सरकारने पीकविम्याबाबतची कॉर्पोरेटधार्जिनी नीती बदलावी

पी. साईनाथ; परळीत विभागीय पीक विमा परिषद
सरकारने पीकविम्याबाबतची कॉर्पोरेटधार्जिनी नीती बदलावी
Crop InsuranceAgrowon

परळी, जि. बीड : ‘‘पीकविमा योजनेत (Crop Insurance Scheme) हप्ता व्यक्तिगत पातळीवर घेतला जातो. भरपाई (Compensation) मात्र समूहाला धरून निश्चित केली जाते. व्यक्तिगत विमाधारकाऐवजी क्षेत्र आधारित दृष्टिकोन स्वीकारला जातो. विमा संकल्पनेच्या मूलभूत आकलनाची ही मुळातूनच पायमल्ली आहे. सरकारने आपली ही कॉर्पोरेटधार्जिनी नीती (Pro Corporate Policy) मुळातून बदलली पाहिजे,’’ असे प्रतिपादन पी. साईनाथ (P. Sainath) यांनी केले.

किसान सभेच्या वतीने बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित मराठवाडा विभागीय पीक विमा परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

साईनाथ म्हणाले, ‘‘आपत्ती काळात शेतकऱ्यांना पीक संरक्षण मिळावे, या साठी पीक विमा योजनेची आखणी शेतकऱ्यांच्या ऐवजी पीक विमा कंपन्यांना लाभ पोहचविण्यासाठीच केली जात आहे. ९० लाख ते १ लाख करोड रुपये इतका सार्वजनिक पैसे विमा कंपन्यांच्या घशात घातले गेले आहेत. राफेल घोटाळ्यापेक्षाही हा घोटाळा मोठा आहे. जो दर वर्षी वाढत आहे.’’

डॉ. अजित नवले म्हणाले, ‘‘सध्याच्या पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना संरक्षण मिळत नाही. तरीही केंद्र सरकार योजनेत योग्य बदल करणार नसेल, तर राज्य सरकारने राज्यासाठी नवी योजना आणावी. नव्या योजनेसाठी महाराष्ट्राने स्वतःची विमा कंपनी काढावी. नव्या योजनेत जोखीमस्तर ९० टक्के ठेवावा. परिमंडळाऐवजी गाव हे विमा युनिट करावे. नुकसाननिश्चितीसाठी पीक कापणी प्रयोगांची संख्या वाढवावी. बीड पॅटर्नचा अवलंब करावा. हवामानाची आकडेवारी पारदर्शक व अचूक ठेवावी. आक्षेप निवारणासाठी स्वतंत्र व निष्पक्ष यंत्रणा उभारावी. नुकसानभरपाई नाकारल्यास कंपन्यांची मालमत्ता जप्त करून भरपाई वसूल करण्याची योजनेत तरतूद करावी.’’

ॲड. अजय बुरांडे म्हणाले, ‘‘बीड व मराठवाड्यात खरिपाची तयारी पूर्ण झाली आहे. मॉन्सून जवळ आला आहे. मात्र तरीही सरकारने विमा योजनेचे नोटिफिकेशन काढलेले नाही. सरकारने या बाबत दिरंगाई केली. २०२० ची नुकसान भरपाई विमा कंपन्यांनी दिली नाही, तर पुढील महिन्यात लढा आणखी तीव्र करण्यात येईल.’’

परिषदेत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर, पी. एस. घाडगे, अर्जुन आडे, उमेश देशमुख, उद्धव पौळ, मुरलीधर नागरगोजे, सुधाकर शिंदे, शंकर शिडाम, संजय मोरे, जितेंद्र चोपडे, भाऊ झिरपे, भगवान भोजने, सुदेश इंगळे, पांडुरंग राठोड, दत्ता डाके, दीपक लिपणे आदींनी आपले विचार मांडले. मोहन लांब यांनी आभार मानले. पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी आरपार संघर्ष करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com