
Millets Crop
मुंबई : ‘‘तृणधान्याला गरिबांचे धान्य म्हटल्याने याआधी ही धान्याचा प्रसार झाला नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय तृणधान्य महोत्सवामुळे शेतकऱ्याला चांगला भाव आणि ग्राहकांना माफक दर हे उद्दिष्ट साध्य होईल,’’ असा विश्वास आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांनी बुधवारी (ता.२२) व्यक्त केला.
पणन विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित तृणधान्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
या महोत्सवानिमित्त बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तयार केलेल्या तृणधान्याच्या पदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
दिवेकर म्हणाल्या, ‘‘तृणधान्यांचा वापर दैनंदिन आहारात झाला तर त्यातील पौष्टिक तत्वांमुळे आपल्याबरोबर आपल्या पुढील पिढ्याही सुदृढ होतील. त्यांचे आरोग्य चांगले राहील.
आपल्या खाद्यसंस्कृतीचे महत्त्व लोकसाहित्यातून पुढच्या पिढीपर्यंत आले आहे. मात्र, आपण ते विसरत गेलो आहोत.
एखादी गोष्ट जोपर्यंत पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत त्याचे महत्त्व आपल्याला कळत नाही. ह्रदय सुदृढ राहण्यासाठी कोणते तेल वापरावे असा प्रश्न ज्यावेळी पडतो त्यावेळी ऑलिव्ह ऑइल हे उत्तर असते.
भगर, ज्वारी, नाचणी अशी तृणधान्य त्यांच्या नावाने ओळखली जावीत. ती मुख्य प्रवाहात आली तर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. तेव्हाच या मिशनचा फायदा होईल. मधुमेह, मानसिक आरोग्य आणि केसगळती, त्वचारोग आदी आजारांवर तृणधान्य उपयुक्त आहेत. त्यामुळे त्याचा प्रसार झाला पाहिजे.’’
कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले म्हणाले, ‘‘तृणधान्याचे कमी होणारे क्षेत्र ही चिंतेची बाब आहे. बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी तृणधान्याच्या उत्पादनाकडे वळत नाही.
शेतकरी नगदी आणि अधिक भाव मिळणाऱ्या पिकाचे उत्पादन घेत आहेत. ज्वारीची उत्पादकता वाढली असली तरी त्याचे उत्पादन मात्र सातत्याने घटत आहे.
या पिकांना चांगला भाव मिळाला तरच शेतकरी त्याकडे वळतील. तृणधान्यांना चांगल्या दर मिळावा यासाठी आपल्याला फूड प्रोसेसिंगकडे वळावे लागेल. ‘रेडी टू इट’ आणि फास्ट फूडच्या समांतर पदार्थ तयार करणारी यंत्रणा आपल्याला विकसित करावी लागेल. या महोत्सवातून ही मूल्यसाखळी विकसित होईल.’’
सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार म्हणाले, ‘‘‘तृणधान्यांना भविष्यासाठी अन्नाचा पर्याय बनविणे ही काळाची गरज आहे.
या पिकाचे आरोग्य विषयक फायद्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे आणि आहार साखळीमध्ये तृणधान्याचे स्थान परत मिळवणे गरजेचे आहे.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात पौष्टिक तृणधान्य पणन व मूल्यसाखळी मिशन राबविण्यात येईल.’’
कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, पणन विभागाचे सह सचिव डॉ. सुग्रीव धपाटे, स्वामी समर्थ शेतकरी कंपनीचे नरेंद्र पवार, कृषी आयुक्तालयाचे सहसंचालक विनय आवटे, पणन महामंडळाचे सहसंचालक विनायक कोकरे, वखार महामंडळाचे सहव्यवस्थापक रमेश शिंगटे, तृणधान्य तज्ज्ञ सुनील कराड, निलम जोरावर आदी उपस्थित होते.
दिवेकर ‘जागर’ च्या ब्रँड अबॅसिडर
तृणधान्य महोत्सवानिमित्त पणन महासंघाने ‘जागर’ हा ब्रँड तयार केला आहे. महोत्सवात या ब्रँडचे अनावरण करण्यात आले. या ब्रँडच्या अबॅसिडर होण्याची विनंती अनुपकुमार यांनी ऋतुजा दिवेकर यांना केली. दिवेकर यांनी ती विनंती स्वीकारली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.