
मुकुंद पिंगळे : ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : देशभरात लेट खरीप कांद्याच्या दराचा (Onion rate) प्रश्न गाजत असताना गुजरात सरकारने (Gujrat Government) कांदा उत्पादक (Onion Producer) शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
फेब्रुवारी महिन्यात विक्री झालेल्या कांद्याला प्रतिकिलो दोन तर १ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान शीतगृहात बटाटा साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति १ रुपया किलो मदत दिली जाणार आहे. याशिवाय राज्याबाहेर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या माध्यमातून मदत होईल.
यासाठी ३३० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केल्याची घोषणा गुजरातचे कृषिमंत्री राघव पटेल यांनी मंगळवारी (ता. ७) विधानसभेत केली.
कांदा दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी निर्यातदार व्यापारी अडचणीत होते. या पार्श्वभूमीवर महुवा (जि.भावनगर) येथील श्री. खेतीवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष घनश्यामभाई पटेल यांनी गुजरात सरकारला यासंबंधी ८ फेब्रुवारी पत्र लिहिले होते.
तर अलीकडेच पाच ते सहा विधानसभा सदस्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांची भेट घेतली होती.
यावर कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी विचारात घेत गुजरात सरकारने कांदा व बटाटा उत्पादकांसाठी अर्थसाहाय्य जाहीर केले आहे.
विधानसभेच्या नियम ४४ अन्वये ही मदत जाहीर करण्यात आली आहे.
गुजरातमध्ये चालू रब्बी हंगामात लाल कांद्याचे ७ लाख टन उत्पादन होण्याचा सरकारचा अंदाज होता. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत गुजरातमध्ये दोन लाख टन अधिक बटाट्याचे उत्पादन अंदाज आहे. वाढलेली आवक व घसरलेले दर यामुळे मोठा गोंधळ तयार झाला होता.
आता या मदतीच्या आधारे राज्याबाहेर माल विकण्यास इच्छुक असलेल्या किंवा निर्यात करण्यास प्राधान्य देणाऱ्या शेतकऱ्यांना वाहतूक अनुदान दिले जाणार आहे.
सरकारने मागील वर्षी योजनेंतर्गत सौराष्ट्र प्रांतातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ७० कोटी रुपयांची मदत जाहीर केली.त्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत म्हणून प्रतिकिलो २ रुपये देण्यात आले होते.
याशिवाय वाहतूक अनुदान म्हणून सरकार २० कोटी रुपयांची मदत देणार आहे. यामध्ये रस्ते वाहतुकीसाठी ७५० रुपये प्रतिटन तर रेल्वे वाहतुकीसाठी ११५० रुपये प्रति टन आणि निर्यातीसाठी उत्पादनाच्या वाहतूक खर्चाच्या २५ टक्के असा समावेश आहे.
चालूवर्षी कांदा दरातील घसरण पाहता राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर मागणी गांभीर्याने विचारात घेत शेतकऱ्यांसाठीही घोषणा केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात बाजार समित्यांमध्ये विक्री झालेल्या कांदा उत्पादकांना ही मदत दिली जाणार आहे. २ रुपये किलोप्रमाणे २० किलो वजनाच्या ५०० कट्ट्यांसाठी तर जास्तीतजास्त ५० हजार मदत दिली जाईल.
तर १ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान शीतगृहात बटाटे साठवणाऱ्या शेतकऱ्यांनाही १ रुपया प्रतिकिलो ही मदत असेल.
- घनश्याम पटेल, अध्यक्ष, श्रीखेतीवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती, महुवा, जि. भावनगर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.