
१) सोयाबीन दरात नरमाई (Soybean Rate)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली होती. सोयाबीनचे वायदे प्ररतिबुशेल्स १४.५६ डाॅलरपर्यंत नरमले होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४४५ डाॅलर प्रतिटनांचा टप्पा गाठला होता. देशातील बाजारातही सोयाबीन दरात नरमाई पाहायला मिळाली.
बाजारात सोयाबीनला सरासरी ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० रुपये दर मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजाराचा दबाव असल्यानं नरमाई दिसत आहे. पण नंतरच्या काळात दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
२) कापूस बाजार स्थिर (Cotton Market)
देशातील बाजारात कापूस आवकेचा दबाव कायम आहे. बाजारातील आवक सध्याही एक लाख गाठींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे दरावर दबाव आहे. सध्या कापसाला दरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपयांचा दर मिळतोय.
बाजारातील आवकेचा दबाव असल्यानं दर कमी आहेत. पण पुढील काळात कापूस आवक कमी होईल. त्यातच कापसाचा वापरही अधिक आहे. त्यामुळे कापसाच्या दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) मक्याची आवक वाढतेय (Maize Arrival)
मक्याची काढणी आता वेगाने सुरु आहे. तर बाजारातील आवकही अधिक दिसतेय. पण मागील हंगामात मक्याला चांगला भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्यात. सध्या मात्र बाजारात मक्याचे भाव दबावात आहेत. सध्या बाजारात सरासरी १ हजार ९०० ते २ हजार १०० रुपये क्विंटल भाव मिळतोय.
यंदा निर्यातीसाठीही मक्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकरी मका मागं ठेवत आहेत. परिणामी आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर मक्याच्या दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज व्यापारी आणि निर्यातदार व्यक्त करत आहेत.
४) हरभरा बाजार दबावातच (Chana Market)
हरभरा आवक आता हळूहळू वाढत आहे. नाफेडची खरेदी सुरु असल्यानं खुल्या बाजारात दर स्थिर आहेत. पण तरीही दरपातळी हमीभावापेक्षा कमीच आहे. हरभऱ्याला सध्या सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपये दर मिळतोय.
यंदा नाफेडची खरेदी चांगली होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं बाजारातील हरभरा मोठ्या प्रमाणात नाफेडकडे जाईल. परिणामी हरभरा दरात सुधारणाही दिसू शकते, असा अंदाज व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केला.
५) सध्या तुरीला काय भाव मिळतोय? (Tur rate)
तुरीचे बाजारभाव सध्या चढेच आहेत. बाजारात सध्या तुरीचा पुरवठा कमी दिसतोय. कारण यंदा देशातील तूर उत्पादनात मोठी घट झालीय. तर आयातही उद्दीष्टापेक्षा कमी आहे. सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ८ हजार ८०० रुपये दर मिळतोय. तूर डाळीने किरकोळ बाजारात १२० ते १३० रुपयांचा टप्पा गाठला.
त्यामुळं सरकारही डाळीचे भाव कमी करण्यासाठी ॲक्शन मोडवर आहे. सरकार बाजारातील पुरवठा आणि मालाची उपलब्धता याचं गणित तपासत आहे. त्यामुळे व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादार तसेच आयातदारांवर दबाव वाढवला जातोय.
तसेच भारतीय आयातदार कंपन्यांनी इतर देशांमध्ये केलेल्या स्टाॅकचीही माहिती घेतली जात आहे. त्यामुळं बाजारावर दबाव दिसतोय. पण तुरीच्या दरात केवळ किरकोळ चढ उतार होताना दिसत आहेत. तुरीच्या भावात मागील काही दिवसांपासून केवळ ५० ते १०० रुपयांचे चढ-उतार होताना दिसत आहेत.
मात्र सरासरी दरपातळी टिकून आहे. सरकारला तुरीची आयात एका मर्यादेपर्यंत वाढवता येणार नाही. तसेच तुरीचा वापर कायम आहे. त्यामुळे सरकारच्या प्रयत्नांनंतरही तुरीचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.