पौष्टिक उत्पादनांना जागतिक संधी

जागतिक बाजारपेठेतील वाढत्या ‘ग्लुटेन फ्री’ पदार्थांमुळे भरड धान्य विक्रीसाठी चांगली संधी आहे. कोरोना नंतरच्या काळात आरोग्याविषयी जागरूकता तयार झाली आहे. या संधीचा फायदा घेत युवा शेतकऱ्यांनी लागवड ते विक्री व्यवस्थापनात पुढाकार घेतला पाहिजे.
Millet
MilletAgrowon

शेती ही भारतीयांची जीवनशैली. देशातील वैविध्यपूर्ण हवामानामुळे आपल्याकडे विविध पीक पद्धती पाहावयास मिळते. परंपरागत पीक पद्धतीमधील भरड धान्यांचा विचार करता भारतामध्ये ८० पेक्षा जास्त जाती आपल्या आहारशैलीचा भाग आहेत. मात्र हरितक्रांतीच्या काळामध्ये भरड धान्यांची लागवड मागे पडली. त्या वेळी जनतेची भूक भागविणे हे आपल्यासमोर आव्हान होते. यातून गहू, भात लागवडीमध्ये क्रांती झाली. उत्पादन वाढ आणि देशभर प्रसारही वाढला. गहू आणि भात पिकांतील संशोधन, जागरूकता, खप, उत्पादन विकास जसा झाला, त्या प्रमाणात भरडधान्यांची वाढ झाली नाही. सार्वजनिक वितरण व्यवस्थादेखील गहू आणि तांदळासाठी पूरक झाली. त्याचा परिणाम भरड धान्याच्या खपावर देखील झाला. यामुळे भारतीय आहारातून भरड धान्ये हळूहळू मागे पडली.

महाराष्ट्राचा विचार करता, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम भागात ज्वारी बाजरी मोठ्या प्रमाणात घेतली जाते. कोकण, सह्याद्री पर्वत रांगांमध्ये प्रामुख्याने नाचणी, वरी लागवड दिसते. बदलती जीवनशैली, खाण्याच्या सवयीमुळे मागील तीन दशकांपासून ज्वारी, बाजरी, नाचणी आहारातून कमी झाली. याला कारण म्हणजे वाढते शहरीकरण, औद्योगिक प्रगती, पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण. यातच भर म्हणजे शासन स्तरावरून गहू आणि तांदूळ वितरणाला मिळालेले प्रोत्साहन. याचाही भरडधान्यांच्या वितरणावर परिणाम झाला आहे. गेल्या काही वर्षांतील लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला तर आज लोकांच्या आहारात जीवनसत्त्व बी १२, जीवनसत्त्व ई, तंतुमय पदार्थ, पौष्टिक मूल्यांची कमतरता आहे. यातून मधुमेह, रक्तदाब, संधिवात, पित्त, हद्यरोगाच्या समस्या दिसून येतात. या समस्येवर मात करण्यासाठी आणि समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी भरड धान्यातील पौष्टिकतेचे महत्त्व ओळखून भारत सरकारने पोषक धान्ये म्हणून राजपत्र प्रसिद्ध केले आहे. ही एक चांगली संधी तयार झाली.

देश- परदेशात संधी

भरडधान्यांचे आरोग्यदायी महत्त्व तसेच त्यातील विविध पिकांच्या संवर्धनासाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष ‘जागतिक भरड धान्य वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. यामुळे पुन्हा एकदा भरडधान्यांना जागतिक बाजारपेठेत महत्त्व मिळाले आहे. यातून आपल्या राज्यातील शेतकरी तसेच प्रक्रिया उद्योजकांनाही चांगली संधी तयार होत आहे. महाराष्ट्राशेजारील राज्यांमध्ये भरडधान्यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झाला, तसा तो आपल्याकडे झाला नाही. आज राज्यात बोटावर मोजण्याइतके भरड धान्य प्रक्रिया प्रकल्प आहेत. हे चित्र बदलण्यासाठी चांगली संधी आहे.

भरड धान्याचे मोठे फायदे आहेत. तंतुमय घटकांचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेह, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत मिळते. प्रथिनांचे प्रमाण अधिक आहे. महत्त्वाचे म्हणजे कमी कालावधी तसेच दुष्काळ सहन करण्याची ताकद या पिकांमध्ये आहे. जागतिक बाजारपेठेतील वाढत्या ‘ग्लुटेन फ्री’ पदार्थांमुळे भरड धान्य विक्रीसाठी चांगली संधी आहे. कोरोना नंतरच्या काळात आरोग्याविषयी जागरूकता तयार झाली आहे. या संधीचा फायदा युवा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे.

भरडधान्य प्रक्रिया उद्योगातील अनुभव ः

महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने २०१२ मध्ये भरड धान्य विकास कार्यक्रम योजना सुरू केली. यामुळे ज्वारी, बाजरी, नाचणी, गौण भरड धान्यावर प्रक्रिया करून विविध खाद्य पदार्थांच्या निर्मितीला चालना मिळाली. या क्षेत्रात नावीन्य असले तरी व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला. हे लक्षात घेऊन आम्ही समृद्धी अॅग्रो समूहाच्या माध्यमातून भरड धान्यप्रक्रिया सुरू केली. चवीशी कोणतीही तडजोड न करता आरोग्यदायी उत्पादनांच्या निर्मितीवर आम्ही भर दिला. ही उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस देखील पडली. त्यामुळे उत्पादनाचा वेग वाढतच गेला. भरड धान्यांच्या उत्पादनांपासून ते मल्टीग्रेन ब्रेकफास्टचे पर्याय, सेंद्रिय आणि आरोग्यदायी फ्लेक्स ते फायबर समृद्ध अन्न, विविध प्रकारचे पीठ ते मल्टीग्रेन मिक्स, पफ, स्नॅक्स निर्मितीपर्यंत आम्ही पोहोचलो. यातून देश- विदेशांतील बाजारपेठ लक्षात आली. ग्राहकांचा कल समजला. त्यानुसार विविध उत्पादनांची निर्मिती सुरू झाली. उत्पादक शेतकरीदेखील जोडले गेले. आम्ही देवळाली प्रवरा येथे ‘समृद्धी अॅग्रो ग्रुप’ नावाचे धान्य ग्रेडिंग युनिट सुरू केले.

खरे तर ज्वारी आणि भरड धान्याचे प्रक्रिया पदार्थ बाजारात आणणे सोपे नव्हते. उत्पादन निर्मितीसोबतच आम्ही विक्री कौशल्य आत्मसात करून निर्णय घेतला. सकस अन्न ही संकल्पना लोकांमध्ये रुजू लागली. ग्राहकांचा कल लक्षात घेऊन ज्वारी चिवडा, ज्वारी पोहे, ज्वारीचे इडली मिक्स, नाचणीचे इडली मिक्स, डोसा मिक्स, ज्वारीचा रवा, नाचणीचा रवा, भरड धान्याचे पीठ, असे अनेक पदार्थ तयार केले. विक्री करताना ग्राहकांची मागणी लक्षात घेणे आवश्यक असते. पदार्थांच्या गुणवत्तेच्या बरोबरीने आम्ही कुटुंबाच्या आकारानुसार पदार्थाचे पॅकिंग आकर्षक बनविले. आज अमेरिका, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका या सारख्या देशात भरडधान्य प्रक्रिया उत्पादनांना चांगली मागणी आहे.

भरडधान्य उत्पादन, विक्रीतील आव्हाने...

भरडधान्ये आरोग्यासाठी चांगली आहेतच, मात्र त्यांचे उत्पादन आणि विक्री वाढवायची असेल तर या धान्यांच्या आरोग्यविषयक गुणधर्माबाबत जनजागृती वाढविणे आवश्यक आहे.

भरडधान्याविषयी अनेक कारणांनी उदासीनता दिसून येते. शासकीय तसेच खासगी स्तरावर भरडधान्यांच्या आरोग्यविषयक गुणधर्माबाबत अधिक प्रसिद्धी दिली पाहिजे.

आज छोट्या उद्योजकाला कमी वेळामध्ये सुलभतेने कर्जपुरवठा होत नाही. छोट्या गावात तयार झालेल्या उत्पादनांची शहरी भागात विक्री करणे काही वेळा अवघड ठरते. शासकीय पातळीवर धोरण बदलणे अत्यंत गरजेचे आहे.

शेतकरी तसेच प्रक्रियादाराने बदलत्या परिस्थितीत विक्री कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज आहे. स्वतःचा ब्रॅण्ड तयार करावा. यातून देश-विदेशांतील बाजारपेठेत स्वतंत्र ओळख तयार होते.

क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत जागरूकता निर्माण करून मोठ्या प्रमाणात भरड धान्य आणि प्रक्रिया पदार्थांची जाहिरात होणे आवश्यक आहे. यामध्ये मोठी गुंतवणूक असल्याने छोट्या उद्योजकाला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. यासाठी सामूहिक प्रयत्नांची आणि शासनाच्या पाठिंब्याची गरज आहे.

उत्पादनांची विक्री करताना...

जेव्हा आपण राज्य आणि परदेशामध्ये पदार्थ विक्रीसाठी पाठवताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे, जसे की, त्या देशातील प्रमाणित मानकांचा अभ्यास, प्राथमिक पॅकिंग आकर्षक आणि योग्य माहितीपूर्ण पाहिजे. आवश्यकतेनुसार प्रमाणपत्र पडताळणी करणे आवश्यक आहे. आपल्या उत्पादनांचे दर हे शक्यतो भारतीय रुपयांत घेणे सोईस्कर ठरते.

आम्ही प्रक्रियेसाठी लागणारे सर्व धान्य आणि आवश्यक असलेला कच्चा माल थेट शेतकऱ्यांकडून त्यांना बाजारपेठेत मिळणाऱ्या दरापेक्षा जास्त दराने घेतो. आमच्या सोबत जोडलेल्या २९ हून अधिक शेतकऱ्यांच्याकडून दर्जेदार धान्य उत्पादन घेतले जाते. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या धान्य उत्पादनांना आम्ही प्राधान्य दिले आहे, त्यामुळे खाद्य पदार्थाची गुणवत्ता चांगली राहते. यामुळे देश, विदेशांतील ग्राहकांचाही प्रतिसाद वाढतो आहे.

पुढील वर्षी साजऱ्या होणाऱ्या जागतिक भरड धान्य वर्षांचे महत्त्व लक्षात घेऊन तरुणांनी पुढाकार घेत आरोग्यदायी अन्नप्रक्रिया व्यवसायात यशस्वी भरारी घेण्यासाठी आतापासूनच पावले उचलली पाहिजेत.

■ तात्यासाहेब फडतरे

९४०४३२७८५३

(लेखक भरडधान्य प्रक्रिया उद्योजक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com