संवर्धित शेतीतून शाश्‍वत शेती

कोणत्याही पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी प्रत्येक पिकासाठी परिस्थिती नेमकी योग्य असणे गरजेचे असते.
Sustainable agriculture
Sustainable agricultureagrowon

नुकताच ‘ॲग्रोवन’मध्ये एक माजी कुलगुरूंचा लेख आला होता. त्यांनी लिहिले आहे, की कृषी क्षेत्रात आजपर्यंत जे संशोधन झाले, ते केवळ उत्पादनवाढ कशी करता येईल याभोवतीच फिरत राहिले. जास्त उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करणे या कामाला जितके प्राधान्य देण्यात आले त्यामानाने उत्पादनवाढीच्या इतर मार्गांकडे दुर्लक्ष झाले. अन्नपोषणाबाबत विविध खतांची उपलब्धता, त्यात असणारे अन्नद्रव्याचे प्रमाण, विविध पिकांसाठी खतांच्या मात्रा ठरविणे, रोग-किडींचा अभ्यास आणि त्यावरील उपाय यावरील अभ्यास त्या-त्या विषयांतर्गत होत राहिला. जमिनीचा अभ्यास हा त्यामानाने आजही दुर्लक्षित विषय असे मी म्हणतो.

१९७० मध्ये मी शेती पदवीधर झालो, त्या वेळी आपण सेंद्रिय खत जमिनीला नेमके का देतो याची त्या वेळी सांगितली जाणारी कारणे अशी होती, की जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी एकरी २०-२५ गाड्या चांगले कुजलेले खत मिसळणे गरजेचे आहे. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो, हवा खेळती राहते, जमीन कठीण होत नाही, पिकाला सेंद्रिय खतातून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. यामध्ये सेंद्रिय खते आणि सूक्ष्मजीवांच्या संबंधांविषयी कोणतीच माहिती दिली जात नव्हती. सेंद्रिय खत कसे तयार करावे, खड्डा कोणत्या मापाचा असावा, तो कशा पद्धतीने भरावा या गोष्टी शिकविल्या गेल्या. त्याचा अभ्यास झाल्यानंतर मी वडिलांच्या काळातील खतनिर्मितीचा मोठा खड्डा बंद करून ४' x ३' आणि शक्‍य तितक्‍या लांबीचे नवे ५ ते ६ खड्डे खोदून घेतले. या खड्ड्यांत भरण्यासाठी कच्चा माल म्हणजे शेण, जनावरांनी न खाल्लेली वैरण. या घटकांच्यापासून सेंद्रिय खत केले जात असे. हे खत कधीच पुरेसे पडत नसे. मग फक्त तीन वर्षांतून एकदा भात पिकासाठी वापरले जात असे. याला कारण भाताच्या पूर्वमशागतीत ते कुळवाच्या शेवटच्या पाळीत जमिनीत व्यवस्थित मिसळणे सोपे जाई. माझी काही माळाची हलकी जमीन होती तेथे वाटणीला खत येत नसे. मग तेथे तागाचे हिरवळीच्या खताचे पीक घेतले जाईल. पावसाळ्यात ताग डोक्‍याबरोबर उंच वाढे. शिफारशीप्रमाणे फुले दिसू लागताच तो मातीत गाडण्याचे काम केले जाई. संपूर्ण रानभर ४ ते ५ फूट वाढलेला ताग जमिनीत गाडल्यानंतर जमीन प्रचंड सुपीक होईल, उत्पादन चांगले मिळेल अशी मनामध्ये स्वप्ने रंगविली जात होती.

पुढे या तंत्राचा सूक्ष्मशास्त्रीय अभ्यास झाल्यावर त्याच्या मर्यादा लक्षात आल्या. शेतकरी शेणखत गरजेइतके टाकता येत नाही म्हणून हिरवळीचे पीक करतो. एका शास्त्रज्ञाने असे मत व्यक्त केले आहे, की तागाचे पीक उत्तम वाढण्यासाठी त्याला भरपूर सेंद्रिय खत देणे गरजेचे आहे. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कुजविणारे जिवाणू खतातील अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण करतात, असे लिहीत असताना हे जिवाणू कधीही स्थिरीकरणासाठी वाढत नाहीत, त्यांना नेमून दिलेले काम सेंद्रिय पदार्थाचे विघटन करीत असताना हे काम आपोआप घडते. यासाठी जमिनीत कुजणारा पदार्थ असणे आणि कुजण्याची क्रिया चालू राहण्यासाठी अनुकूल परिस्थितीकीची गरज आहे. ही बाब सहसा विचारात घेतली जात नाही.

Sustainable agriculture
शेतकरी कंपन्यांसाठी बाजार व्यवस्थापन

पोयटा माती कणांचे प्रमाण
१) पोयटा माती कण यांच्या प्रमाणावरून जमीन हलकी किंवा भारी हे ठरते. पोयटा मातीचे कण पाच पदरी असतील तर ती जमीन सर्वांत भारी समजतात. या कणांवर विद्युतभार सर्वांत जास्त असतात. त्यामुळे असे कण खताचे अंश जास्त प्रमाणात धरून ठेवू शकतात. काळी कसदार जमीन या वर्गात मोडते.
२) माळाच्या हलक्‍या जमिनीचे कण तीन पदरी असतात. यावर तुलनात्मक विद्युतभार कमी असतात. अशा जमिनींची खतांचा कार्यक्षम वापर करण्याची मूळ क्षमता कमी असते. योग्य सेंद्रिय खत व्यवस्थापनाने ती वाढविता येते.


आर्द्रता
आर्द्रता जास्त काळ टिकून राहणे, ज्याला चिबड जमीन म्हणतात. तेथे खतांची कार्यक्षमता अतिशय कमी असते. अतिरिक्त पाणी लवकरात लवकर जमिनीतून निघून जाऊन त्याला योग्य वेळेत वाफसा आल्यासच खतांचा कार्यक्षम वापर होऊ शकतो. या गुणधर्माची कल्पना सर्वांना आहे.

हवेचे प्रमाण
१) हवेचे प्रमाण योग्य असल्यासच खतांचा कार्यक्षम वापर होऊ शकतो याची माहिती सर्वांना असते; परंतु जमिनीमध्ये योग्य प्रमाणात हवा खेळती ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमके काय केले पाहिजे यावर फारशी चर्चा होत नाही.
२) चांगल्या पूर्वमशागतीच्या कामात जमिनीतील लहान-मोठ्या पोकळ्या मोडल्या जातात. हवेचे प्रमाण कमी राहते. असे सांगितले जाते, की आपण जर हवेचा पुरवठा वाढवू शकलो (याला मर्यादा आहे.) तर काही प्रमाणात उत्पादन वाढू शकते. पिकाला पोषण देणारी सर्व जिवाणूसृष्टी हवेच्या सान्निध्यात काम करणारी असते. शून्य मशागत पद्धतीमध्ये मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष जागेला तसेच कोणताही धक्का न लावता ठेवले जातात. ते पुढे वाळल्यानंतर जमिनीत लहान-मोठ्या पोकळ्या निर्माण होतात.
३) बीना नांगरणीमुळे जमीन तर घट्ट असते आणि त्याच अवस्थेत भरपूर सच्छिद्रही राहते. अशा परिस्थितीत केवळ योग्य प्रमाणात हवा उपलब्ध झाल्याने उत्पादनात भरपूर वाढ मिळते. जमिनी नांगरल्यामुळे हवा खेळती राहते ही कल्पना काही अंशी चुकीची ठरते. यालाच हवेच्या व्यवस्थापनासंबंधित चर्चा फारशी कोठेच केली जात नाही. हवा व्यवस्थापनासाठी काही तंत्रे राबविता येतात (कोणताही खर्च नाही) याची शेतकरी वर्गात अजिबात कल्पना नाही.

सामू
सामू जमिनीचा वापर करून अल्कतेकडे जातो याविषयी यापूर्वी आपण पाहिले आहे. जागेवर अवशेष कुजविल्यास फुकटात सामू दुरुस्त होतो. हे एक नैसर्गिक चक्र आहे; परंतु योग्य माहितीअभावी शेतकरी काहीच करीत नाहीत अगर रासायनिक उपचार करण्यात पैसे खर्च करतात. वरील फुकटातला उपाय शेतकऱ्यांपुढे का आणला जात नाही.

तापमान
प्रत्येक अन्नद्रव्य काही ठराविक तापमानाला योग्य प्रमाणात शोषले जाते उदा. नत्राचे शोषण ३४ ते ३५ अंश सेल्सिअस तापमानाला चांगले होते. हा नियम हिवाळी पिकात बदलू शकतो. गव्हाला थंडीचा काळ जितका जास्त मिळेल तितके त्याचे उत्पादन जास्त मिळते. यासाठी उत्तर भारतात बीना मशागतीने गहू पेरणी केली जाते.

Sustainable agriculture
उन्हाळी चारा पिकांची १७ हजार हेक्टरवर पेरणी

स्थिरीकरणाचा अभ्यास ः
स्थिरीकरणाच्या अभ्यासात एक नवीन मार्ग लक्षात आला. आता आम्ही म्हणतो पीक वाढत असता युक्तीने मुख्य पिकाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने तणे वाढविणे गरजेचे आहे. अशी तणे वाढविल्यास तीही एक वनस्पतीच असतात. आपल्या गरजेनुसार जमिनीतील अन्नद्रव्ये घेतात. पुढे योग्य वेळी ती तणनाशकाने मारली आणि जागेला कुजू लागली तर जो सेंद्रिय कर्ब तयार होईल तो पिकासाठी अन्नद्रव्याचा स्थिर साठाच असेल. समस्त शेतकरी वर्गाला हा मार्ग हास्यास्पद वाटेल; परंतु योग्य तण व्यवस्थापनामुळे पिकाची अत्यंत जोमदार वाढ होत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी आपले अनुभव नमूद केले आहेत. हा एक स्थिरीकरणाचाच प्रकार म्हणता येईल. या मार्गाने आपण खतांची कार्यक्षमता कित्येक पटीने वाढवीत नेतो. जे आजच्या परिस्थितीत सर्वांत गरजेचे आहे. याचा आणखी सविस्तर अभ्यास पुढे तणव्यवस्थापनासंबंधित लेखात घेणार आहोत.खतांच्या कार्यक्षम वापरासाठी स्थिरीकरण जसे महत्त्वाचे आहे, तसेच जमिनीतील पोयटा कणांचे प्रमाण, आर्द्रता, सामू, घन ऋण भार, जमिनीतील हवेचे प्रमाण, तापमान इत्यादी अनेक घटक हे कार्यक्षम खत वापरासाठी महत्त्वाचे आहेत याचा उल्लेख यापूर्वी या लेखात केला आहे. त्यावर क्रमाक्रमाने माहिती घेणार आहोत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com