
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी बुधवारी (ता. १) केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) मांडताना शेती क्षेत्राचा मोठा उदोउदो केला. सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा पाऊस पाडल्याचे चित्र रंगवले. परंतु प्रत्यक्षात शेती आणि ग्रामविकासाशी संबंधित अनेक योजनांच्या निधीत कपात केली. अर्थमंत्र्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक योजनांसाठी हात आखडता घेतलाय.
यंदाच्या अर्थसंकल्पात खतांसाठी सुमारे १ लाख ७५ हजार कोटी रूपयांचे अनुदान देण्याचे प्रस्तावित केले आहे. गेल्या वर्षी खत अनुदानासाठी सुधारित तरतूद सुमारे २ लाख २५ हजार कोटी रूपये एवढी होती. अन्न अनुदानासाठी सुमारे १ लाख ९७ हजार कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित आहे. गेल्या वर्षीची सुधारित तरतूद सुमारे २ लाख ८७ हजार कोटी रूपये होती.
शेती आणि पूरक उद्योगांसाठी सुमारे ८४ हजार कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मूळ तरतूद ८३ हजार ५२१ कोटी रूपये होती. नंतर सुधारित तरतूद सुमारे ७६ हजार करण्यात आली.
ग्रामीण विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे २ लाख ३८ हजार कोटी रूपयांची तरतूद आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील मूळ तरतूद सुमारे २ लाख ६६ हजार रूपये तर सुधारित तरतूद सुमारे २ लाख ४३ हजार कोटी रूपये होती. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी (मनरेगा) यंदा ६० हजार कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित आहे. गेल्या वर्षी मूळ तरतूद ७३ हजार कोटी रूपये होती, तर सुधारित तरतूद सुमारे ८९ हजार कोटी रूपये होती.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दिली जाणारी रक्कम वाढविण्यात येईल, अशी अर्थसंकल्पापूर्वी चर्चा होती. प्रत्यक्षात ती फोल ठरली. यंदा या योजनेसाठी ६० हजार कोटी रूपयांची तरतूद आहे. गेल्या वर्षीची मूळ तरतूद ६८ हजार कोटी तर सुधारित तरतूद ६० हजार कोटी रूपये होती.
पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १३ हजार ६२५ कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. गेल्या वर्षीची सुधारित तरतूद १२ हजार ३७६ कोटी रूपये इतकी तर मूळ तरतूद १५ हजार ५०० कोटी रूपये होती.
युरियासाठी यंदा १ लाख ३१ हजार १०० कोटी रूपये अनुदानाची तरतूद आहे. गेल्या वर्षीची सुधारित तरतूद १ लाख ५४ हजार ९८ कोटी रूपये होती. युरिया व्यतिरिक्त इतर खतांसाठी यंदा ४४ हजार कोटी रूपये अनुदान दिले जाणार आहे. गेल्या वर्षीची सुधारित तरतूद ७१ हजार १२२ कोटी रूपये होती.
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी यंदा १० हजार ७८७ कोटी रूपयांची तरतूद आहे. गेल्या वर्षी मूळ तरतूद १२ हजार ९५४ कोटी रूपये आणि सुधारित तरतूद ८०८५ कोटी रूपये होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.