
Sangli : सांगली जिल्ह्यात दुष्काळी समजल्या जाणाऱ्या कडेगावची द्राक्ष उत्पादन (Grape production) घेणारा तालुका अशी ओळख निर्माण झाली. परंतु पाणीटंचाईमुळे हे पीक हळूहळू कमी झाले. त्यातच टेंभू योजनेचे पाणी आले. द्राक्षाच्या जागी ऊस आला.
तालुक्यात त्याचे क्षेत्र वाढले. याच तालुक्यातील शेवटचे गाव म्हणजे खेराडे वांगी. येथील संजय आणि प्रकाश या कदम बंधूंची ३० एकर शेती आहे. वडील शंकरराव यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आणि विटा येथे पोल्ट्री फार्म पाहायचे. संजय यांनी १९९० मध्ये बीकॉमची पदवी घेतली.
वडिलोपार्जित जमिनीत १९९१ मध्ये वडिलांनी द्राक्षाची लागवड केली होती. सुमारे अकरा वर्षे ती संजय यांनी सांभाळली. द्राक्ष निर्यात, बेदाणा निर्मितीचे प्रयोग केले. डाळिंब घेतले. पण तेलकट डाग रोगामुळे ते फार यशस्वी झाले नाही.
व्यवसाय आणि द्राक्ष शेतीतून कुटुंबाचा प्रपंच सुरू होता. बंधू वडिलांसमवेत व्यवसाय पाहायचे. शेतीकडे पुरेसे लक्ष देणे शक्य नव्हते. त्यामुळे ती वाट्याने करण्यास दिली.
उसशेतीचा अभ्यास
दरम्यान, शेतीची जबाबदारी संजय यांनी पुन्हा खांद्यावर घेतली. व्यवसायातील पैशांमधून टप्प्याटप्प्याने खडकाळ शेती घेत ती विकसित केली. मुरमाड हलक्या या मातीत गाळ भरून घेतला आणि ती पिकांखाली आणली.
शाश्वत पाण्याची सोय व्हावी यासाठी नऊ हजार फूट पाइपलाइन करून शेतात आणली. या शेतात ऊस घेण्याचे ठरले. हे पीक असे आहे की कितीही अभ्यास असला, तरी तो कमीच पडतो अशी संजय यांची धारणा आहे.
त्यामुळे या पिकात अभ्यास करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. सन २०१३ च्या दरम्यान या भागातील कृषिभूषण संजीव माने, सुरेश कबाडे, माणिक पाटील, सुरेश माने-पाटील यांच्या संपर्कात ते आले. त्यांच्याकडून या पिकातील बारकावे समजून घेतली.
ज्ञानवृद्धी होऊ लागली. पिकाचा अभ्यास वाढला. प्रत्येकाकडून मिळालेल्या शिदोरीचा वापर शेतीत सुरू झाला.
शेतीतील प्रयोग
सन २०१४ पासून ऊसशेतीतील प्रयोगांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ‘सब सरफेस’ ठिबक पद्धतीने उसाची लागवड केली. खोडवा, निडवाही घेतला. एकरी १०० टन उत्पादनाचे ‘टार्गेट’ ठेवून व्यवस्थापन सुरू केले.
सरी किती फुटाची असावी, दोन रोपांतील अंतर किती असावे, कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी काय करावे या अनुषंगाने शंका उपस्थित होऊन कार्यपद्धती सुरू व्हायची. पुढील टप्प्यात स्वयंचलित पद्धतीच्या व डबल लॅटरल ठिबक सिंचनाचा वापर सुरू केला.
‘ॲग्रोवन’ची मिळाली साथ
संजय सुरवातीपासून ‘ॲग्रोवन’चे वाचक आहेत. त्यातील यशकथा, तांत्रिक लेख, पीक सल्ले यांचा ते अभ्यास करू लागले. यशकथांमुळे प्रयोगशील शेतकरी माहीत होऊन त्यांच्यासोबत संपर्क वाढू लागला. ऊसशेतीत अशा रीतीने ॲग्रोवनची साथ मिळाल्याची भावना संजय व्यक्त करतात.
ऊसशेती व्यवस्थापन
आजमितीला संजय यांचा ऊसशेतीतील सुमारे नऊ वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. दरवर्षी सुमारे १५ एकर त्यांचा ऊस असतो. को ८६०३२ या वाणाचा वापर होतो. आले लागवड असलेल्या शेतात काहीवेळा पूर्वहंगामी उसाचीही लागवड होते. आले पिकाचे सहा ते चार एकरांपर्यंत क्षेत्र असते.
खात्रीशीर रोपवाटिकेतूनच उती संवर्धित वाणांची तिसऱ्या ते चौथ्या पिढीची रोपे आणली जातात. सहा बाय दोन फूट अंतरावर रोपांची लागवड होते. एकरी रोपांची संख्या सुमारे ३६३० पर्यंत असते. गरजेनुसार ‘गॅप फीलिंग’ केले जाते.
प्रति बेटात १० ते १५ ऊससंख्या ठेवली जाते. गरजेनुसार जेठा कोंब काढला जातो. त्यामुळे फुटवा वाढीस मदत होते. अपेक्षित फुटवे ठेवल्याने उसाची जाडी वाढण्यास मदत होते. हवा, प्रकाशसंश्लेषण या बाबी अनुकूल घडतात.
पानांची जाडी, काळोखी, वाढते. गाळपाला जाईपर्यंत उसाची ४५ हजार ते त्यापुढे असते. स्वयंचलित पद्धतीने फर्टिगेशन केले जाते.
प्रत्येकी ४० सेंटिमीटरवर ड्रीपर असून, प्रति तासाला २ लिटर पाण्याचा विसर्ग होतो. पिकाच्या वाढीची अवस्था, बाष्पीभवनाचा वेग यानुसार दर महिन्याला पाण्याचे नियोजन होते.
जमिनीची सुपीकता जपली
पाचटाची कुट्टी करून ते मातीआड केले जाते. हरभरा, आले या पिकांची फेरपालट केली जाते. गरजेनुसार ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या खतांचा वापर होतो. दोन वर्षांतून एकदा याप्रमाणे एकरी पाच ट्रॉली शेणखत, मळी व दोन ट्रॉली राख यांचा वापर होतो.
तीन वर्षांतून माती परीक्षण करण्यात येते. त्यानुसारच अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन होते. त्यामुळेच पूर्वी असलेला मातीचा ०.४ सेंद्रिय कर्ब आता ०.६ ते ०. ७ टक्क्यावर पोहोचला आहे.
ऊस उत्पादन
गेल्या पाच वर्षांत संजय यांनी ऊस उत्पादनाचा एकरी १०० टनांचा आकडा पार केला आहे. आता दीडशे टनांचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. खोडवा उसाचे एकरी ६० ते ७० टन उत्पादन घेतात.
आडसाली उत्पादनाची आकडेवारी पुढीलप्रमाणे.
वर्ष... उत्पादन टन प्रति एकरी
२०१७-१८... .१३३.२९७
२०१८-१९... १२०
२०१९-२०... १२७.८६४
२०२०-२१... ११५
२०२१-२२ ... ११०
संजय कदम, ९८२२७९००४७, ९४२३५२४६५६
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.