काळाच्या कॅमेऱ्यातून...!

स्मार्ट फोन आला आणि जुना कॅमेरा अडगळीत पडला. ‘कालाय तस्मै नमः’ म्हणत आपण चालत राहिलो पुढे-पुढे आणि कॅमेऱ्याने टिपलेले क्षण सरकत राहिले मागे-मागे.
Memories
MemoriesAgrowon

राजेंद्र उगले

कॅमेऱ्याचा शोध अप्रतिमच! माणसाला जसं आहे तसं टिपणारा हा कॅमेरा कमालीचा हुशार असतो. तो आपल्याला नीटनेटकं आवरायला सांगतो, मेकअप करायला सांगतो, पाहिजे त्या पोजमध्ये आपल्याला हवं तसं टिपतो आणि जतनही करून ठेवतो. स्मार्ट फोन आला आणि जुना कॅमेरा अडगळीत पडला. ‘कालाय तस्मै नमः’ म्हणत आपण चालत राहिलो पुढे-पुढे आणि कॅमेऱ्याने टिपलेले क्षण सरकत राहिले मागे-मागे. कधीतरी निवांत क्षणी आपण काढतो अल्बम किंवा आताची फोटो गॅलरी आणि जाऊन डोकावतो भूतकाळात! भूतकाळ कसाही असला तरी तो देतो आपल्याला आठवण करून; त्याकाळात आपण कसे होतो त्याची.

आपण रमून जातो तासन् तास गतकाळाच्या आठवणीत. कधी पोटभर घेतो हसून तर कधी बघत बसतो कौतुकाने फोटोतल्या चेहऱ्यांना. त्यांच्या चेहऱ्यावरून प्रेमानं फिरवतो हात. कधी सुखावतो गोड आठवणींनी तर कधी येतं डोळ्यात टचकन पाणी... फोटोतली एखादी जागा कायमची रिकामी झालेली पाहून. डोळ्यांचा पूर होतो रूपांतरित महापुरात आणि आपण खात राहतो गटांगळ्या... वाहत राहतो याच पाण्यात बराच वेळ. कधीतरी भानावर येऊन करतो गॅलरी बंद आणि बंद डोळ्यांच्या पुढे नाचू लागतो पुन्हा भूतकाळाचा पट. जीवाभावाचे अनेकजण भेटून जातात कडकडून या काही क्षणात. आपल्या चेहऱ्यावरचे बदलत राहतात क्षणाक्षणाला भाव. विरंगुळ्यासाठी काढलेले हे फोटो दाखवतात आपल्याला आपला जुना आरसा आणि आपण तयार होतो भविष्यकाळातील फोटोसाठी!

मानवनिर्मित कॅमेऱ्यात न आलेले अगणित क्षण टिपणाराही असतो एक कॅमेरा. होय, काळाचा कॅमेरा म्हणतात त्याला! तो काढून देतो आपल्याला भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील फोटो. त्याच्या कॅनव्हासवर उमटलेले चित्र करते आपल्याला अंतर्बाह्य अंतर्मुख! याच कॅमेऱ्यात साठवल्या जातात असंख्य मेमरीज; ज्यात असते वेदना, संवेदना, चेतना!

भावभावनांचा तर सुंदरच झालेला असतो मिलाफ. काळाच्या बंद कॅमेऱ्यातून टिपलेली आपली छबी बालपणापासून तर आजच्या वर्तमानापर्यंत घडवते आपल्याला प्रवास. जीवनात आलेल्या प्रत्येक क्षणाची क्षणचित्रे असतात तिथे कैद; जी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत होत नाहीत डिलीट. काळाचा हा कॅमेरा आपल्या वाढत्या वयाबरोबर होत जातो अनुभवसंपन्न. आपल्या डोळ्यांवर येतो भिंगाचा चष्मा आणि याच्या लेन्स होत जातात अधिक सक्षम. काळाच्या कॅमेऱ्याने काढलेले हे क्षण बघत रहा पुन:पुन्हा. आपल्या वर्तमान आणि भविष्याचा रस्ता सुकर झालाच म्हणून समजा!

राजेंद्र बापूराव उगले, नाशिक

संपर्क:- ९९२२९९४२४३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com