प्रश्‍नातच उत्तर शोधा

चिखलातून कसाबसा बाहेर पडल्यानंतर ठसठसणारा तळपाय हातात घेऊन बघावा तर काटा खोलवर जाऊन मोडलेला असतो. रानात सुई नसते मग काट्यानेच काटा काढायची वेळ येते.
मशागत लेख
मशागत लेखAgrowon

शंकर बहिरट

पावसाळ्यात अनेकवेळा चिखलातून मार्ग काढणे म्हणजे मोठे दिव्य असते. चिखलात चालायचे म्हणजे एक पाय चिखलातून काढायचा तोपर्यंत दुसरा पाय खोल रुतत असतो. चिखलातून बाहेर पडायचे असेल तर शांतपणे त्या चिखलाचाच आधार घेत हळुवारपणे बाहेर पडावे लागते. वाईट परिस्थितीतून मार्ग काढताना कित्येक वेळा त्याच वाईट परिस्थितीचा आधार घ्यावा लागतो. त्याशिवाय त्या परिस्थितीतून बाहेर पडता येत नाही. तिथे दुसरा कोणताही आधार मिळण्याची वाट बघत बसावे तर परिस्थिती आणखी बिकट होऊन जाते.

मशागत लेख
कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करावेत

पाण्याबरोबर मऊ पोयटा वाहून येत असताना त्या बरोबर अणकुचीदार काटेही वाहून येत असतात. चिखलात पायताण घालून चालणे तर शक्यच नसते. चिखलात अनवाणी चालावे लागते अगदी तळपायाशी जीव एकवटून अलगद पाऊल टाकावे लागते. पण कुठेना कुठेतरी चिखलातला काटा पायात घुसतोच. पाय खोलवर गाडलेले असताना, काटा काढण्यासाठी पाय वर घेता येत नाही. नाइलाजाने वेदना सहन करत त्या काट्याला तसाच रगडावा लागतो. चिखलातून कसाबसा बाहेर पडल्यानंतर ठसठसणारा तळपाय हातात घेऊन बघावा तर काटा खोलवर जाऊन मोडलेला असतो. रानात सुई नसते मग काट्यानेच काटा काढायची वेळ येते. चिखलात अर्धवट कुजलेला काटा तुटत जातो. पाय रक्तबंबाळ होतो, पण कुजका काटा आतच राहतो. काटा काढण्याचे अनेक विफल प्रयत्न होतात. पाय अधिकच ठणकत राहतो. पायात पू होणे तशी चांगली गोष्ट नाही, पण आज्जी म्हणायची की पू झाला की काटा आपसूकच बाहेर येईल. ‘पू’ होणे वाईट गोष्ट असूनही पायातला काटा निघण्यासाठी एक सोपा उपाय आहे.

जखमेच्या वेदना कमी होण्यासाठी बिब्ब्याचा चरका दिला की रग मरते म्हणतात. म्हणजे वेदनेने वेदना मारायच्या! प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मानव सतत प्रयत्नशील असतो. मात्र जेव्हा सगळे पर्याय खुंटतात तेव्हा त्याच परिस्थितीचा फायदा घेऊन मानवाने आपली सुटका करून घेतली. असाध्य रोगावर उपचार म्हणून त्याच रोगाच्या अर्धमेल्या जंतूंपासून तयार केलेल्या लसी मानवासाठी वरदान ठरल्या. सर्प दंशावर उपचार म्हणून त्याच सापाच्या विषाचा उतारा माणसाने शोधून काढला. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची वेळ येते, त्या वेळी पर्याय संपले म्हणून हार न मानता. त्या प्रतिकूल परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले, तर त्या परिस्थितीतच दडलेला उपाय कामी येतो. प्रश्‍नातच उत्तर लपलेले असते मात्र ते शोधायची इच्छाशक्ती हवी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com