
Farmers Issues शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणाऱ्यांची, लिहिणाऱ्यांची संख्या कमी नाही. कोणी त्याला ‘राजा’ संबोधते, तर कोणी त्याला ‘जगाचा पोशिंदा’ म्हणते. वास्तवात त्याच्या जीवनाच्या किती समस्यांना यामुळे फुंकर घातली जाते, माहीत नाही.
कारण आपल्या आजूबाजूला पाहिलं, तर हा राजा कधीही जगण्या-जगवण्याचा (स्वतःला, परिवाराला आणि सोबतचं आपल्या पिकाला) संघर्षात अडकून पडलेला दिसतो. हा संघर्ष कधी सर्वांच्या दृष्टीस पडणारा असतो,
तर कधी कधी हा संघर्ष शेतकऱ्याला अगदी एकट्यात रडवणारा, त्याच्या मनाची छिन्नी-छिन्नी करणारा असतो. असे संघर्ष सर्वांना दिसत नाहीत, त्याचे चिन्ह आणि परिणाम मात्र आपल्याला ओळखता येतात.
‘शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने (Farmers Son Wedding) जुळत नाहीत’ हा एकप्रकारे एका मुलाचा बाप म्हणून शेतकऱ्यासाठी संघर्षचं आहे आणि हो, आता यावर चर्चा होणे तितकेच गरजेचे आहे.
आयुष्यभर उन्हातान्हात, पाऊस-पाण्यात जिवाचा आकांत करून, अस्मानी संकटाशी दोन हात करून अन्नधान्य पिकवणारा शेतकरी जेव्हा स्वतः आपल्या उतारवयात येतो आणि आतातरी आयुष्यात शांततेचे दोन क्षण निवांत होऊन जगता येईल का,
सूनबाई-नातवंड यांनी बहरलेला परिवार पाहून कृतार्थ जीवन सार्थकी लागल्याचे समाधान मिळेल का, नातवंडांना अंगा-खांद्यावर खेळवण्याचे सुख मिळेल का, हा विचार करतो तेव्हा मात्र त्याच्या पदरी निराशाच येते, असे आजच्या शेतकरी समुदायाचे (Farmer Community) चित्र आहे.
काहीही झालं, की शेतकरी कुठं शिकलेला असतो, त्याला काय एवढं कळतं त्यातलं, असा दृष्टिकोन बाळगणाऱ्यांची कमी नाही, परंतु तो माणूसच आहे, त्यालाही मन आहे, त्यालाही वेदना होतात, हे आपण ओळखलं पाहिजे.
मुलगा ३०-३२ वर्षांचा झाला, पण अजून त्याचे दोनाचे चार हात होत नाहीत, या गोष्टीने त्याच्या मनाची काय अवस्था होत असेल हे त्याच्यापेक्षा चांगलं कुणीच समजू शकत नसेल.
कुटुंबसंस्था ही कोणत्याही समाजाचे एक महत्त्वाचे अंग आहे. तिचे व्यक्तीच्या जडणघडणीत, मानसिक आरोग्यावर, परिणामी शारीरिक आरोग्यावर अनेक परिणाम होत असतात. त्यातील लग्न हे व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे पर्व आहे.
परंतु आज विशेषतः ग्रामीण भागात, त्यातल्या त्यात शेतकरी युवकांना आपल्या आयुष्याचा साथीदार मिळविण्यात अनेक अडचणी येत आहेत.
नोकरी नसलेल्या मुलांच्या आयुष्यात जशी ही प्रमुख समस्या झाली आहे तसेच चित्र शेती कसणाऱ्या मुलांचेही आहे. शिक्षणानुसार नोकरीच्या अपूर्ण संधी, शेतीतून जेमतेम आर्थिक मिळकत, त्यातून इतर भावंडांचे शिक्षण, कौटुंबिक कार्ये, त्यामुळे पिछाडीवर राहिलेलं पक्क घरं, गाडी, घरातील इतर भौतिक सुविधा मागे पडतात.
आणि दुसऱ्या बाजूला या सर्व गोष्टींना सुखाच्या परिभाषेत मोडून आपली मुलगी सुखात पडावी अशी अपेक्षा वधू पक्षाला असते. या द्वंद्वात ग्रामीण भागातील बहुतांश मुलांचे लग्नाचे सरासरी वय २७-२८ वरून ३२-३३ वर्षे झाले आहे.
याचे फक्त मुलाच्या आयुष्यावर परिणाम होतात असे नाही. मुलगा जर ३२ वर्षांचा असेल तर आई-बाबांचं वय काय असेल हे वेगळं सांगायला नको.
त्या आईवडिलांना वयाचा थकवा जाणवत असला, तरी मनाच्या थकव्याने ते जास्त घायाळ झालेले असतात. घरात चुकूनही जेवणाच्या वेळेस लग्नाचा विषय निघाला तर जेवत्या ताटावरून लोकं उठून जातात, ही ग्रामीण भागातील आजची वस्तुस्थिती आहे.
मुलाची तर निराशा होतेच परंतु आईवडिलांनाही उतरत्या वयात या त्रासाला सामोरे जावे लागते. यातून पुढे नैराश्य, नको ते व्यसन, कर्जबाजारीपणा यायला लागतो.
या सर्व समस्या फक्त योग्य वयात लग्न न होण्यामुळे उभ्या राहतात. शेवटी मानवी समाजाच्या एकंदरीत जडणघडणीत याचे विपरीत परिणाम होतात.
शेतकऱ्यांच्या आयुष्यातील स्पर्श न झालेल्या या समस्यांना अधोरेखित करण्याची वेळ आली आहे, हे त्याच्या प्रत्येक समस्येवर तोंड भरून बोलणाऱ्या व्यक्तींनी लक्षात घेतले पाहिजे. आणि फक्त लक्षातच नाही तर या समस्येवर सर्वांगाने प्रयत्न केले पाहिजेत.
यावर काय उपाय असू शकतात तर सामाजिक स्तरावर अधिकाधिक वधू-वर परिचय मेळाव्याचे सातत्याने आयोजन, गावातील प्रतिष्ठित आणि सामाजिक वजन असलेल्या व्यक्तींनी या कार्यात पुढाकार घेणे, उभय पक्षांनी काही बाबींवर समजुती दर्शवणे, शेतकऱ्यांविषयी व त्यांच्या परिवाराविषयी सकारात्मकता अशा आशादायी पावलांनी या सामाजिक समस्येचे लोण थांबू शकते.
- योगेश पाटील, अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.