खोटं बोलण्याची मुभा...

मी अनेक पुस्तकं ऑनलाइनही (Online Books) मागवतो. काहीजण अभिप्रायासाठीही मला पुस्तकं पाठवतात. त्यामुळे घरी आलेलं पार्सल फोडून कुठलं पुस्तक आहे हे माझी मुलं कुतूहलानं पाहतात.
Books
Books Agrowon

देवा झिंजाड

मी अनेक पुस्तकं ऑनलाइनही (Online Books) मागवतो. काहीजण अभिप्रायासाठीही (Opinion On Book) मला पुस्तकं पाठवतात. त्यामुळे घरी आलेलं पार्सल फोडून कुठलं पुस्तक आहे हे माझी मुलं कुतूहलानं पाहतात. सुरेशजी सावंत ह्यांचं सचित्र कवितेचं पुस्तक 'गुगलबाबा' हे त्यांना खूप आवडलं होतं. काही कविता विराज म्हणूही लागला पण माझ्यासाठी येणारी सगळीच पुस्तकं ही त्यांच्या बाळअपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा हिरमोड होतो. विराज पहिलीत आहे. त्याला पार्सलवरील नाव वाचता येतं. एक दिवस तो मला कोड्यात टाकणारं बोलला, "बाबा, आपल्या घरी येणाऱ्या बुक्सवर तुमचंच नाव असतं, त्यामुळे त्यामध्ये छोट्या गोष्टी आणि रंगीत चित्रंबित्र अजिबात नसतात."

Books
मला भावलेलं पुस्तक गार्डन ऑफ द प्रॉफेट

"बाळा, तू अजून लहानयेस, मोठा झाल्याव येतील तुझ्याही नावावं पुस्तकं; तोवर तू आपल्या कपाटातली पुस्तकं खाली घेऊन बघत जा."

"ती नको बाबा, त्यात चित्रं आणि गोष्टी नाहीयेत " त्याचा बाळउद्देश व अपेक्षा माझ्या लक्षात आल्या. त्यातच डॉ. सुवर्णाताई धुमाळ ह्यांनी दिलेल्या पुस्तकातली चित्रं पाहून पोरांनी गोष्टी समजून घेऊन सांगायलाही सुरुवात केली. हा बदल फार आशादायी होता. त्यांना ह्या पुस्तकभेटीनं प्रेरणा मिळाली. खरं तर मीही पोरांना पुस्तकं देतच होतो पण जेव्हा माझे मित्र घनश्याम पाटील ह्यांच्याकडं विराजला घेऊन गेलो होतो तेव्हा त्यांनी त्याला 'थांब ना रे ढगोबा' व इतर पुस्तकं भेट दिली तो आनंद फार वेगळाच वाटला. कारण ती पुस्तकं त्याला भेट म्हणून मिळाली होती असं त्याला वाटलं होतं.

मग मी एक आयडिया केली, ती अशी की काही पुस्तकं स्वतः विकत आणून इन्व्हलपमध्ये पॅक करून त्यावर 'विराज/काव्या झिंजाड' व पूर्ण पत्ता लिहून ते इन्व्हलप गुपचूप पत्रपेटीत टाकलं. घरात जाऊन फ्रेश होऊन म्हणालो, "चला पोरांनो, लेटर बॉक्समध्ये काही आलंय का बघून येऊ." मग खाली येऊन त्यातून इन्व्हलप काढली. त्यावरील दोघांची नावं वाचून दोघेही उड्या मारीतच घरात आले. इन्व्हलप फोडून बराच वेळ आतल्या पुस्तकाकडं दोन्हीही पाखरं बघत राहिली. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद फार मोठं समाधान देऊन गेला. आता ही आयडिया मी पुन्हा पुन्हा वापरतोय अन् लेकरांच्या मनात पुस्तकांविषयीचं प्रेम अजून वाढवतोय. हे करताना मनात येतं की आपण खोटं बोलून त्यांना पुस्तकं पाठवतोय पण चांगल्या गोष्टी रुजविण्यासाठी थोडंफार खोटं बोलण्याची मुभा स्वतःला दिली तर काय हरकत आहे?

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com