅग १५० रुपयांना आणली होती. यंदा ती ४५० रुपयांना विकत आणली. पेट्रोल- डिझेल वाढल्याने ट्रॅक्टरचे दर हाताबाहेर गेले. मजुरीचाही दर वाढला. दुसरीकडे शेतकऱ्याला हमीभावाइतकाही भाव मिळत नाही.

गेल्या दोन वर्षांमध्ये उदरनिर्वाहाच्या घटकांमध्ये जवळजवळ दुपटीने वाढ झाली आहे. इंधनाचे दर आवाक्याबाहेर गेल्याने प्रवास करणे मुश्कील बनले आहे. वाढलेली महागाई आणि शेतमालाचे घसरलेले दर याचा मोठा फटका शेतकरी कुटुंबाला बसत आहे.

- निर्मला शेवाळे, कडगाव (ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर)

वाढलेल्या खर्चाचा लेखाजोखा

प्रकार...आधीचा खर्च...आताचा खर्च

किराणा (प्रतिमहिना)...१५०० ते १८००.... २५०० रुपयांपेक्षा अधिक

शाळेचे शुल्क (वार्षिक)...८ ते १० हजार...१२ ते १८ हजार रुपये

शालेय पुस्तके (वार्षिक)... १५०० ते २५०० रुपये...३ ते ५ हजार

मोबाईल खर्च (प्रतिमहिना)...१२० ते १५० ...१८० ते ३०० रुपये

पेट्रोल-डिझेल (लिटर)...८० ते ९५ रुपये...१०५ ते १११ रुपये

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com