पुणतांब्यात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू

पाच दिवसांनतर आंदोलन अधिक तीव्र होणार
Farmer Protest
Farmer ProtestAgrowon

पुणतांबा, ता. राहाता, जि. नगर ः राज्यात शेतकऱ्यांची (Farmer) अवस्था दयनीय झाली आहे. ऊस, कांदा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. मात्र राज्य व केंद्र सरकार शेतकरी प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी एकमेकांवर चालढकल करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बुधवारपासून (ता. १ जून) पुणतांबा (ता. राहाता) येथे शेतकरी, गावकऱ्यांनी धरणे आंदोलन (Farmer Protest) सुरु केले आहे.

शासनाला मागण्याचे निवेदन दिल्यानंतरही दखल घेतली नसल्याने आंदोलनाचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. हे धरणे आंदोलन ५ जूनपर्यंत चालेल. तोपर्यंतही दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र होणार आहे.

राज्यात सध्या ऊस, कांदा दर, वीज, दूध आदींसह शेतमालाच्या दराचा प्रश्न वरचेवर अधिक गंभीर असताना शेतकरी प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी केंद्र व राज्य सरकार एकमेकांवर चालढकल करत आहेत. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी ऐतिहासिक शेतकरी संप पुकारणाऱ्या पुणतांबे (ता. राहाता) येथील गावकऱ्यांनी पुन्हा एकदा शेतकरी प्रश्नावर एल्गार पुकारला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी बैठक घेऊन व २३ मे रोजी ग्रामसभा घेऊन उसाला एकरी एक हजार रुपये अनुदान द्यावे, शिल्लक उसाला हेक्टरी दोन लाख रुपये द्यावे, कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा. कांद्याला प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे, शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळावी. थकीत वीजबिल माफ झाले पाहिजे, कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी. सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी, त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा, २०१७ साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. वन हक्क कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनी नावावर कराव्या आदी ठराव घेतले.

शासनाला सात दिवसांची मुदत दिली होती, मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने बुधवारी गावकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. प्रारंभी गावांतून रॅली काढून व मशाल पेटवून शेतकरी पुतळ्याला दुग्धाभिषेक केला आणि धरणे आंदोलनाला सुरवात झाली. आंदोलनात सरपंच डॉ. धनंजय धनवटे, सुभाष कुलकर्णी, सुहास वहाडणे, सुभाष वहाडणे, संगीता भोरकडे, ॲड. विजय सदाफळ, अॅड. चांगदेव धनवटे, धनंजय जाधव, बाळासाहेब चव्हाण, नामदेव धनवटे यांच्यासह इतरांची भाषणे झाली. धरणे आंदोलनात परिसरातील गावातील महिला, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

पुणतांबा, ता. राहाता ः सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या हस्ते शेतकरी पुतळ्याला अभिषेक केला. २) आंदोलनाची मशाल पेटविण्यात आली. ३) धरणे आंदोलनात सहभागी झालेले ग्रामस्थ, शेतकरी. (छायाचित्र ः किरण नाईक, पुणतांबा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com