भुईमुगाच्या शेंगा आणि कॅडबरी

शाळेत जाणारी पायवाट अशाच भुईमुगाच्या शेतांतून जायची. शेंग फुगायला सुरुवात झाली की आतले पांढरेशुभ्र गोजिरवाणे दूध भरलेले नाजुक बाळशेंगदाणे आम्हा बालकांना भुरळ पाडायचे.
Groundnut
GroundnutAgrowon

शाळकरी वयात असताना.आईकडे खाऊसाठी पैसे मागण्याची वेळ कधीही आली नाही किंवा तसा हट्टही कधी केल्याचे आठवत नाही.शाळेत जाताना खाकी हाफचड्डीचे दोन्ही खिसे भरून चवदार भुईमुगाच्या शेंगा आणि सोबत गुळाचा खडा हाच रोजचा राजेशाही खाऊ! हा असा चटकदार खाऊ आहे की जगात या पेक्षा दुसरा चांगला खाऊ आजपर्यंत तरी माझ्या पाहण्यात नाही.शाळेत जाता येता, रमतगमत, खेळत एक एक शेंग सोलून गुळाबरोबर खाता खाता कधी संध्याकाळ व्हायची ते समजत नव्हते.आठवड्यातून दोनतीन वेळा डब्याला शेंगदाणा आमटी,चटणी,शेंगदाण्याचे खमंग लाडू किंवा शेंगदाण्याच्या कुटाबरोबर कांदा घालून तयार झालेल्या म्हाद्याची चव काय वर्णावी !

Groundnut
Kharip Sowing: मराठवाड्यात ४१ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी

पेरणी नंतर दीड महिन्याने भुईमूगाची फुले झडतात आणि आऱ्या फुटून त्याला छोटे छोटे कंद फुगू लागतात. ज्याने हे कंद खाल्ले नाहीत त्या अभागी माणसाने आपले जीवन कार्य संपवण्याआधी आयुष्यात एकदा तरी या स्वर्गीय चवीचा आस्वाद घ्यावा ! शाळेत जाणारी पायवाट अशाच भुईमुगाच्या शेतांतून जायची. शेंग फुगायला सुरुवात झाली की आतले पांढरेशुभ्र गोजिरवाणे दूध भरलेले नाजुक बाळशेंगदाणे आम्हा बालकांना भुरळ पाडायचे.मग जाता येता घरची शेती असताना.दुसऱ्याच्या शेतातले चोरलेले भुईमुगाचे टहाळे खाण्यात अंत्यतिक गोडी होती.

Groundnut
Groundnut Rate :आषाढी एकादशीच्या तोंडावर, शेंगदाणे, साबुदाणा स्वस्त

भुईमुगाला कंद लागण्यापासुन ते शेंगदाण्याची पूर्ण वाढ होईपर्यंत वेगवेगळ्या अवस्थां मधल्या माती मिश्रित चवीची मौज लुटत भुईमुग काढणीला यायचा आणि सुटीच्या दिवशी सकाळीच आमची रवानगी शेतात व्हायची.काढणीच्या आठदहा दिवस आधी पाऊस होऊन गेला असेल तर जमीन भुसभुशीत असते.टहाळा उपटताना त्रास होत नाही आणि प्रत्येक शेंग टहाळ्या बरोबर निघुन येते.काढणीच्या आधी पावसाने ताण दिला असेल तर मात्र जमीन कडक होते आणि टहाळा उपटायला जड जातो आणि बहुतेक शेंगा खाली जमिनीतच तुटून राहतात.मग त्या शेंगा काढणे जिकिरीचे व्हायचे.

काम चालू असताना तोंडाला मात्र सुटी नसायची दिवसभर प्रत्येकजण किती शेंगा खायचा याचे गणित नसायचे आणि त्या अति खाण्याने अनेकांना ढाळ उलट्या व्हायच्या त्या काळात घरोघर शौचालय नसल्याने. रस्त्याच्या कडेने शेंगदाने युक्त टेहेर ज्याला आम्ही फौजदार म्हणायचो त्यातून मोठ्या शिताफीने वाट काढत चालावे लागे. पावसाची टांगती तलवार डोक्यावर असताना हि कामे लगबगीने चालू असायची.कोण किती पोती शेंगा तोडतोय यात चुरस चालायची.ओल्या शेंगा वाळवण्यासाठी घरी अंगणात आणल्या जायच्या.मग त्या वाळण्यासाठी सकाळी पांगवणे आणि संध्याकाळी जमा करून झाकुन ठेवणे हा शेंगा वाळेपर्यंत आणि त्यांची माती निघेपर्यंत रोजचा उद्योग.

शेंगा वाळल्यावर पोत्यात भरून पडवीला पोत्याची थप्पी लावली लागायची.एक पोतं घरातल्या बाळगोपाळासाठी, स्वयंपाकात वापरण्यासाठी आणि पाव्हण्यारावळ्यांना गुळ शेंगांच्या पाहुनचारासाठी खुलं असायचं. एक पोतं वडील तालुक्याच्या गावी तेलघाण्यावर घेऊन जायचे येताना बारा शेराची चरवी भरून तेल आणि म्हशींसाठी पेंड घेऊन यायचे.त्याचा घरभर खमंग सुवास दरवळायचा. तेलात तयार होणाऱ्या प्रत्येक पदार्थाची लज्जत काही औरच असायची.तेल संपत आले की दुसरं पोतं तेल पाडण्यासाठी घाण्यावर हजर व्हायचं. उन्हाळ्यात नांगरणी चालू झाली की आम्ही घरी मुबलक शेंगा असताना सुद्धा नांगरामागे शेतात राहिलेल्या शेंगा वेचायला जायचो कारण कित्येक दिवस जमिनीत राहिल्या नंतर शेंगदाण्याची चव अशी अवर्णनीय असायची कि पुछो मत !

साधारण ऐंशीच्या दशका पर्यंत एकरी तीस ते चाळीस पोती ओल्या शेंगा निघाल्याचे मला आठवते शेंगा काढणीची मजुरी रोजंदारीवर नसते ती दिवसभर किती पोती शेंगा काढल्या त्यावर ठरते.पाऊस हुलकावण्या द्यायला लागला. शेंगा मध्ये ऐन दाणे फुगायच्या वेळी पावसाने दडी मारल्यामुळे पोचकट शेंगा राहू लागल्या.मजुरांना पोत्यांच्या हिशोबाने काम करणे परवडेना ते शेंगांचा वाटा मागू लागले. शेवटी भुईमुगाचे उत्पन्न इतके घटले की एकरी चार पोत्यांवर आले. भुईमुग काढणीच्या वेळी मजुर मिळेना.ऐन काढणीच्या वेळी पावसामुळे घरच्यांची तारांबळ उडायला लागली.भुईमुगाचा पाला जनावरे आवडीने खातात.तोही पावसात भिजल्यामुळे सडू लागला.एकूण काय तर लागोपाठ काही वर्षे भुईमुग शेती तोट्यात जाऊ लागली.घरचे बियाणे मोडल. आपल्याकडच्या डॉक्टरांनी कोलेस्ट्रॉलचा बागुलबुवा केला.लोकांनी शेंगदाणा तेलाचा धसका घेऊन सोयाबीन तेल वापरायला सुरुवात केली.

पंधरा-सोळा वर्षांपूर्वी शेजारच्या गावात एकाने सोयाबीन पेरले. तोपर्यंत आमच्या भागात सोयाबीन काय प्रकार आहे, हे कुणालाच माहित नव्हते. पेरणी आणि एक खुरपणी झाली की सोयाबीन झपाट्याने वाढते. काढणीला आले की सोयाबीन चांगले उंच असेल तर हार्वेस्टरने काढता येते किंवा ठाकर समाजाच्या लोकांना उक्ते देऊन दोन दिवस कडक वाळल्यानंतर मळणीयंत्राने मळणी करता येऊ लागले. एकरी साधारण दहा- बारा क्विंटल उत्पादन निघू लागले आणि बाजारभाव 4000 पर्यंत मिळू लागला. सहा वर्षांपूर्वीची गोष्ट. बाकी ठिकाणी दुष्काळ होता, पण आमच्या भागात पाऊस चांगला होता. सोयाबीनचे उत्पादन चांगले निघाले पण वर्षभर 3000 रुपयांच्या वर बाजारभाव गेला नाही.

सोयाबीनचे भाव कोसळले तरी ते विकल्या शिवाय पर्याय नाही कारण सोयाबीन घरी ठेऊन लेकरांच्या मुखी पडायला ते शेंगदाणे नाहीत ! सोयाबीनपासून अनेक पदार्थ बनवले जातात पण ते शेंगदाण्याच्या तोडीचे कधीच होऊ शकत नाहीत, असे मला वाटते. सोयाबीनमध्ये मुबलक प्रथिने असतात पण जास्त प्रथिनेही शरीराला घातक असतात. पीक पद्धतीत अधूनमधून बदल करायला हवेत शेतकरी एकदा सोयाबीन कडे वळाले आणि त्यांनी भुईमुगाला सपशेल नाकारले हि शोकांतिका आहे. हळूहळू पीकपध्दती बदलत गेली. शेतात आता भुईमुग दिसेनासा झाला आहे. शेतकरी असून शेंगदाणा किराणा मालाच्या दुकानातून आणायची आमच्यावर वेळ आली आणि आमची पोरं कॅडबरी आणि कुरकुरेसाठी आमच्याकडे हट्ट करू लागली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com