गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...

बालपणीचा काळ सुखाचा... ते भारावलेले, अज्ञानात सुख असलेले बालपणीचे क्षण सर्वांचेच वेगळे असतात. पायी शाळेत जाणं. आणि ते ही रांगेत जाण्याचा नियम असायचा.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...
मशागत लेखAgrowon

बालपणीचा काळ सुखाचा... ते भारावलेले, अज्ञानात सुख असलेले बालपणीचे क्षण सर्वांचेच वेगळे असतात. पायी शाळेत जाणं. आणि ते ही रांगेत जाण्याचा नियम असायचा. रस्त्याने येताना सीझननुसार बोर, चिंचा, सागरगोटे गोळा करत करत घर कधी यायचं हेही कळत नसायचं. पावसाळ्यात तर संपूर्ण रस्ताभर चिखल असायचा आणि मग कुणाच्या ड्रेसवर चिखलाचे किती शिंतोडे उडाले हे पाहता पाहता घर यायचं... घरी आल्यावर कळायचं, की आपणही चिखलाने काही कमी माखलेले नाहीत.

घर पत्र्याचं होत. पाऊस आला की जागोजागी जे दिसेल तेथे भांड ठेवावं लागायचं. एके ठिकाणी एवढं घर गळायचं, की ५ मिनिटांत मोठं पातेलं भरायचं. पाऊस आल्यावर पाणी साठवणं हाच आम्हा सर्वांचा उद्योग. खूप मजा यायची. लांबून विहिरीवरून शेंदून पाणी भराव लागे. वडिलांपासून ते लहान भावापर्यंत आम्ही ६ जण पळतच अख्खा हौद भरायचो. तेव्हा पाणी किती जपून वापरायला हवं याची जाणीव व्हायची. लाइट गेल्यावर तेव्हा इनर्व्हटर कसले. कंदील, दिवा, पणती, मेणबत्ती यावर वेळ घालवावी लागे. पण भारी मजा यायची. लाइट गेल्यावर आमचा लपाछपीचा खेळ सुरू व्हायचा.

मग अंधारात एकमेकांना घाबरवणे हा रंजक उद्योग आम्ही भावंडे करायचो. दारात चिचेंच झाड होत. त्यावर कित्येकदा बसून अभ्यास केलाय. आई आणि वडील खूप कष्ट करायचे. त्यांनी प्रत्येक गोष्ट आम्ही न मागता दिली. खूप हौस पुरवली आणि आजही पुरवतात. वडील आर्मीत असल्याने आई सर्वोत्तम प्रकारे शेती करायची. शेती करता करता आमच्याकडेही तिचे बारीक लक्ष असायचे. दिवसभर शेतीत कष्ट करून वर्षाकाठी चांगले पीक आणि उत्पन्न ती मिळवायची. घरी असणाऱ्या शेळ्या, गायी, म्हशी आणि त्यांची पिले यांचीही आई स्वतःच्या लेकरागत काळजी घेत असे. पप्पा आर्मीतून रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनीही आईला शेतीकामात खूप मदत केली. शेतीला अगदी लहान बाळाप्रमाणं ही दोघं जपायची. आई-वडिलांनी आम्हा चौघांना लहानपणी खूप ठिकाणी फिरवलेही. हे दिवस खरंच खूप रम्य होते. सुविधा कमी पण आनंद खूप. आता त्या पत्र्याच्या घराची जागा एका छानशा टुमदार बंगल्याने जरी घेतली असली तरी ते जुने घर अजूनही मनात

घर करून आहे. कारण त्या घरात प्रेम, माया, वात्सल्य, जिव्हाळा होता. रात्रीच्या चांदण्यांच्या प्रकाशात सर्वांनी मिळून जेवण्यातली मजा आज कशातच नाही. चुलीवरचे ते खमंग जेवण त्यात आईच्या हातची चव एकदम लाजवाब. आजच्या पिढीला नळ सुरू केला, की पाणी मिळतं. विहीर, हातपंपाचा अनुभव फारच दुर्मीळ झालाय. लाइट गेली की सगळ्या सुविधा असतात घरात. या सर्व सुविधांमुळे मग संयमाचा अभाव दिसतो. कारण सगळ बटण दाबलं की मिळतं. तंत्रज्ञानाच्या या झपाटलेल्या जगात कुणालाही कुणासाठी मिनिटभर वेळ नाही. ही मोठी खंत. म्हणूनच म्हणावंस वाटत..., गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी...!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com