शालेय अभ्यासक्रमातील 'कृषी'च्या समावेशासाठी प्रयत्नशील:तोमर

कृषी क्षेत्राच्या धोरणात्मक विकासासाठी, अभ्यासक्रमातील कृषी क्षेत्राच्या समावेशासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) हे विशेष सत्र आयोजित केले होते.
शालेय अभ्यासक्रमातील 'कृषी'च्या समावेशासाठी प्रयत्नशील:तोमर
AgricultureAgrowon

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP २०२०) माध्यमातून शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर (Narendra Singh Tomar) यांनी म्हटले आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे (ICAR) मंगळवारी (तारीख १४ जून) 'शालेय अभ्यासक्रमातील कृषी विषयाचा समावेश' या विषयावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात तोमर यांनी ही माहिती दिली. वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

कृषी क्षेत्राच्या धोरणात्मक विकासासाठी, अभ्यासक्रमातील कृषी क्षेत्राच्या समावेशासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) हे विशेष सत्र आयोजित केले होते. विद्यार्थ्यांना कृषी व त्याच्या संबंधित इतर क्षेत्रात करियर करता येण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार परिषदेतर्फे करण्यात येतो आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक त्रिलोचन महोपात्र, उपमहासंचालक (शिक्षण) आर.सी. अग्रवाल आणि असोसिएशन ऑफ इंडिया युनिव्हर्सीटीजचे महासचिव पंकज मित्तल हे या सत्रास हजर होते.

तोमर यांच्यामते कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेतील प्राधान्याचा विषय आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राने ताकद दिली आहे. प्रतिकूल परिस्थितीत कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेस हात दिला आहे. २०२० च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP २०२०) माध्यमातून कृषी शिक्षणावर भर देण्यात आल्याचेही तोमर म्हणाले.

२०२० च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (NEP २०२०) विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षण देण्यासोबतच त्यांच्या सर्वागींण विकासावर भर देण्यात आला आहे. याखेरीज ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात कसा वापर करावा, याचा विचार धोरणात करण्यात आल्याचे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतील (NCERT) विभागप्रमुख व प्रोफेसर अनिता नून यांनी यावेळी म्हटले आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) आणि सेंट्रल बोर्ड फॉर सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) आणि इतर अनेक शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, शिक्षकांनी या विशेष सत्रात सहभाग घेतला. या सर्वांनीच शालेय अभ्यासक्रमात कृषी क्षेत्राचा समावेश करण्याची गरज व्यक्त केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com