Fig Farming : थरच्या वाळवंटात वाढतेय अंजिराची शेती

अंजीर हे उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील पानगळ होण्याच्या प्रकारातील फळपीक आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील कडक ते मध्यम तापमान, भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम पाणी असलेल्या स्थितीमध्ये चांगल्या प्रकारे वाढते.
Fig Farming
Fig FarmingAgrowon

Fig Farming : राजस्थानच्या उष्ण आणि कोरड्या वातावरणामध्ये कमी पाण्याच्या उपलब्धतेमध्ये योग्य अशा पिकाचा शोध सातत्याने घेतला जात आहे. थर वाळवंटाच्या परिसरामध्ये तीव्र स्थितीमध्ये अंजिराची शेती (Fig Farming) ही वरदान ठरू शकते, हे लक्षात घेऊन बारमार जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राने (Agricultural Science Center) पुढाकार घेतला.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन करतानाच पहिल्या टप्प्यात रोपांचा पुरवठा करण्यात आला. यामुळे अंजिराचे क्षेत्र पाच हेक्टरवरून २०० हेक्टरपर्यंत वाढण्यास मदत झाली आहे.

भारतातील पाचव्या क्रमांकाचा सर्वांत मोठा असा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बारमारचे वातावरण हे शेतीच्या दृष्टीने अत्यंत तीव्र मानले जाते. येथील मातीचा प्रकारही वालुकामय गाळाची आहे.

शास्त्रीय भाषेमध्ये त्याला ‘लोमी फाइन टू कोर्स सॉइल’ असे म्हणता येईल. लोमी फाइन या प्रकारच्या मातीमध्ये चिकणमातीचे प्रमाण १८ ते ३५ टक्क्यांपर्यंत असते, तर लोमी कोर्स मातीमध्ये चिकणमाती (क्ले) प्रमाण हे ० ते १८ टक्के इतके असते.

त्याच प्रमाणे त्यात चुनखडीचे प्रमाणही अधिक असते. या प्रदेशातील पावसाचे वार्षिक प्रमाण पश्‍चिमेकडे २०० मि.मी. ते पूर्वेकडे ३७० मि.मी.पर्यंत आहे. येथे दुष्काळ ही बाब नित्याचीच आहे. पारंपरिकरीत्या या प्रदेशामध्ये बोर, खजूर आणि डाळिंब या फळपिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

तंत्रज्ञान ः अंजीर (शा. नाव ः Ficus carica) हे प्राचीन फळ असून, त्याचा उल्लेख अगदी बायबलमध्येही आलेला आहे. अंजिराच्या उत्पादनामध्ये जागतिक पातळीवर मध्यपूर्वेतील देश आघाडीवर असून, भारताचा क्रमांक १२ वा लागतो.

भारतामध्ये या फळपिकाची व्यावसायिक लागवड तुलनेने कमी आहे. प्रामुख्याने पश्‍चिम महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि सहारणपूर, कर्नाटकातील बेल्लारी, चित्रदुर्ग, श्रीरंगपट्टणम आणि तमिळनाडूतील कोइमतूर येथे अंजिराची शेती केली जाते.

Fig Farming
Fig Farming : मुंबई बाजारपेठेत झेंडेंच्या अंजिराची चलती

तीव्र वातावरणात तग धरण्याची क्षमता

अंजीर हे उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील पानगळ होण्याच्या प्रकारातील फळपीक आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील कडक ते मध्यम तापमान, भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम पाणी असलेल्या स्थितीमध्ये चांगल्या प्रकारे वाढते.

अंजीर ४५ अंश सेल्सिअस तापमानामध्येही चांगल्या प्रकारे तग धरते. त्याचा उत्पादन खर्चही अन्य फळपिकाच्या तुलनेत लक्षणीय कमी असतो. बारमार येथील वातावरणाचा विचार करता अंजिराची ही सारी वैशिष्ट्ये अत्यंत महत्त्वाची ठरतात.

त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा उद्देश असलेल्या भारतीय कृषी शास्त्रज्ञांच्या दृष्टीने या प्रदेशामध्ये अंजिराच्या लागवडीला प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले.

उत्पन्न ः अंजिराची फळे प्रति किलो ६० ते १०० किलो प्रमाणे विकली जातात. त्यामुळे एका झाडापासून १५०० ते २००० रुपये उत्पन्न मिळते. उत्तम व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी साधारणतः पाच ते सहा लाखांपर्यंत उत्पन्न मिळू लागले आहे.

हे अन्य पिकांच्या तुलनेमध्ये लक्षणीय आणि उत्तम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला असून, शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारत आहे.

फायदे ः सध्या तरी अंजिराची मागणी आणि पुरवठा यांचा विचार करता चांगले दर मिळत असल्यामुळे उत्पादकांना चांगला नफा मिळत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या फळात उच्च दर्जाची पोषक मूल्ये असल्याने शेतकरी कुटुंबाच्या पोषकतेची गरज भागवली जात आहे.

Fig Farming
Custerd apple And Fig : शेतकरी पुत्रच झाले विक्रेते

कृषी विज्ञान केंद्राचे योगदान

गुडमलानी येथील २०१२ मध्ये कृषी विज्ञान केंद्राची स्थापना झाली. त्यानंतर येथील शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी कृषी विस्ताराच्या कार्यक्रमावर भर देण्यात आला. त्यात सध्या असलेल्या पिकांसोबत नवीन आणि येथील वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे वाढण्याची क्षमता असलेल्या पिकांकडे लक्ष केंद्रित केले गेले.

त्यासाठी विविध पिकांचे पर्याय तपासण्यात आले. २०१९-२० मध्ये बारमार जिल्ह्यामध्ये केवळ पाच हेक्टर क्षेत्रामध्ये अंजिराची लागवड होती. मात्र शेतकऱ्यांमध्ये सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि मार्गदर्शनामुळे आज येथील अंजीर लागवड ही २०० हेक्टरवर पोहोचली आहे.

त्यात प्रामुख्याने डायना या वाणाचा समावेश असून, त्याची लागवड ४ बाय ४ मीटरवर केली जाते. सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जात असल्याने फळझाडावरील पाण्याचा ताण टाळला जातो.

सध्या या जिल्ह्यातील चौहाटन, सिंदरी, शिवाना, गुडमलानी, बारमार आणि शिओ या भागामध्ये अंजिराचा प्रामुख्याने लागवड आहे. तिसऱ्या वर्षी फळांचे उत्पादन सुरू झाले असून, प्रत्येक झाडापासून १५ ते २० किलो फळे मिळू लागली आहेत.

लागवडीसाठी आवश्यक रोपांची पूर्तता पहिल्या टप्प्यात केव्हीकेच्या माध्यमातून करण्यात आली. मात्र आता सध्या उत्पादन घेत असलेल्या शेतकऱ्यांनी रोपांच्या निर्मितीला सुरुवात केली आहे. त्यामुळे नव्या शेतकऱ्यांना त्यांच्याकडून चांगल्या दर्जाची रोपे उपलब्ध होऊ लागली आहेत.

(स्रोत ः कृषी तंत्रज्ञान वापर संशोधन संस्था, जोधपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com