'फ्लेक्सजिवीं'ना विनंती...

हायवे नं जाताना अतिशय गमतीशीर फ्लेक्स दिसला ज्यावर विविध जातीच्या कुत्र्यांचे 'पिटकुले' फोटो व त्या सगळ्या गॅंगच्यावर मोठ्या साईजचा फोटो होता.
'फ्लेक्सजिवीं'ना विनंती...

देवा झिंजाड

हायवे नं जाताना अतिशय गमतीशीर फ्लेक्स दिसला ज्यावर विविध जातीच्या कुत्र्यांचे 'पिटकुले' फोटो व त्या सगळ्या गॅंगच्यावर मोठ्या साईजचा फोटो होता. त्यावर 'टॉमी'शेठला वाढदिवसाच्या 'भोभो' शुभेच्छा असं लिहिलं होतं. शुभेच्छुक कुत्र्यांची नावंही छापली होती. माझी हसून हसून वाट लागली पण त्यानंतर मात्र ह्या फ्लेक्सबाजीनं मांडलेला उच्छाद डोळ्यासमोर आला. सर्वांचंच कुत्र्यांवर प्रेम असतं, त्याविरोधात मीही नाही पण ज्या कुत्र्यांना वाचता येत नाही त्यांच्या नावाचा फ्लेक्स लावून आपण नेमकं काय साध्य करतोय हेच मला कळत नाही.

पूर्वी एखाद्या बॅनरला सातआठ दिवस लागायचे पण हल्ली एका तासात फ्लेक्स बनवून द्यायचं तंत्रज्ञान आल्यापासून माणसं अगदी बावचळून गेली आहेत. कारण सध्या फ्लेक्सचा झालेला सुळसुळाट भयंकर आहे. सध्या माणसं कुठं अन् कशानिमित्त फ्लेक्सबाजी करतील ह्याचा आता काहीच नेम राहिला नाही.

३५ टक्के मार्कानं पास झाला लाव फ्लेक्स, पहिली दाढी करायचा कार्यक्रम लाव फ्लेक्स, ओढ अमक्या तमक्या तारखेची, वाढदिवस नव्हे महोत्सव, यात्रेवरून आला-गेला लाव फ्लेक्स, शासनाच्या खर्चातून काम सुरू केलं तरी लाव फ्लेक्स, लग्न जमलं लाव फ्लेक्स, फक्त १ पेन ४ वह्या वाटल्या तरी लाव फ्लेक्स, आम्ही करून दाखवलं लाव फ्लेक्स, प्रेम जडलं लाव रस्त्यावर फ्लेक्स. अजूनही बरीच कारणं आहेत. ह्या फ्लेक्सयुद्धात सर्वांत जास्त 'फ्लेक्सजिवी' बनलेत ते राजकीय पक्ष अन् त्यांचे चेले. त्यांचं काहीही घडो एका तासात मोठमोठे फ्लेक्स लावून ते रिकामे होतात. त्या फ्लेक्सच्यामागे महत्त्वाच्या इमारती, रस्त्याची नावं, महितीफलक झाकले जातात, ह्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. मला असं वाटतं की आपल्या इथं वाढदिवसाला व राजकीय संदर्भात जेवढे भरमसाठ फ्लेक्स लावले जातात ना तेवढ्या खर्चात हजारो गरीब मुलांचं शिक्षण होऊ शकतं. गरजूंच्या घरात एक वेळचं अन्न येऊ शकतं. केवळ फ्लेक्सच्या माध्यमातून स्वामीनिष्ठा दाखवून आपल्याला सगळं जग ओळखेल हा भाबडा आशावाद ज्यांच्या मनात असतो ना खरं तर त्यांना त्यांची गल्ली व रस्ता सोडून कुणीच ओळखत नसतं.

मी सरसकट फ्लेक्सच्या विरोधात नाहीय. विधायक कार्यासाठी, प्रबोधनासाठी योग्य ठिकाणी चांगले फ्लेक्स लावायला माझा काही आक्षेप नाहीय पण उठसुठ फालतू गोष्टींसाठी फ्लेक्स लावत सुटायचं ह्याला काहीच अर्थ नाही. फ्लेक्सजिवी लोकांनी हे जरा ध्यानात घ्यावं ही विनंती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com