
कोल्हापूर ः येथील ‘स्वयंसिद्धा’च्या (Women Self Help Gropu) चाळीस जिगरबाज महिलांनी केवळ तीन दिवसांत तब्बल ३२ हजार तिळाचे लाडू (Til Ladu) तयार करून जिद्दीची प्रचिती दिली. लाडूच्या ८ हजार पाकिटांची विक्रीही भोगीच्या (Makar Sankranti) दिवशीच करण्यात आली.
तीन दिवस सकाळी आठ ते सायंकाळी उशिरापर्यंत काम करीत स्वयंप्रेरिका महिला सहकारी आौद्योगिक संस्थेच्या महिलांनी हा विक्रम केला.
येथील स्वयंसिद्धा ही संस्था महिलांच्या उन्नतीसाठी अनेक वर्षांपासून काम करत आहे. कांचनताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली संस्था राज्यभरातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी काम करते.
दिवाळीचे विविध पदार्थ, उपवासाचे पदार्थ व विविध सणासाठी लागणारे खास पदार्थ तयार करण्यासाठी वर्षभर लगबग सुरू असते. त्या त्या सणाच्या पार्श्वभूमीवर काही दिवस काम करून ऑर्डर पूर्ण करण्याचे काम या महिला करतात.
संक्रातीच्या पार्श्वभूमीवर गुळपोळी, तीळ पोळी, लाडू आदींची मागणी होतीच. मागणी पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू असतानाच अगदी शेवटच्या क्षणी एका राजकीय नेत्याकडून तब्बल ३२ हजार तीळ लाडूंची मागणी नोंदविण्यात आली. इतक्या कमी अवधीत लाडू तयार करण्याचे मोठे आव्हान होते.
संस्था दिवाळी असो वा कोणताही सण असो, ठरावीक दिवसांनंतर मागणी नोंदवून घेण्याचे काम बंद करते. महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन महिलांवर ताण येऊ नये यासाठी अगदी शेवटपर्यंत शक्यतो पदार्थ तयार केले जात नाहीत.
संक्रातीसाठी अचानक एवढी मोठी मागणी आल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून ही ऑर्डर घेण्याचे ठरवले. तातडीने संस्थेच्या सक्रिय सदस्यांना बोलवण्यात आले. ‘रात्र थोडी सोंगे फार’ अशीच परिस्थिती ही मागणी पूर्ण करताना होती.
सुमारे ४० महिलांनी हे आव्हान जिद्दीने स्वीकारले. अत्यंत गतीने व अखंडित प्रयत्न करत लाडू हाताने तयार करणे, त्याचे पॅकेजिंग करणे आदी बाबी अगदी योग्य वेळेत पूर्ण केल्या. एका पाकिटात चार लाडू अशा पद्धतीने पॅकिंग करण्यात आले. १४ रुपयांना एक याप्रमाणे पाकिटाची विक्री झाली.
विशेष म्हणजे भोगीच्या दिवशीच संक्रातीसाठीच्या लाडवांची पूर्तता करण्यात आली. मनात जिद्द ठेवून या महिलांनी सांघिक काम करत एक मोठे आव्हान पार केल्याचे समाधान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आले.
इतक्या मोठ्या प्रमाणात काम करणे हे केवळ सांघिक प्रयत्नांमुळे शक्य झाले. मागणी पूर्ण करण्यासाठी संस्थेच्या महिलांनी दिलेला प्रतिसाद निश्चितपणे प्रेरणादायी व आत्मविश्वास वाढवणारा आहे.
- तृप्ती पुरेकर, संचालिका, स्वयंसिद्धा
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.