Forest Farmers: जगावेगळे जंगलप्रेमी शेतकरी

आम्ही जंगलात राहणाऱ्या सोमण कुटुंबाला भेटूनच चिपळूणला जाण्याचा निर्णय घेतला.मी व्हॉट्सअॅपवर नीरजला संदेश पाठवला. त्याचा रात्री मेसेज आला. नक्की येणार असाल तर कळवा. जेवायलाच या. त्याने गुगल लोकेशनही पाठवलं. इथं रेंज नसते, त्यामुळे निघताना मेसेज पाठवा,असं त्यानं सांगीतलं.
Forest Farmers
Forest FarmersAgrowon

कोकणातील नरवणमध्ये गेलो असताना डॉ. वैद्य यांच्याशी गप्पा मारत होतो. तेव्हा जंगलात शेतीत (Forest Farmers) राहणाऱ्या सोमण कुटुंबाविषयी कळलं. त्यांच्या घराजवळच गेल्या आठवड्यात जंगली कुत्रे (Wild Dogs) आढळल्याचंही डॉ. वैद्य यांनी सांगीतलं. मोबाईलवर त्यांनी फोटोही दाखवला. सोमण कुटुंबातील नीरज हा पक्षीप्रेमी (Bird Lover) व उत्तम फोटोग्राफर असल्याची माहितीही कळली. डॉक्टरांचा मुलगाही तिथंच होता. तो म्हणाला, नीरज माझा मित्र आहे. हे सगळं ऐकून त्यांना भेटावं, अशी इच्छा माझ्या आणि आशुतोषच्या मनात निर्माण झाली. नीरजचा फोन नंबर मिळाला.

आम्ही जंगलात राहणाऱ्या सोमण कुटुंबाला भेटूनच चिपळूणला जाण्याचा निर्णय घेतला.मी व्हॉट्सअॅपवर नीरजला संदेश पाठवला. त्याचा रात्री मेसेज आला. नक्की येणार असाल तर कळवा. जेवायलाच या. त्याने गुगल लोकेशनही पाठवलं. इथं रेंज नसते, त्यामुळे निघताना मेसेज पाठवा,असं त्यानं सांगीतलं.

सकाळी नरवणमध्ये नाष्ता करून बाहेर पडलो. चिपळूण रस्त्यावर तळीच्या पुढे डावीकडे वळायचं होतं. गुगलचं मार्गदर्शन होतचं. मध्येच गाडीत पुरेसं पेट्रोल नसल्याचं लक्षात आलं.पाच किलोमीटर परत येऊन तळीला पेट्रोल भरून निघालो. आतमध्ये वडदकडं जाणारा हा सिंगल रस्ता खराब होता. त्यामुळे सावकाश प्रवास करीत साडेअकरा वाजता सोमण यांच्या शेताकडं वळायच्या ठिकाणी आलो. तिथं नीरज मोटारसायकल घेऊन आमची वाट बघत होता. वीस वर्षांचा नीरज प्रसन्न आणि उत्साही तरूण आहे.

घराजवळ पोचल्यानंतर लक्षात येतं की, या परिसरातील हे एकमेव घर आहे. रस्त्यापासून बरंच आतमध्ये. घराला लागूनच सोमण कुटुंबाची बागायती शेती आहे. समोर दिसणाऱ्या डोंगरावरील बरचसं जंगल त्यांच्याच मालकीचं असंल्याचं कळलं. पाय धूऊन आम्ही घरात प्रवेश केला. कोकणातील घरासारखं साधं घर. जुन्या पध्दतीचं. बसण्यासाठी मोठी प्रशस्त जागा. आत प्रवेश केल्यानंतर, खुर्चीवर आजोबा बसलेले दिसले. श्रीहरी नारायण सोमण. ऐंशीच्या आसपास वय असावं.

सोमण पुण्याला एसकेएफ कंपनीत नोकरीला होते. इथं वडिलोपार्जित थोडीशी जमीन होती. ती कसायला म्हणून १९७५ साली ते आले. गावात त्यांना वाळीत टाकण्यात आल्याने, आपल्या जंगलालगतच्या शेतीत एक छोटी झोपडी बांधून ते राहू लागले. हा भाग वस्तीपासून बराच दूर आहे. आजुबाजुला एकही घर नाही. त्यांच्या घरापर्यंत यायचा रस्ता त्या काळात त्यांनी स्वत:च केलाय. सुरूवातीला कुक्कुटपालन केलं. बागेतून उत्पन्न काढून आणखी जमीन घेतली. टप्प्याटप्प्याने घर बांधलं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ते इथं टिकून राहिले. बिबट्यासह विविध वन्य प्राण्यांचा मुकाबला त्यांना करावा लागला. त्यांचे असे कितीतरी किस्से आम्ही ऐकलेत. खरं तर यासंदर्भात त्यांच्याशी बोलायचं होतं. मात्र वेळेअभावी ते जमलं नाही. त्यामुळं ते किस्से खूप रोमांचक असले तरी, ऐकीव असल्याने इथं टाकले नाहीत.

सोमण यांना धवल आणि केदार ही दोन मुलं. दोघांनी पुण्यात काही काळ कॉलेज शिक्षण घेतलं. पण त्यांना शेतीची मनापासून आवड. त्यामुळे ते शिक्षणात रमले नाहीत. दोघेही पूर्ण वेळ शेती बघतात. धवल यांचा मोठा मुलगा व सून नोकरीनिमित्ताने तर धाकटा मुलगा इंजिनिअरिंगसाठी पुण्यात आहेत. तो शेवटच्या वर्षाला आहे. केदार सोमण यांची छोटी मुलगी पुण्यात एसएनडीटीला बारावीला आहे. या एकत्र कुटुंबात एकूण ११ जण राहतात. सगळ्यांची या मातीशी नाळ घट्ट जुळलेली आहे.

Forest Farmers
Cotton Boll Worm : कापूस पट्ट्यात पुन्हा बोंडअळीचा प्रादुर्भाव

आम्ही बसलो तिथं दोघंही आले.काही वेळ गप्पा झाल्या. तेव्हा लक्षात आलं, ही माणसं बिनधास्त जगणारी आहेत. बागेत सापडलेल्या अजगराचा किस्सा त्यांनी सांगितला. आम्ही लगेच सगळेजण जेवायला बसलो. तांदूळ-नाचणी मिक्स पिठाची गरमागरम भाकरी, त्यावर तूप, वांग्याची भाजी, आमटी, भात, दही, ताक असं खास शेतकरी कुटुंबातलं जेवण झालं. जेवणाचा टेबल किचनमध्येच होता. आजीसह दोन्ही सुना गप्पात सहभागी झाल्या होत्या. असा कौटुंबिक मोकळेपणा फार क्वचित पाहायला मिळतो.

पावसाळी वातावरण होतं. अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या. धवल आणि केदार सोमण हे दोघेही त्यांच्या कामात व्यस्त होते. लाईनमनला घेऊन, शेतातील विजेच्या तारांचं काहीतरी काम चालू होतं. नीरज हा केदार सोमण यांचा मुलगा. तो सावर्डे चिपळूण येथे कृषी बायोटेक करतोय. दुसऱ्या वर्षाला आहे. रविवार असल्याने तो घरीच होता. तो कमरेला कत्ती अडकवून निघाला तेव्हा तो खराखुरा जंगलसोबती असल्याचं लक्षात आलं. त्याच्यासोबत आशुतोष व मी निघालो. डोंगराच्या पायथ्याला पोचल्यानंतर लक्षात येतं की, हे घनदाट जंगल आहे. नीरज हातातल्या कत्तीने फांद्या छाटत रस्ता करून देत होता. बहुतेक वेली काटेरी असल्याने सावधपणे चालावं लागत होतं. या जंगलात माणसांचा वावर जवळपास नाहीच. जंगलात बिबट्या, लांडगे, जंगली कुत्रे असल्याचं नीरजनं सांगितलं. तो बोलला की, या जंगलातून सरळ वर जायचं म्हटलं तर बराच वेळ लागेल शिवाय थोडी रिस्कही आहे. त्याऐवजी आपण समोरच्या कातळाच्या डोंगरावर जाऊ. ते चढणंही चॅलेंजिंग आहे. मी म्हटलं,आ म्ही तुझ्या मागे मागे येऊ.

Forest Farmers
Soybean Rate : दर पाडण्यासाठीच वायदे बंदीला ‘सोपा’चे समर्थन

हळूहळू जंगलातून बाहेर पडून आम्ही मोकळ्या मैदानात आलो. पावसामुळे कातळ निसरडा बनला होता. थोडंस चाललो नाही तोच मी घसरलो पण सावरलोही. कातळावरची ही चढण सरळ होती. सगळीकडं छोटसं कुसळी टाईप गवत उगवलेलं. पाय ठेवताना ती जागा घसरणारी असेल असं अजिबात वाटत नाही. पण क्षणात पाय घसरतो. चार-पाच वेळा माझा पाय घसरला पण लगेच तोल सांभाळल्याने पडलो नाही. सुरक्षेचा भाग म्हणून मी तिथल्याच एका वाळलेल्या बांबुची काठी घेतली. एका हातात छत्री दुसऱ्या हातात ती काठी घेऊन चढण चढली. नीरजला या डोंगरावर चढण्याचा बऱ्यापैकी सराव असावा. तो सहजपणे पुढे चढत होता. माथ्यावरून खाली उतरलो नाही तोच पावसाची जोरदार सर आली. तिघांनी आपापल्या छत्र्या उघडल्या. काही वेळ तिथंच थांबलो. नीरज सांगत होता, या डोंगरावर नेहमी जास्तच पाऊस पडतो. दुरून बघणाऱ्यांना आम्ही ढगातच आहोत, असं वाटलं असतं. सगळा परिसर ढगांनी व्यापला होता. मस्तच वातावरण होतं.

नीरज हा खरा निसर्गप्रेमी ,पक्षीप्रेमी, अभ्यासक आहे. वाटेत त्याने पंधरा-वीस झाडांची नावं सांगितली. आवाजावरून तो पक्षी कोणता ते सांगितलं. काही पक्ष्यांचे हुबेहूब आवाजही तो काढत होता. एकंदरीत आमची मस्त भ्रमंती सुरू होती. आम्ही उभे होतो तिथं नदीच्या पाण्याचा आवाज येत होता. त्या दिशेनेच आम्ही निघालो. एका छोट्या लोखंडी गेटमधून आम्ही नारळ-सुपारीच्या बागेत प्रवेश केला. ती बाग त्याच्या नातेवाईकाची आहे. पावसामुळे जमिनीवर सगळीकडं थोडा चिखल-पाणी होतं. मध्येच पावसाचे बारीक सटकारे येत होते. नीरज आम्हाला ओढ्यावरील लाकडी पुलावर घेऊन गेला. स्वच्छ खळाळत वाहणारं पाणी. हे पाणी डोंगरावरून वाहत येत होतं. जेवणानंतर पाणी पिलं नसल्याने, मला तहान लागली होती. मी खाली उतरून पोटभर पाणी पिलं. पुलावर फोटो काढले.

खाली उतरून नीरजने पाय धुतले म्हणून आम्हीही पाय धुतले. बाजुला नैसर्गिक गर्द झाडी होती. थोडसं पुढं जाऊन नीरजने सँडल काढले. आम्हीही त्याचं अनुकरण केलं. समोरच्या मुर्तीकडं बोट दाखवत नीरज म्हणाला, कधी काळी कोणीतरी इथं ही मूर्ती बसवली. त्यामुळं परिसरातील सगळी झाडं ही या देवाची झाली. ही देवराई बनली. म्हणून इथं हे घनदाट जंगल बनलंय. बाजुला केवडा कितीतरी वाढला होता. प्रचंड मोठ्या वेली होत्या. त्यातील एक मोठी वेल तोडल्याचं दिसत होतं. नीरज उपहासानं बोलला, परवाच इथल्या गुरवाने ही वेली व इतर काही झाडं तोडलीत. गुरव म्हणत होता, देवाला झाडांची अडचण होतेय. आम्ही तिघेही एकदम हसलो. वीस वर्षांच्या नीरजची प्रगल्भता इथं दिसून आली. नीरज काही भाबडा आध्यात्मिक नाही.

तिथून नदी ओलांडून पुढे आलो की, नीरजची बाग सुरू होते. सुपारीच्या बागा मी पहिल्यांदाच बघत होतो. उंचच उंच गेलेली झाडं. मध्येच नव्याने लागवड केलेली सुपारी, अननसाची झाडं. फयाण वादळात त्यांच्या बागेतील सुपारीची एक हजारापेक्षा अधिक झाडं आडवी झाली होती. इतर फळझाडांचंही नुकसान झालं होतं. त्याचं त्यांना किती दु:खं झालं असेल, याचा एक शेतकरी म्हणून सहज अंदाज येऊ शकतो. मात्र या प्रचंड नुकसानीमुळं सोमण कुटुंबिय हतबल झाले नाहीत. त्या जागी त्यांनी ही नवी लागवड केलीय.

सोमण यांची पाच एकरची ही बाग विशेष निगा राखलेली असल्याचं लगेच लक्षात येतं. या बागेचं वैशिष्ट्य म्हणजे, झाडांची मिक्स लागवड केली आहे. सुपारीच्या बहुतेक झाडांवर मिरीच्या वेली सोडण्यात आल्यात. यामुळं सुपारीवर रोग पडत नाही, असं नीरज बोलला. जायफळ,फणस, अननस, काजूची झाडंही या बागेत आहेत. मी कॉफीचं झुडूप आणि व्हॅनिलाची वेल पहिल्यांदाच बघितली. त्याच्या शेंगा दाखवल्या. व्हॅनिला प्रचंड महागडा असल्याचं तो बोलला. घरी गेल्यानंतर त्यानं व्हॅनिलाच्या शेंगा दाखवल्या. शिवाय शेतातील कॉफीच्या बियांपासून बनवलेली काळी कॉफी पाजली.

सोमण कुटुंबियांचं शेतीतील सगळं जगणं समजून घ्यायचं तर त्यांच्या शेतातल्या घरी किमान दोन दिवस मुक्काम करायला हवा. आम्ही इच्छा व्यक्त केली असती तर, त्यांनी स्वागतच केलं असतं. पण आम्हाला रात्री चिपळूणला परतायचं होतं. पुन्हा कधीतरी भेटू असं मनोमन ठरवून आम्ही निरोप घेतला.

नारळ,सुपारी व इतर मसाल्याच्या पदार्थांची अशी एकत्रित शेती मी पहिल्यांदाच बघितली. या शेतीसमोरच्या समस्या, यांचं मार्केट हे कोरडवाहू शेतीपेक्षा वेगळंच आहे. हे सगळं जवळून पाहताना मला जाणवलं. सोमण कुटुंबिय खरे रानसोबती आहेत. त्यांचं मातीवर अफाट प्रेम आहे. त्यामुळेच ते असं आयुष्य जगताहेत. अशी माणसं बघितली की बर वाटतं. आपल्या सारखे जगणारे लोक आहेत, हे बघून आनंद वाटतो.

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.) ९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com