
लेखक- धनंजय सानप
जमत नाही तर नाही, या वाक्यावर शऱ्याचा जोर होता. सुन्याला अजून थोड्या आधाराची गरज होती. माणसांच्या अनामिक अशा भीतीला दूर सारायला कुणाचा तरी शाब्दिक आधार पुरेसा असतो. शऱ्या म्हणला, "भाई, मला वाटतंय, तू घरच्याला सांगून टाक. स्पर्धा परीक्षा बरीक्षा नाही जमत. म्हण दुसरं काही तरी करतो." सुन्या मधेच त्याला थांबवत म्हणला, "आरं इतकं सोपं नाहीये सांगणं. बाप घरातून हाकलून देईन. त्या हकलण्याचं काय नाय रं पण गावातली लोकं अन् भावकी लई हरामखोरय. उचक्या लागल्यागत सारखं तेच इचारत राहतीन. त्यात दूसरं काय करणार हे कळत नाहीय." "तोहं बी खरंचय म्हणा! पण असं किती दिवस उरावर ओझं घेऊन फिरणारेस?" विषय ताणण्यात मजा नाहीय, याचा अंदाज शऱ्याला आला होता.
सुन्यानं त्यावर माहीत नाही म्हणत विषय थांबवला. मागच्या सातेक दिवसांपासून शऱ्याचं आणि सुन्याचं या विषयावर बोलणं सुरू होतं. उत्तर काही सापडत नव्हतं. सुन्यानं बाजंवर अंग मोकळं सोडलं. एकाच जागेवर बसून पाठ ताठून गेलेली म्हणून मग तसाच मागच्या बाजूला तोल झोकून दिला. दोन्ही हात डोक्याखाली घेत त्यानं बाजंच्या माच्यावरून दोन्ही पाय मोकळं सोडले. तशीच पायातली चप्पल सोडली. तसा बाजंच्या नायलॉन दोऱ्यांचा काचकूच आवाज आला.
शऱ्यानं उठून आळेपिळे दिले. आणि अंग मोकळं करत इकडं तिकडं नजर फिरवत म्हणला, "भाई, तुला ते सांगायचं राहिलं. रूपा म्हणतेय लग्न करू!" तसा सुन्या म्हणला, "कर की मग. अजून कितीदी लपतछपत बसणारेस? तसं पोरगी बी चांगलीय. जीव लावल तुला. तोह्या नात्यातलीच त हाई!" "अंगं ह्याव बघा आमचा दोस्त. आरं लग्न करायचं म्हंजी आधी नीटनाटकं घर पाहिजेल की नाय. काय बाजारात जाऊन कोथमिर आणल्यागतय का ते. त्यात आमचं म्हातारं बारबोड्याचं. मरना झालंय कधीच." सुन्या म्हणला, "बाप नावाचं रसायन या जगात महागांडू असलं पाहिजे." "आरं तोहा बाप इतकाही दलिंदर नाहीय. आमचं म्हंजी निवळ गॉन केसाय." शऱ्या आणि सुन्याच्या बापात वरवर पाहता बरंच साम्य होतं. पण त्या दोन भिन्न प्रवृत्ती होत्या. त्यांचा बिंदू एकच असला तर टोक दोन होते.
सुन्यापेक्षा शऱ्याचं जिंदगी झंडं होती. पण त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झालेला नव्हता. परिस्थितीच्या रेट्यानं त्याला जास्तचं निबर केलं होतं. त्याची शरीरयष्टी किरकोळ असली तरी त्याचं मन बलाढ्य होतं. त्याचा त्याला माजही होता. एकेकाळचे मानसिक आघात त्याच्यातल्या राकटपणाला खतपाणी घालत होते. सुन्यालाही शऱ्याचं त्यामुळेच आकर्षण होतं. शऱ्याला कायम घाई असते. कसली तरी घाई. त्या घाईला शेंडाबुड काहीच नसतं. असते ती नुसती घाई. कशाची ते त्यालाही नीटसं उमगलेलं नव्हतं.
राग हा त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. त्याच्या तोंडून आत्ताही बापाचे येणारे संदर्भ याच रागाची देण होती. त्याचा राग फक्त रूपा आणि दुसऱ्या बाजूला माय या दोनच स्त्रियांजवळ विरून जायचा. खरंतर माणूस म्हणून तो तितकाही क्रूर नव्हता. रणांगणात धारातीर्थी पडलेल्या शत्रूलाही सुखानं मरण यावं, अशी प्रार्थना करण्याची त्याची तयारी असायची. म्हणून तर तो नाही म्हणलं तरी बापाला भेटायला अधूनमधून गावी येत होता. भलेही त्यानं त्याला आत्तापर्यंत शिव्याशिवाय दुसरं काहीच दिलं नसलं तरीही.
शऱ्या मामाच्या गावाकडे असायचा. त्याला दोन मामा होते. मोठा मामा शेतमजूर होता. लहान्या मामाचं गॅरेज होतं. मामाचं गाव तसं जवळच होतं. म्हणून अधूनमधून गावात येणं व्हायचं. गावातली आखड्याची जागा त्याच्याच नावावर होती. म्हणून गावात तो आज्जीला भेटायला यायचा. आणि कितीही नाही म्हणलं तरी बापालाही. बापात आणि त्याच्यात काहीच बोलणं मात्र व्हायचं नाही. शऱ्या घरात आला की, बाप गप बाहेर पडायचा.
गावातल्या घरी असताना शऱ्याच्या बापाची किरकिर सतत सुरू असायची. बाप मायला गांज्याच्या नशेत ढोरागत बदडत राहायचा. म्हणून शऱ्यानं दोनेक वर्षापूर्वी बापाला सोडून मायसोबत मामाचं गाव गाठलं होतं. माई आणि बापानं फारकत काही घेतली नव्हती. इकडं गावात असताना ती शऱ्याच्या बापाच्या माराला इतकी कदरली होती की, कुठल्याही क्षणी या सगळ्यातून कायमचं निघून जावं, असं तिला वाटत राहायचं. तिनं एकदा तसा प्रयत्नही केला होता. आज्जी आडवी आली म्हणून ती वाचली.
एका दुपारी तिनं घरातल्या पत्राच्या आडव्या जाड लोखंडी सळईला साडी बांधली होती. गळ्यात फास घेणार तेवढ्यात आज्जी तिथं आली आणि तिनं ते सगळं चित्र पाहून आरडाओरड केली. आज्जीची आरडाओरड ऐकून गल्लीतले लोकं जमली. आणि तिचा प्रयत्न फसला. शऱ्या त्यावेळी गॅरेजवर होता. त्याला शेजारच्या मदन दाजीनं कॉल करून सगळं सांगितलं होतं. तो घरी आला तेव्हा बाप फुल्ल नशेत फाशी घेती म्हणून त्याच्या मायला मारहाण करत होता. ते पाहून शऱ्यानं बापाच्या पाठीत लाकूड हाणलं. गल्लीत नुसता कावधळ माजलेला. आजूबाजूची लोकं तमाशा पाहत नुसतीच उभी होती. शऱ्याचं रौद्ररूप पाहून त्याचा बाप भीतीनं पळून गेला. आणि त्याच दिवशी मायला घेऊन शऱ्या कायमचा मामाच्या गावाला गेला.
शऱ्या मामाच्या गॅरेजमधेच खोलफिटिंगचं काम शिकलेला. त्यात शऱ्याचा हात इतका बसला होता की, त्यानं कडेगावला स्वतःचं मोटारसायकलचं गॅरेज सुरू केलेलं. चांगला पैसाही मिळत होता. कमी होती ती फक्त समाधानाची. कारण बापाचं सतत काही ना काही लचांड असायचं. आधी बाहेरची लचांड होती. नंतर घरात सुरू झाली. आज्जा होता तोवर बाप लाईनीत होता. आज्जा मेला आणि बाप बिघडला.
आज्ज्याला सात एकर काळीची जमीन होती. सोबत आज्ज्याकड गावाची पाटीलकी होती. गावातल्या सगळ्या लहान मोठ्या कार्यक्रमात आज्ज्याशिवाय पान हालत नव्हतं. आज्ज्याला बाप एकुलता एक होता. पण बापाचं आणि आज्ज्याचं कधी जमलं नाही. त्याला शऱ्याचा बाप निवळ नालायक वाटायचा. दिवसभर गावात टवाळक्या करत गांजा फुकत फिरणं एवढंच बापाचं आयुष्य होतं. म्हणून बापाच्या हातात कधी कुटुंबाचा कारभार आलाच नाही.
बापाला वाटायचं म्हातारं आज ना उद्या जाणारेचय. मग आपल्याला पाहिजे तसं करता येईल. पण आज्जा म्हातारपणात अर्धांगवायू होऊन मेला. त्यात त्याला इतरही आजारानी घेरलेलं. आजारपणात उपचारासाठी चार एकर जमीन विकावी लागली. बापाला तेच बोचत होतं. तसंही शऱ्याचा बाप ती जमीन विकून मजाहजाच करणार होता. तेही मोकळेपणानं करण्याचा योग आज्ज्यानं हिसकावून घेतला होता. म्हणून बाप पार पिसाळला होता.
मायचं माहेर गरीब होतं. केवळ आज्ज्याकडे पाहून त्यांनी सोयरीक जुळवलेली. तिच्या वाट्याला इतक्या यातना येतील, असा स्वप्नातही तिच्या माहेरकडच्यांनी विचार केला नव्हता. खरंतर बाप मायला का मारतो, याचं ठोस असं कुठलंच कारण नसायचं. बापातला तो राक्षस शऱ्यानं जवळून पाहिला होता. बाप आधी इकडं तिकडं गांजा फुकत फिरायचा.
आता आखड्यावर गांजा फुकत पडून असायचा. त्याला भाकरी घालून घालून आज्जीही आज ना उद्या गचकणारच होती. मायला मारहाण करताना आज्जी मधात पडायची. बापाची समजूत काढायची. बाप नशेत तिलाही शिव्या घालायचा. पण आज्जी मागं सरायची नाही. तिलाही एखादा फटका पडायचा. एवढंच एक कारण होतं की, शऱ्याला आज्जीबद्दलचा ओलावा टिकून होता.
शऱ्या बाजंवर बसत म्हणला, "खरं सांगू का सुन्या, लग्नाला काहीच अडचण नाई. फक्त बाप मेला पाहिजे. बापामुळं गाव, गॅरेज आणि राहतं घर सोडून तिकडं मामाकड राह्यला जावं लागलंय. रुपा तिच्या मोठ्या बहिणीला म्हणली करीन त शऱ्याशीच लग्न करीन. पण तिची आत्या म्हणती असल्या खानदानाशी सोयरीक करायची नाई. बापानं काडी लावलीय घरादाराला, पोरगं कसं निघन भरोसा हाय का? तिच्या आत्याचं बी खरंय म्हणा." रागाचा आवंढा गिळत शऱ्यानं जोरात शिवी हासडली.
सुन्या नुसतं ऐकून घेत होता. त्याला अशा सांसारिक गोष्टी अजून झेपत नव्हत्या. शऱ्या गंभीर होऊन बोलायला लागला, "जिंदगीचं पार मात्रं व्हायचा टाईम आलाय. मागच्या दोन वरसापासून घरी मायचा सुकलेला चेहरा पाहून अन्नाचा घास कडू लागतोय. तिला मला न्यायचं नव्हतं तिकडं. तिचंही मन उदास असतंय. पण या राक्षसाच्या तावडीतून सोडायला दुसरा काय उपायच नव्हता." शऱ्या कोसळत चालला होता. सुन्याला अजूनही त्याला धीर देऊन कसं सांत्वन करावं कळत नव्हतं. तो नुसताच शांतपणे ऐकून घेत होता. सुन्याच्या मनात स्वतःच्या बापाबद्दलची चित्र पळत होती. त्याला वाटत होतं, आपला बाप इतकाही वाईट नाही. खरंतर ती तुलना करायची वेळ नव्हती. पण त्याच्या मनात कुठंतरी तशी तुलना सुरूच होती.
न राहून सुन्या म्हणला, "भाई, नकु टेन्शन घेऊ. होईन नीट सगळं." तसा सुन्याचा मोबाईल खणकला. त्यानं गडबडीत पॅन्टच्या खिशातून मोबाईल काढला. फोन उचलून हा बोला, इथंचय आलोच तुम्ही घ्या वाढून, तव्हरक येतो मी, म्हणत सुन्या शऱ्याला म्हणला, "दादानं जेवायला बोलीलय. चल निघू आता." "किती वाजलेत रे?" शऱ्यानं खोकरत विचारलं. सुन्या म्हणला, "आठ पंधरा झालेत." "च्यायला बराच येळ झालाय. चल निघू. आज्जी वाट बघत बसली असंन." त्यावर सुन्यानं चल म्हणत चप्पल पायात घातली.
शऱ्यानं कोंबड्याच्या खुराड्याकड नजर फेकली. बाजंवरच्या गोधडीची आडवी तिडवी घडी मारली. आता कुत्री गोंडा घोळत आखाड्याच्या कुंपणाभोवती खेळत होती. मेखीवरच्या बल्बचा पिवळसर प्रकाश अंधारात अधिकच लख्ख झाला होता. त्याचा प्रकाश शेडवर चमकत होता. अधूनमधून येणारा लाऊडस्पीकरचा आवाज कधीच पूर्णतः बंद झाला होता. सुन्या आणि शऱ्या गावाच्या दिशेनं पावलं टाकत आखाड्यावरून बाहेर पडले होते. बराच वेळ नुसता चप्पलचा मातीच्या रस्त्यावर फरकांड्या मारणारा आवाज घुमत होता.
क्रमशः
#गोतावळा_४