Ganesh Chaturthi 2022 : गणेशोत्सव म्हणजेच आनंदोत्सव

गणेशोत्सवामध्ये भक्तिभाव महत्त्वाचा असतोच त्याबरोबरच विविध जातिधर्मांचे लोक गणेशोत्सवात आनंदाने सहभागी होतात.
Ganesh Chaturthi 2022 : गणेशोत्सव म्हणजेच आनंदोत्सव

शंकर बहिरट

विद्येची देवता असणाऱ्या गणेशाचे आगमन म्हणजे गणेशोत्सवाचे दहा दिवस आबाल वृद्धांमध्ये आनंद आणि उत्साह घेऊन येणारा हा सण आहे. गणेशोत्सवामध्ये भक्तिभाव महत्त्वाचा असतोच त्याबरोबरच विविध जातिधर्मांचे लोक गणेशोत्सवात आनंदाने सहभागी होतात. भव्य देखावे साकारण्यासाठी होणारा अमाप खर्च, अवाढव्य गणेश मूर्ती, डोळे दिपावून टाकणारी विद्युत रोशणाई, कर्णकर्कश आवाज आणि छातीत धडकी भरवणाऱ्या डिजिटल साउंडच्या भिंती आदी अवास्तव खर्चाला फाटा देऊन आपत्तिग्रस्त, आजारी, अपंग, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची विधायक आणि सेवाभावी वृत्ती गणेश मंडळात वाढत आहे. लोक प्रबोधन, सामाजिक सलोखा आणि ऐक्याची भावना गणेशोत्सवातून अभिप्रेत असते. मात्र एकाच गावात अनेक गणेश मंडळे तयार होऊन चौकाचौकांत गणपती बसवले जातात. तरुण मंडळांमध्ये एकमेकांमध्ये चुरस आणि ईर्षा वाढीस लागते. मिरवणुकीमध्ये तंटे होतात. उत्सवाला गालबोट लागते.

Ganesh Chaturthi 2022 : गणेशोत्सव म्हणजेच आनंदोत्सव
Maize : मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

एक गाव एक गणपती, अशी संकल्पना राबवून एकी आणि सलोखा राखण्यात अनेक गावे यशस्वी झाली आहेत. त्यांचा आदर्श इतर गावांनी घ्यायला हवा. गणेशोत्सव हा जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कसा होईल, हा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. गणपतीच्या डेकोरेशनसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल, प्लॅस्टिकपासून बनवलेले साहित्य, कृत्रिम हार, फुले आदी वापरणे टाळले पाहिजे. कारण या गोष्टी पर्यावरणाला घातक आहेत. अनेक शेतकरी गणेशोत्सव दसरा-दिवाळी या सणांमध्ये आपल्या फुलांना चांगला भाव मिळेल असे गृहीत धरून फुलांची शेती करत असतात. प्लॅस्टिकपासून बनवलेल्या परदेशातून आयात केलेल्या फुलांऐवजी आपल्या शेतकरी बांधवांच्या शेतात फुललेली सुगंधी फुले विकत घ्यावी त्यांनाही फायदा होईल. डेकोरेशनसाठी नैसर्गिकरीत्या विघटन होणाऱ्या साहित्याचा वापर करायला मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे. त्यांच्यातील कल्पनाशक्ती आणि कलेला वाव देऊन त्यांनी स्वतः तयार केलेली कलाकुसर विकत आणलेल्या गोष्टींपेक्षा जास्त आनंद देईल.

घरच्या घरी शाडू मातीची गणेशमूर्ती बनवून पर्यावरण रक्षण करण्याची जागृती अनेक भाविकांत वाढत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती आणि त्या मूर्ती रंगवण्यासाठी वापरण्यात आलेले रासायनिक रंग पर्यावरणासाठी समस्या होत आहेत. व्यवस्थापनाने अनेक ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद बांधलेले असतात. गणेशमूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित न करता अशा कृत्रिम हौदातच विसर्जित करायला हव्यात. आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी, समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी, नेतृत्व गुण वाढवण्यासाठी, सामाजिक ऐक्य आणि सेवाभावी समाज घडवण्यासाठी गणेशोत्सवाचा सकारात्मक उपयोग करून घेतला पाहिजे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com