
Nashik Onion Rate : कांद्यासाठी होणारा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लागवड, मजुरी, खते व औषधांचे दर या सर्वांचा परिणाम कांद्याच्या वाढत्या उत्पादन (Onion Production) खर्चात झाला आहे. सद्यःस्थितीत लेट खरीप कांद्याची आवक (onion Arrival) मोठ्या प्रमाणात येत आहे.
मात्र सरासरी ५०० रुपये क्विंटल दराने कांदा (Onion Rate) विकला जात आहे. हा बाजारभाव कांद्याच्या उत्पादन खर्चापेक्षादेखील खूप कमी असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. आता लवकरच उन्हाळ कांद्याचीदेखील मार्केटमध्ये आवक सुरू होईल.
या सर्व परिस्थितीत कांदा दराबाबत सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी व शेती अभ्यासक करत आहेत.
सध्या बाजारात येणाऱ्या लेट खरीप कांद्याला टिकवणक्षमता नाही. त्यामुळे उन्हाळ कांदा निघण्यापूर्वीच त्याच्या विक्री व्यवस्थेवर सरकारने काम केले पाहिजे. निर्यातबंदीचे धोरण बदलून अधिकाधिक निर्यात कशी होईल, याचा विचार केला पाहिजे.
यासाठी सरकारला निर्यातशुल्कात सूटदेखील द्यावी लागू शकते. याचा विचार आताच सरकारने करणे अपेक्षित आहे. सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रोख स्वरूपात मदत करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत शेती अभ्यासक व काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सचिन होळकर यांनी व्यक्त केले.
एकंदर कांदा पिकाचा उत्पादन खर्च पाहता किमान १.५ ते २ हजार रुपये इतका हमीभाव कांदा पिकाला मिळणे आवश्यक आहे. तरच कांदा उत्पादक शेतकरी नफ्यामध्ये राहू शकतो.
लाल कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने रोख स्वरूपात मदत करावी तसेच येणाऱ्या उन्हाळा कांद्याचे बाजारभाव टिकण्यासाठी केंद्र पातळीवरून आवश्यक त्या उपाययोजना आताच करणे गरजेचे आहे, असे मत होळकर यांनी व्यक्त केले.
राज्य व केंद्र सरकारने कांदा दराबाबत भूमिका जाहीर करावी
कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर स्वतःच्या रक्ताने सरकारला पत्र लिहिण्याची वेळ आली, म्हणजे राज्यकर्ते शेतीमालाच्या भावाबाबत अतिशय उदासीन आहेत हेच दर्शवते. सर्वसामान्य जनता व कष्टकरी शेतकरी यांना परवडेल, अशी धोरणे निश्चित केली पाहिजेत.
दरवर्षी उत्पादनाची स्थिती पाहून राज्य व केंद्र सरकारने कांदा दराबाबत भूमिका जाहीर केली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.