ईशान्येकडील पूरस्थिती गंभीरच

आसाम, मेघालयातील जनजीवन विस्कळित; लाखो बेघर
ईशान्येकडील पूरस्थिती गंभीरच
Assam FloodAgrowon

शिलॉंग/गुवाहाटी (वृत्तसंस्था) : मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि पुरामुळे आसाम (Assam Flood) व मेघालयाची स्थिती ढासळली आहे. गेल्या दोन दिवसांत पूर (Flood) आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे आसाममध्ये १२ जण तर मेघालयात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. आसामच्या २८ जिल्ह्यांत १९ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना पुराचा फटका (Flood Affected) बसला आहे. त्याचवेळी एक लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. आसामच्या होजाई जिल्ह्यात पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी नेणारी नौका उलटल्याची घटना घडली. यात दुर्घटनेत तीन मुले बेपत्ता असून २१ जणांचा वाचविण्यात यश आले आहे.

मेघालयाच्या मौसिनराम आणि चेरापुंजी येथे १९४० नंतर प्रथमच विक्रमी पाऊस झाला आहे. मौसिनराम येथे गेल्या चोवीस तासात १००३.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यापूर्वी १६ जून १९९५ रोजी १५६३.३ मिलिमीटर आणि ५ जून १९५६ रोजी ९७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. होजाई जिल्ह्यातील रायकाटा येथे काल सायंकाळी पुरात अडकलेल्या चोवीस जणांना सुरक्षित ठिकाणी नेणारी नौका कोपिली नदीत अचानक उलटली. यात तीन मुले बेपत्ता झाले. ही नौका इस्लामपूर भागात पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या छावण्यांकडे जात होती.बेपत्ता मुलांचा शोध सुरू असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

तीन हजार गावांना फटका

आसामच्या सुमारे तीन हजार गावांना पुराने वेढा घातला आहे. ४३ हजाराहून अधिक एकरांवरील पिकांची नासाडी झाली आहे. ब्रह्मपुत्रा, गौरांग, कोपिली, मानस आणि पगलाडिया नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही नद्यांनी तर धोक्याची पातळी ओलांडली आहे. आसाम सरकारने पूर आणि भूस्खलनात अडकलेल्या लोकांसाठी गुवाहाटी सिल्चर येथे विशेष उड्डाणाची सोय केली आहे. दक्षिण आसाम, त्रिपुरा आणि मिझोरामला जोडणाऱ्या रस्त्याचा एक भाग भूस्खलनात वाहून गेल्याने या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी फोनवरून चर्चा करून पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

त्रिपुरातही हाहा:कार

त्रिपुराची राजधानी आगरताळा येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरात सहा तासात १४५ मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या सहा दशकांत आगरताळा येथे तिसऱ्यांदा सर्वाधिक पाऊस पडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे नद्यांना पूर आला असून शिक्षण संस्था बंद करण्यात आल्या आहेत. या पावसाचा त्रिपुरातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराला देखील फटका बसला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com