
डॉ. नीलेश हेडा
या वर्षी विदर्भात पळसाला (Flame Of The Forest) लवकर फुलं आली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच. असं आधी मी कधीच बघितलं नाही. माझ्याकडे या गोष्टीचं एकच उत्तर असतं- क्लायमेट चेंज!
पळस हा आमच्या विदर्भाचा ट्युलीप. युरोपातले ट्युलीप मी बघितले; पण पळस हा त्यात दिमाखदार वाटला. पळस फुलांचं फुलणं होळीच्या (Holi Festival) आगमनाची वर्दी असते. लहाणपणी पळसाच्या फुलांपासून (Palas Flower) तयार केलेला रंगच धूलिवंदनाला आम्ही वापरायचो.
पळस वसंताच्या आगमनाची वार्ता देतो. काही दिवसांपूर्वी संजय भगत यांच्या सोबत त्यांच्या गावातील बंदीत होतो. बंदी म्हणजे गावाला लागून असलेलं जंगल. तिथं मोठ्या प्रमाणावर पळस फुलला होता.
संजूभाऊ म्हणाले, ‘इतक्या मोठ्या प्रमाणावर पळस फुलला की येणारं वर्ष हे शेतकऱ्यांसाठी भरभराटीचं असतं. प्रत्येक वृक्ष हे संकेत देतात! शेतकरी ते संकेत ऐकतात आणि जगाचं पोट भरतात.’ मी म्हटलं, आमीन!
प्रा. माधव गाडगिळ विदर्भात आले, की पळस फुलांवर कालिदासाने लिहिलेला एक श्लोक म्हणायचे जो सध्या मला आठवत नाही. ते मला म्हणायचे, ‘पळस फुलला चोहीकडे अशा नावाने काही तरी दीर्घकाव्य लिही नीलेश!’ मी नम्रपणे म्हणायचो, ‘‘सर मी रोमॅंटिक पोयेट नाही. I have some hidden tragedy in my poetry.’’
‘श्वसन और मन अंगार हुआ खिले जब फूल पलाश के’ असं बस्तरच्या आदिवासींसारखं लिहिणं अवघड आहे. त्यासाठी कालिदासच हवा. विदर्भातल्या कधी कधी ४७ अंशांपर्यंत पोहोचणाऱ्या उन्हात हा पळस कसा आपलं सौंदर्य टिकवून ठेवत असेल हे देवच जाणे. तसं आपल्यालाही जमायला हवं.
जर विषय पळसाचा निघालाच आहे, तर माझ्यासारख्या निसर्गमित्राने थोडं अधिक संशोधन करून प्रकाश टाकायला हवा. पळसाबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत. सान्याच्या पंखांना दारूत बुडवून त्याचं रोपण केलं की पळस उगवतो, ही अशीच एक अख्यायिका.
पळस हा वृक्ष हिंदुइजम आणि बुद्धिजम या दोन्हींमध्ये मानला जातो. भगवान बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली संबोधी मिळाली, मात्र त्यानंतरचे दुसरे बुद्ध मेधंकारा यांना पळसाच्या झाडाखाली संबोधी मिळाली.
पळसाच्या झाडावर रवींद्रनाथ टागोर यांचे विशेष प्रेम होते. त्यांच्या शांतिनिकेतनमध्ये वसंताचा उत्सव या झाडाच्या फुलांपासून सुरू व्हायचा. प्लासीच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर याला ‘पलाश’ हे नाव मिळालं, असंही मी वाचलंय.
झारखंडचे राज्यपुष्प पळस आहे. पुराणांमधील कथांनुसार याची उत्पत्ती अग्नीमधून झाली. तापलेल्या उन्हात पळसाचे झाड एखाद्या ज्वाळेप्रमाणे दिसतं. त्यामुळेच कदाचित ब्रिटिश लोक पळसाला फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हणत असावेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.