आधार द्या, परावलंबित्व नको

शाळेच्या पहिल्याच दिवशी एक मुलगी रडताना दिसली. बाकी सगळी मुलं मस्ती करत होती. शाळेच्या नवख्या वातावरणात ती बावरलेली दिसली. तिच्या टपोऱ्या डोळ्यांतले ते अश्रू पाहून तिला का रडतेस विचारले. तर म्हणे मुझें मम्मी की याद आ रही है.
मशागत लेख
मशागत लेखAgrowon

जयश्री वाघ

जवळपास दहा वर्षे अध्यापनाचे काम केले. मुलांच्या सहवासात त्यांच्यासोबत शिकणं आणि शिकवणं निरंतर सुरू होतं. मुलं म्हणजे विविधरंगी, बहुढंगी फुलं. काही धीट काही भित्री, काही बोलकी, काही बुजरी, काही शांत काही अवखळ. शाळेच्या पहिल्याच दिवशी एक मुलगी रडताना दिसली. बाकी सगळी मुलं मस्ती करत होती. शाळेच्या नवख्या वातावरणात ती बावरलेली दिसली. तिच्या टपोऱ्या डोळ्यांतले ते अश्रू पाहून तिला का रडतेस विचारले. तर म्हणे मुझें मम्मी की याद आ रही है. घर जाना है.

आता घरी जायला परवानगी देणं किंवा तिच्यावर रागावणे दोन्ही चुकीचे ठरले असते. मुलांच्या कोवळ्या मनावर कायमस्वरूपी चरे पडतात अशाने! तिला जवळ घेऊन म्हटलं, मैं भी तो तुम्हारी मम्मी जैसी हूं. त्या एका वाक्याने तिला खूप आश्‍वस्त केलं. कळी एकदम खुलली, ओल्याशार डोळ्यांत हसू उमललं. ती मोकळेपणाने हसू बागडू लागली. मग मला कधी फुलं तर कधी ग्रिटींग कार्ड्‍स देताना खूप आनंदी दिसायची. तिच्या डोळ्यातलं प्रेम, आदर लपत नसे. अभ्यास मन लावून करायची.

एक दिवस मी रजेवर होते तर ही दिवसभर रडत बसली. ना खाणे ना खेळणे ना अभ्यास. मला वाईट वाटलं खरं, पण ते तिचं माझ्यावर अवलंबून असण्याचं खटकलंही. पुढे मी मोठ्या सुट्टीवर जाणार होते. मला तिची काळजी वाटू लागली. आपल्यातील भावबंध मुलांना कमजोर बनवत असतील तर काय उपयोग? मला तिच्याशी हळूहळू तटस्थ वागायचं होतं. जे तिच्याइतकंच मलाही त्रासदायक होतं. मादी जिराफ नाही का पिल्लाला जन्म दिल्या दिल्या त्याला लाथ मारते. त्याने त्वरित धावणे शिकून स्वतःचं रक्षण करावं यासाठीच. तिच्यातल्या वात्सल्याचा आणि कठोरपणाचा सोबतच उगम होतो. माणसाची मुले तुलनेने उशिरा स्वावलंबी होतात ते त्यांना मिळालेल्या सुरक्षा कवचामुळेच!

आपल्यामुळे आधार मिळावा, पण समोरच्या व्यक्तीला त्याने परावलंबित्व यायला नको. त्या अपमानातून होणारा आत्मक्लेश शारीरिक वेदनेहून कमी नसतो. स्वावलंबन आणि स्वाभिमान सोबतच चालतात. एखाद्या याचकाला एकदोन वेळचं जेवण देण्यापेक्षा त्याला ते स्वतःच मिळवता यावं. यासाठी प्रयत्न करायला हवेत. उगमींचि वाळुनि जाये । तो वोघीं कैचें वाहे। किंवा जैसा निरिंधन अग्नि। विझोनि जाय।। असं तात्पुरत्या मदतीचं होतं. आपल्यावर अवलंबून असणाऱ्या माणसांना आपल्या नंतरही स्वतंत्रपणे जगता यावं, मदत किंवा दान करून पुण्य कमावल्याच्या कैफात हा विचार सतत जागृत ठेवता यावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com